भारतीय समाजव्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या जातीय विषमतेमुळे बहुजन समाज शतकानुशतके अन्याय सहन करत होता. अशा परिस्थितीत महात्मा जोतीराव फुले यांनी या विषमतेविरुद्ध उभे राहत शिक्षण, समता आणि न्यायाचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांतून केवळ सामाजिकच नव्हे, तर राजकीय परिवर्तनाचीही बीजे रोवली गेली आणि खर्या स्वातंत्र्याची दिशा निर्माण झाली.
सन १८४०च्या दशकात पुण्यातील एका लग्नसमारंभात जातीय विषमतेतून जोतीराव फुले यांचा झालेला अपमान हा त्यांच्या आयुष्यातील निर्णायक क्षण ठरला. त्या प्रसंगाने त्यांच्या मनात केवळ वैयक्तिक वेदना निर्माण केली नाही, तर संपूर्ण समाजव्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित केले. हा अपमान म्हणजे एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण बहुजन समाजाच्या अस्तित्वाचा अपमान आहे, याची त्यांना जाणीव झाली आणि इथूनच त्यांच्या सामाजिक व राजकीय संघर्षाला प्रारंभ झाला.
जोतीरावांनी परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्यांना लक्षात आले की, देशातील जातीय विषमता, अज्ञान आणि आर्थिक दरी यामुळे समाज दुर्बल झाला आहे. या दुर्बलतेमुळेच परकीय सत्तेला येथे आपले वर्चस्व प्रस्थापित करणे सोपे गेले. त्यामुळे त्यांनी ठरवले की, केवळ बंड करून स्वराज्य मिळवता येणार नाही; तर समाजाला सशक्त करणे, शिक्षणाचा प्रसार करणे आणि सर्वांना समान संधी देणे अत्यावश्यक आहे.
या विचारातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारक पाऊल उचलले. सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने त्यांनी मुलींसाठी आणि वंचित घटकांसाठी शाळा सुरू केल्या. त्या काळात शिक्षणावर मोजक्याच वर्गाचे वर्चस्व होते; परंतु जोतीरावांनी ते सर्वांसाठी खुले केले. शिक्षण हे केवळ ज्ञानाचे साधन नसून स्वातंत्र्याचा पाया आहे, हा त्यांचा मूलभूत विचार होता.
जोतीरावांचे राजकीय कार्य त्यांच्या ‘पुणे म्युनिसिपल कमिटी’तील कार्यकाळात अधिक स्पष्ट होते. सन १८७४ ते १८८३ या काळात त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. पुण्यात नवीन मार्केट उभारण्याच्या योजनेला त्यांनी विरोध केला. कारण, त्यांना वाटत होते की, गरीब लोकांकडून वसूल केलेला पैसा त्यांच्या शिक्षणासाठी आणि उन्नतीसाठी वापरला पाहिजे. हा विरोध केवळ आर्थिक नव्हता, तर तो सामाजिक न्यायाचा मुद्दा होता.
त्याचप्रमाणे, व्हाईसरॉयच्या स्वागतासाठी खर्च करण्याच्या प्रस्तावालाही त्यांनी ठाम विरोध केला. जनतेच्या पैशाचा अपव्यय होऊ नये आणि तो लोकहितासाठीच वापरला जावा, हा त्यांचा आग्रह होता. त्याकाळात सत्ताधार्यांच्या निर्णयांविरोधात उभे राहणे सोपे नव्हते. तरीही, त्यांनी धाडसाने आपली भूमिका मांडली.
जोतीराव फुले यांनी केवळ स्थानिक प्रशासनावरच टीका केली नाही, तर राष्ट्रीय स्तरावरही त्यांनी आपले विचार मांडले. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेवर त्यांनी स्पष्टपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कारण, त्या संस्थेत बहुसंख्य शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे प्रतिनिधित्व नव्हते. १८८९ मध्ये मुंबईतील अधिवेशनाच्या वेळी त्यांनी उभारलेला ‘शेतकर्याचा पुतळा’ हा या विरोधाचा प्रभावी प्रतीक होता.
या पुतळ्याद्वारे त्यांनी स्पष्ट संदेश दिला की, जोपर्यंत बहुजन समाजाचा आवाज राजकारणात ऐकला जात नाही, तोपर्यंत कोणतीही संस्था खर्या अर्थाने राष्ट्रीय ठरू शकत नाही. हा विचार त्याकाळात अत्यंत क्रांतिकारक होता आणि आजही तो तितकाच लागू पडतो.
जोतीरावांनी प्रशासनातील समावेशकतेवर विशेष भर दिला. त्यांनी सांगितले की, प्रत्येक सरकारी खात्यात सर्व समाजघटकांचे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. अन्यथा, निर्णय एकांगी होतील आणि न्याय मिळणार नाही. हा विचार आजच्या लोकशाही व्यवस्थेचा पाया मानला जातो.
त्यांच्या लेखनातूनही त्यांच्या राजकीय विचारांची प्रखरता दिसून येते. त्यांनी अभंग, पोवाडे आणि ग्रंथांच्या माध्यमातून प्रशासनातील अन्याय, करप्रणालीतील विसंगती आणि न्यायव्यवस्थेतील पक्षपात यावर कठोर टीका केली. त्यांच्या लिखाणात केवळ आक्रोश नव्हता, तर परिवर्तनाची स्पष्ट दिशा होती.
जोतीरावांनी इंग्रजी सत्तेतील काही सुधारणा स्वीकारल्या. कारण, त्यांना वाटत होते की, शिक्षण आणि आधुनिक विचारसरणीच्या माध्यमातून समाज उन्नत होऊ शकतो; परंतु त्यांनी कधीही अंधानुकरण केले नाही. जेव्हा शासनाने जनतेच्या हिताविरुद्ध निर्णय घेतले, तेव्हा त्यांनी त्याचा कठोर विरोध केला.
त्यांच्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथात त्यांनी प्रत्येक मनुष्य जन्मतः स्वतंत्र आहे, असा विचार मांडला. हा विचार त्याकाळात अत्यंत प्रगत होता. त्यांनी स्पष्ट केले की, राजकीय-स्वातंत्र्य म्हणजे केवळ सत्ता हस्तांतर नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचे संरक्षण होय.
जोतीराव फुले यांचे राजकीय कार्य हे त्यांच्या सामाजिक कार्याशी अभिन्नरीत्या जोडलेले होते. त्यांनी दाखवून दिले की, सामाजिक समता आणि राजकीय-स्वातंत्र्य हे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. समाजातील विषमता दूर केल्याशिवाय खरे स्वातंत्र्य मिळू शकत नाही. आज त्यांच्या कार्याचा विचार केला असता, हे स्पष्ट होते की, त्यांनी आपल्या काळाच्या खूप पुढे जाऊन विचार केला. त्यांनी समाजाला केवळ दिशा दिली नाही, तर त्या दिशेने चालण्याची प्रेरणाही दिली. महात्मा जोतीराव फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर दूरदृष्टी असलेले राजकीय विचारवंत होते. जातीय विषमतेतून झालेल्या अपमानातून त्यांनी उभा केलेला संघर्ष हा संपूर्ण समाजाच्या मुक्तीचा मार्ग ठरला. त्यांच्या कार्यातून हे स्पष्ट होते की, शिक्षण, समता आणि प्रतिनिधित्व यांचा संगमच खर्या स्वातंत्र्याचा पाया आहे.
सागर देवरे
९९६७०२०३६४