क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा मागोवा घेताना मला वैयक्तिकरीत्या मोठी प्रेरणा मिळते. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय, शिक्षण आणि ग्रामविकासाच्या माध्यमातून सर्वसमावेशक प्रगती साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रवास महात्मा फुले यांच्या समतेच्या विचारांशी सुसंगत असून, त्यांच्या कार्याला प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा हा काळ आहे.
आज देश आणि राज्य पातळीवर विकासाची नवी दिशा निश्चित होत असताना, त्या प्रत्येक प्रयत्नामागे सामाजिक समतेची भक्कम पायाभरणी असणे अत्यावश्यक आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे; तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण आणि सामाजिक विकासाला गती देण्यात आली आहे. या सर्व कार्याचा विचार करताना मला महात्मा जोतीराव फुले यांचे कार्य आणि विचार सातत्याने मार्गदर्शक ठरतात.
महात्मा फुले यांचे जीवन म्हणजे अन्यायाविरुद्ध उभारलेली ठाम भूमिका आणि वंचित समाजासाठी केलेली अखंड साधना होय. त्यांच्या आयुष्यातील एका प्रसंगाने त्यांच्या विचारविश्वाला निर्णायक वळण दिले. समाजातील जातीय द्वेषाच्या कटू अनुभवातून त्यांनी विषमतेचे वास्तव जवळून पाहिले आणि त्या अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा निर्धार केला.
लग्न-मिरवणुकीतील अपमानाचा प्रसंग त्यांच्या मनावर खोलवर कोरला गेला. जन्माच्या आधारे माणसाला दुय्यम ठरवले जाते, ही बाब त्यांच्या स्वाभिमानाला चटका लावणारी होती. त्या क्षणापासून त्यांनी ठरवले की, समाजात समानतेचा दीप प्रज्वलित केल्याशिवाय खरे परिवर्तन शक्य नाही. सर्व मानव एकाच ईश्वराची लेकरे आहेत, हा त्यांचा विचार पुढील सर्व कार्याचा पाया ठरला.
या अनुभवाने त्यांनी समाजव्यवस्थेचा सखोल अभ्यास सुरू केला. संतसाहित्य, धर्मग्रंथ आणि जागतिक विचारवंतांचे लेखन यांचा अभ्यास करत त्यांनी जाणले की, समाजातील विषमता ही नैसर्गिक नसून ती अज्ञान, भीती आणि स्वार्थातून निर्माण झालेली आहे. शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धा यामुळे सामान्य माणूस गुलामगिरीत अडकतो. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार हा परिवर्तनाचा मुख्य मार्ग आहे, ही त्यांची ठाम भूमिका होती.
महात्मा फुले यांनी वैयक्तिक लाभाचा मार्ग न निवडता समाजपरिवर्तनाचा मार्ग स्वीकारला. स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणे, वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली करणे, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न मांडणे आणि सामाजिक समतेचा पुरस्कार करणे, या माध्यमातून त्यांनी व्यापक चळवळ उभी केली. त्यांनी उभारलेला ‘सत्यशोधक समाज’ हा केवळ संघटना नव्हता, तर तो विचारांचा क्रांतिकारक प्रवाह होता.
त्यांच्या कार्यातील निःस्वार्थीपणा आणि दूरदृष्टी मला विशेष प्रेरणा देतात. त्याकाळात उच्चपदे मिळवण्याची संधी असूनही त्यांनी ती नाकारली आणि समाजसेवेला स्वतःला अर्पण केले. जर त्यांनी वैयक्तिक सुखाचा मार्ग निवडला असता, तर ते मोठ्या पदावर पोहोचले असते; परंतु त्यांनी लाखो वंचितांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा मार्ग निवडला. याच त्यागामुळे ते ‘महात्मा’ ठरले.
त्यांच्या कार्याचा प्रभाव काळाच्या पलीकडे गेला. त्यांच्या हयातीत त्यांना अपेक्षित सन्मान मिळाला नाही; परंतु त्यांच्या कार्याची खरी ओळख नंतर समाजाला पटली. १८८८ साली मुंबईत त्यांना ‘महात्मा’ ही पदवी बहाल करण्यात आली, हा त्यांच्या कार्याचा सन्मान करणारा ऐतिहासिक क्षण होता.
आजच्या काळात महात्मा फुले यांच्या विचारांची गरज अधिक तीव्रतेने जाणवते. केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून ग्रामीण भागाचा विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, घरे आणि रोजगारनिर्मिती यावर भर दिला जात आहे. राज्य सरकारही गावोगावी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे. या सर्व उपक्रमांमधून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे.
ग्रामविकासमंत्री म्हणून कार्य करताना मी स्वतः महात्मा फुले यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवतो. ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे, शेतकर्यांना सक्षम करणे, महिलांना स्वावलंबी बनवणे आणि प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करणे, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. पाणी व्यवस्थापन, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक विकास योजनांमधून गावागावांत नवे परिवर्तन घडवण्याचा माझा प्रयत्न आहे.
महात्मा फुले यांनी ज्याप्रकारे अज्ञान, अन्याय आणि विषमतेविरुद्ध लढा दिला, त्याचप्रमाणे आजच्या काळात पारदर्शक आणि लोकाभिमुख शासन व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा सुलभ करणे, भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणे आणि प्रत्येक नागरिकाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे, हीच खरी सामाजिक न्यायाची अंमलबजावणी आहे.
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या विचारांना कृतीत उतरवणे, हीच खरी आदरांजली ठरेल. समाजातील विषमता दूर करून प्रत्येक व्यक्तीला समान संधी देणे, शिक्षणाचा प्रसार करणे आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणे, हेच त्यांच्या कार्याचे खरे ध्येय होते.
माझ्यासाठी महात्मा फुले हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नाहीत, तर ते माझ्या कार्याला दिशा देणारी अखंड प्रेरणा आहेत. त्यांच्या विचारांची ज्योत तेवती ठेवत, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा माझा निर्धार आहे. त्यांच्या कार्यातून मिळालेली ही प्रेरणा मला अधिक जबाबदारीने काम करण्यास प्रवृत्त करते आणि सामाजिक परिवर्तनाच्या या प्रवासात सातत्याने पुढे जाण्याची ताकद देते.
जयकुमार गोरे
(लेखक महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री आहेत.)
(शब्दांकन : सागर देवरे)