‘उद्योजक’ फुले यांची दृष्टी

    11-Apr-2026
Total Views |
Mahatma Jyotirao Phule
 
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे कार्य केवळ समाजसुधारणेपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी विविध क्षेत्रांत आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ठसठशीत छाप उमटवली. शिक्षण, समता आणि शेतकरी प्रश्नांबरोबरच ‘उद्योजक’ म्हणूनही त्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्यातील हा पैलू आजच्या काळात विशेषतः मार्गदर्शक ठरतो. महात्मा महात्मा जोतीराव फुले यांच्या या उद्योजक दृष्टीचा मागोवा या लेखात घेतला आहे.
 
दि. ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे जन्मलेल्या महात्मा जोतीराव फुले यांनी समाजसुधारणेच्या कार्याबरोबरच उद्योजकतेतही आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याकाळात बहुजन समाजातील लोकांना पारंपरिक बंधनांमध्ये अडकवून ठेवले जात असताना, जोतीरावांनी स्वतंत्र व्यवसाय उभारून स्वावलंबनाचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला. महात्मा फुले यांनी बांधकाम क्षेत्रात कंत्राटी व्यवसाय सुरू केला. ब्रिटिशकालीन सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित विविध कामांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्याकाळात आधुनिक तंत्रज्ञान, साधने आणि यंत्रसामग्रीचा अभाव असतानाही त्यांनी अनेक मोठे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे त्यांना महत्त्वाच्या कामांची जबाबदारी दिली जात असे. खडकवासला धरण, कात्रज बोगदा, पुणे व मुंबईतील अनेक महत्त्वाच्या इमारती, पूल आणि इतर बांधकामांमध्ये त्यांचे योगदान मानले जाते. ही कामे केवळ स्थापत्यदृष्ट्या महत्त्वाची नसून, समाजाच्या विकासासाठी आवश्यक अशी होती. शहरांना पाणीपुरवठा, दळणवळण आणि नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात या प्रकल्पांचा मोठा वाटा होता.
 
महात्मा फुले यांच्या उद्योजकीय कार्याची एक विशेष बाब म्हणजे त्यांनी या व्यवसायातून मिळणारा पैसा स्वतःच्या ऐश्वर्यासाठी न वापरता, समाजहितासाठी खर्च केला. शाळा सुरू करणे, वंचित घटकांसाठी शिक्षणाची सोय करणे, समाजजागृतीचे कार्य राबवणे, यासाठी त्यांनी आपल्या उत्पन्नाचा उपयोग केला. त्यामुळे त्यांची उद्योजकता ही केवळ आर्थिक नव्हती, तर ती सामाजिक बांधिलकीने प्रेरित होती. बांधकाम क्षेत्रात काम करणार्‍या मजूर, शेतकरी आणि गरीब वर्गावर होणारे अन्याय त्यांनी सहन केले नाहीत. त्याकाळात सावकार, मध्यस्थ आणि काही अधिकारी यांच्या मार्फत या कामगारांचे शोषण केले जात होते. महात्मा फुले यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यात मानवी मूल्यांचा आणि न्यायाचा ठाम आग्रह दिसून येतो.
 
प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता हे त्यांच्या उद्योजकीय कार्याचे मुख्य आधार होते. अनेकवेळा भ्रष्टाचारासाठी त्यांना प्रलोभने देण्यात आली; परंतु त्यांनी ती नाकारून आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. कामाची गुणवत्ता आणि समाजहित यांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. स्वतः प्रत्यक्ष जाऊन कामांची पाहणी करणे, प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवणे ही त्यांची कार्यपद्धती होती.
 
महात्मा फुले यांनी स्वयंरोजगाराचा विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिशांच्या नोकरीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसाय उभारून स्वाभिमानाने जगणे अधिक महत्त्वाचे आहे, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला. आजच्या काळात उद्योजकतेला दिले जाणारे महत्त्व पाहता, त्यांच्या या विचारांची प्रासंगिकता अधिक अधोरेखित होते. त्यांच्या उद्योजकतेत दूरदृष्टी होती. केवळ नफा मिळवणे हा उद्देश न ठेवता, समाजाच्या गरजा ओळखून त्यांनी कामे स्वीकारली. पाणीपुरवठा, दळणवळण, नागरी सुविधा यांसारख्या मूलभूत गरजांची पूर्तता करणार्‍या प्रकल्पांमध्ये त्यांनी योगदान दिले. त्यामुळे त्यांची उद्योजकता ही समाजाच्या विकासाशी निगडित होती.
 
महात्मा जोतीराव फुले हे केवळ समाजसुधारक, शिक्षक, लेखक नव्हते; तर ते एक दूरदृष्टी असलेले उद्योजकही होते. त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला स्वावलंबन, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातील उद्योजकतेचा पैलू आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतो. आजच्या आधुनिक युगात उद्योजकतेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा वेळी महात्मा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजहित जपणारी, प्रामाणिक आणि जबाबदार उद्योजकता विकसित करणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या कार्याचा हा पैलू जितका अभ्यासला जाईल, तितकी समाजाच्या प्रगतीची दिशा अधिक स्पष्ट होईल.
 
सरोजिनी देवरे
९२२२१३२६००