तत्त्वचिंतक जोतीराव हे ‘सत्यमेव जयते’ या अमर संदेशाचा पुनरुच्चार करणारे आधुनिक भारतातील पहिले महापुरुष होते. शोषित-वंचित समाजाला त्यांचे हक्क मिळावेत, न्याय मिळावा यासाठी आजन्म कार्य करणारे महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारकार्याचे स्मरण करणारा हा लेख...
देशातील पहिले महात्मा जोतीराव फुले यांनी १५० वर्षांपूर्वीच्या समाजाच्या दारिद्य्राचे मूळ शिक्षणाच्या अभावाने निर्माण झाले, हे ओळखले होते आणि बहुजनांचा उद्धार व्हायचा असेल, तर सर्वार्थाने सकल जाती-धर्मांच्या नागरिकांना शिक्षण दिल्याशिवाय दारिद्य्र दूर होणार नाही, हेही जाणले होते. अनेकदा म. फुले हे ब्राह्मणांचे शत्रू होते, असे चित्र त्याकाळी उभे केले गेले. परंतु, फुले हे ब्राह्मणांचे शत्रू नसून त्याकाळी रुजलेल्या चालीरीतींच्या विरोधात होते, हे काळानुरूप सिद्ध झाले होते.
अनेक अनिष्ट चालीरीतींना फाटा देण्यासाठी त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. महाराष्ट्रात त्याकाळात चुकीच्या पद्धतीने बहुजनांवर अन्याय केला जात होता. म्हणून, कनिष्ठ वर्गातील लोकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी फुले यांनी ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ लिहिला. पुण्यामधील खडकवासला धरणाचे काम पूर्ण झाल्यावर ते पाणी शेतीसाठी खुले करण्यात आले. परंतु, चुकीच्या मानसिकतेतून शेतकरी धरणाचे पाणी वापरायला तयार नव्हते. त्यावेळी फुलेंनी स्वत: शेती विकत घेऊन शेतात बटाटे, फ्लॉवर, ऊस इ. पिकांची लागवड करून इतर शेतकर्यांपुढे आदर्श निर्माण केले. तेव्हापासून इतर शेतकरी आपल्या पिकांना धरणाचे पाणी देऊ लागले. समाजात त्यावेळी फक्त पुरुषांनीच शिक्षण घ्यावे, अशी परंपराच निर्माण झालेली होती.
फुल्यांनी हे हेरून स्त्रीशिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले. स्वत:च्या पत्नीला शिकवून त्यांनी भिडेवाड्यात पहिल्यांदा मुलींची शाळा सुरू केली. बहुजनांतील मुलांनाही प्राधान्याने शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यात सुतार, लोहार, सोनार, चांभार, तसेच गुन्हेगारी जमातीतील मुलांनाही शिक्षणाची गरज आहे. त्यानुसार, त्यांना व्यवसायानुरूप शिक्षण दिले पाहिजे, तसेच शेतकर्यांच्या मुलांनाही आधुनिक शेतीचे शिक्षण दिले पाहिजे, यासाठी फुले आग्रही होते. सरकारी नोकरदारांकडून, काही जुलमी अधिकार्यांकडून शेतकर्यांचे अनेक मार्गाने कसे शोषण होते, या गोष्टी अधोरेखित करून त्यांनी ‘शेतकर्याचा आसूड’ हा ग्रंथ लिहिला. पुण्यात भाजी मंडईत शेतकर्यांचे अनेक मार्गाने शोषण केले जात होते. त्याविरोधात शेतकर्यांची एकजूट करून चुकीच्या प्रथांना लगाम घातला. त्यामुळे कालांतराने मंडईला ‘फुले मंडई’ असे नामांतर करावे लागले. त्यापूर्वी, या मंडईचे नाव ‘रे मार्केट’ असे होते.
जोतीरावांनी ज्या-ज्या गोष्टींची आपल्या मनात चित्रे रेखाटली होती, त्याचा हळूहळू प्रत्यक्षात प्रत्यय येत होता. शेतीची जुनी अवजारे मागे पडून नवीन अवजारे वापरण्याचा शेतकर्यांचा कल वाढीस लागला होता. गामीण भागातील मुलांना व्यवसायाभिमुख शिक्षणाचा आग्रह हळूहळू वाढीस लागून, कृषी विद्यापीठे निर्माण होत होती. ग्रामीण भागातील मुलांसाठी वसतिगृहे सुरू होत होती. मुलींचा शिक्षणाचा आग्रह वाढून, त्यांच्या शिक्षणासाठी समाजातून मागणी वाढत असून, मुलीही शिक्षणात प्रगती करीत आहेत.
महात्मा जोतीराव त्यांच्या पत्र लिहिण्याच्या कागदावर ते ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य लिहीत असत. भारतातील महान संतपुरुषांनी या संदेशावर भर दिलेला आहे. त्या संदेशातील तत्त्व हे हिंदू संस्कृतीची नि परंपरेची मुख्य प्रेरणा आहे. सत्याच्या संदेशाने जोतीरावांचे व्यक्तिमत्त्व भारलेले होते. जोतीरावांनी सत्य हीच आपली पूजनीय देवता मानून तिचीच भक्ती केली. जेव्हा महात्मा गांधी चार वर्षांचे होते, तेव्हा जोतीराव आपल्या प्रभावी व अनुभवयुक्त वाणीने ‘सत्यशोधक समाज’ संस्थेतून सत्याच्या संदेशाचा उपदेश करीत राहिलेले होते.
फुल्यांनी चालवलेल्या शाळांचा दर्जा अतिउत्तम होता. त्यामानाने इतर सरकारी शाळांची प्रगती दयनीय होती. हे बघून इंग्रज शासनाने शिक्षणाचे कार्य हेरून फुल्यांचा भव्य सत्कार केला.
कारखान्यांमधून अनेकदा कामगारांवर अन्याय होत होता. हे बघून फुल्यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना स्थापन केली. अतिशय लहान मुलींचे विवाह त्याकाळी केले जात असत. त्याविरुद्धही फुल्यांनी आवाज उठविला. मुलींना अकाली वैधव्य आले, तर त्यांचे ‘केशवपन’ केले जायचे. त्यावरुद्धही फुल्यांनी चळवळ उभी केली व न्हाव्यांचा अभूतपूर्व संप घडवून आणला व ‘केशवपन’ कायमचे बंद झाले. ‘सती’ची चाल बंद होण्यासाठी फुल्यांनी, समकालीन नेत्यांनी सहकार्य करून ही प्रथाही बंद केली. वाट चुकलेल्या मुली जेव्हा गंभीर होत, तेव्हा त्या विहिरीत आत्महत्या करीत असत. अशा मुलींसाठी सावित्रीबाई आणि जोतिबांनी आपला वाडा ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ या नावाने खुला केला.
स्वत: त्यांचा मुलगा यशवंतही अशाच बालसुधारगृहात जन्माला आलेला होता. मुलींची शाळा चालविण्यात त्यांना सावित्रीमाईंची भक्कम साथ होती. उमेदीच्या काळात महात्मा फुले यांनी अनेक सरकारी कंत्राटे घेऊन चांगले पैसे कमावले होते. काही वर्षे फुले हे पुण्यातील नामवंत ‘उद्योजक’ म्हणून उदयास आले होते. आलेले पैसे ते मुलींचे शिक्षण, वसतिगृहे, दवाखाने चालविण्यासाठी वापरत होते. आयुष्यभर महात्मा फुल्यांनी आपले आयुष्य दीन-दलितांची सेवा करण्यात घालविली. समाजातील सर्वच दलित-शूद्र हे शिकले पाहिजेत, त्याबरोबरच मुलीही शिकल्या पाहिजेत, यासाठी फुले दाम्पत्य आग्रही होते. नव्हे, त्यांनी आपले ध्येयच मानून आयुष्यभर दीन-दलितांची सेवा केली. फुल्यांनी उमेदीच्या काळात अनेक रूढी-परंपरांना कडाडून विरोध केला. प्रसंगी त्यांना आपल्या ब्राह्मण मित्रांच्या रोषालाही बळी पडावे लागले. त्यांचा रोष चुकीचा होता, हे कालांतराने त्यांनीही जाणले होते.
अनेक सामाजिक दुष्ट चालीरीती बंद करण्यासाठी त्यांना बर्याचदा त्यांच्या ब्राह्मण मित्रांनी मदत केली. आगरकर-टिळक हे त्यांचे समकालीन होते. अनेक सामाजिक सुधारणांसाठी ते एकमेकांना मदत करीत होते. ‘कुळवाडीभूषण राजे’ म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला. महाराजांच्या समाधीचा शोधही फुले यांनीच लावला होता. उतरत्या वयात त्यांना लकवा रोगाने ग्रासले. त्यांनी अनेक पुस्तके लिहून बहुजनांमध्ये जागृती घडवून आणली. पुण्यामध्ये ‘पटकी’ रोगाचा प्रसार झपाट्याने होत होता. सावित्रीबाईंनी या कालावधीत दीन-दलितांची सेवा केली. सावित्रीबाईंनाही ‘पटकी’ रोगाने ग्रासले व त्यात त्यांचाही दुर्दैवी अंत झाला. आयुष्यभर या दाम्पत्याने दीन-दलितांची निष्ठेने सेवा केली.
महात्मा जोतीराव फुले हे शेतकरी नेते, कामगार नेते, दीन-दलितांचे नेते म्हणून संपूर्ण देशात उदयास आले होते. हे त्यांचे कर्तृत्व बघूनच ‘भारतरत्न’ बाबासाहेब आंबेडकरांनीही म. फुले यांना दैवत मानले. फुले हे स्वत: शेतकरीपुत्र असल्याने त्यांनी शेतकर्यांनाही मार्गदर्शनपर अनेक सामाजिक सुधारणांसाठी आग्रह धरला. शेतकर्यांना शेतीसाठी नवीन बियाणे मिळावे, नवीन शेती अवजारे मिळावीत, म्हणून त्यांनी इंग्रज शासनाकडे आग्रही मागण्या केल्या होत्या. त्यांचे विचार समाजहितासाठी सदैव प्रेरणा देणारे आहेत. समाजहित आणि समासज प्रगतीसाठी त्यांच्या विचारकार्याला स्मरून काम करणे ही आज काळाची गरज आहे.
सुभाष तिडके
संदर्भ : धनंजय किर (महात्मा ज्योतीराव फुले)
(मखमलाबाद, नाशिक, भारतीय किसान संघ)