प्रत्येक शहराला स्वतःचा असा एक स्वभाव असतो. कालौघात प्रत्येक शहराची एक प्रकृती आणि संस्कृती तयार होते. याच प्रकृतीचं प्रतिबिंब तिथल्या माणसांच्या जीवनामध्येही उमटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रख्यात चित्रकार पूरनेंदू मंडल यांनी आपल्या चित्रांमधून लोकांच्या समोर अशाच शहरांची नक्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने उलगडली आहे. दि. 7 एप्रिल ते 13 एप्रिल या कालावधीमध्ये मुंबईच्या ‘जहांगीर कला दालन’ येथे सकाळी 11 ते सायंकाळी 7 या कालावधीत प्रेक्षकांना त्यांच्या कलाकृतींचा आस्वाद घेता येणार आहे. त्यानिमित्ताने या चित्रप्रदर्शनाचा धांडोळा घेणारा हा लेख...
नदीच्या काठावर मानवी-संस्कृती उदयाला आली. काळाच्या ओघात माणसाला शेतीचं ज्ञान प्राप्त झालं आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर इतर प्राणिमात्रांपेक्षा तो पूर्णपणे वेगळा झाला. हे वेगळेपण टप्प्याटप्प्याने विकसित होत गेलं. म्हणूनच प्रगतीची नवनवीन शिखरं मानवाला गाठता आली. नवनवीन आव्हानांवर मात करत, मानवजातीने अवघ्या विश्वाला बदलून टाकलं. मात्र, आधुनिक काळात या प्रगतीचा, परिवर्तनाचा वेग कैकपटीने वाढला. आधुनिक युगामध्ये माणसाला खऱ्या अर्थाने त्याच्या सामर्थ्याची जाणीव झाली. या सामर्थ्यातून पुढे विश्वयुद्धानेसुद्धा पेट घेतला आणि या पृथ्वीचा केवळ इतिहासच नव्हे, तर भूगोलसुद्धा पूर्णपणे बदलून गेला. आधुनिक युगाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्यं म्हणजे ‘औद्योगिक क्रांती’दरम्यान उदयाला आलेली शहरांची आधुनिक संस्कृती. यंत्रांचा खडखडाट वाढला आणि शेतात राबणाऱ्या पावलांनीही हळूहळू शहरांची वाट धरली.
भारत त्याकाळी इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता. सिंधू-संस्कृतीच्या काळातील वैभव केव्हाच नामशेष झालं होतं आणि परकीय सत्तांच्या लाटा या देशावर येऊन आदळल्या होत्या. अशातच इंग्रजांनी शहरांच्या माध्यमातून नव्या सत्ताकेंद्रांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीसारख्या राजधानीचा डौल कायम होता. मात्र, व्यापार-प्रशासन आदी गोष्टींच्या पार्श्वभूमीवर दोन महानगरं अशी काही उदयाला आली की, या दोन्ही शहरांनी अवघ्या भारतवर्षाचा इतिहास पूर्णपणे बदलला. कोलकाता आणि मुंबई या दोन शहरांनी खऱ्या अर्थाने महानगर नेमकं कसं असतं, याची अनुभूती लोकांना दिली. दोन शतकांहून अधिक काळ आज या शहरांच्या जडणघडणीला झाला आहे. त्यामुळे या शहरांची नक्षी चितारताना, ही संपूर्ण पार्श्वभूमी थोडक्यात लक्षात घेणं गरजेचं. त्यातही पूरनेंदू मंडल यांच्या कलाकृतींचं वैशिष्ट्यं म्हणजे, त्यांनी आपली चित्रं साकारताना या सगळ्या भूमिकांचा सूक्ष्म अभ्यास केलेला दिसतो.
मुंबई आणि कोलकाता ही दोन शहरं, उद्यमशीलतेसाठी प्रसिद्ध. त्यामुळे माणसाच्या जगण्यामध्ये हा जो भिनलेला व्यवहार आहे, तो शहराच्या जडणघडणीमध्ये पुरेपूर उतरला. तैलचित्रांच्या माध्यमातून ही चित्रं साकारताना, शहरांची विविध स्तरांमधली जडणघडण आपल्याला बघायला मिळते. उदाहरणार्थ, मुंबई शहर हे आपल्या वेगासाठी ओळखलं जातं. हीच मुंबई पावसामध्ये मात्र स्वतःचं वेगळं रूप घेऊन लोकांसमोर उभी ठाकते. मुंबईतील पाऊस दर्शवताना मातीच्या रंगाच्या विविध छटा यावेळी चित्रकाराने तिथल्या इमारतींना दिलेल्या दिसतात. पहिल्या पावसानंतर मातीचा येणार सुगंध हा जितका मोहक असतो, तीच संपन्नता या चित्रामध्येही बघायला मिळते. दुसऱ्या बाजूला, ‘गेटवे ऑफ इंडिया’ आणि भोवतालचा परिसर ‘कॅनव्हास’वर चितारताना हेच सौंदर्य आपल्याला बघायला मिळतं. आकाश रंगवण्यासाठी वापरले गेलेले फिकट पिवळे आणि गुलाबी रंग सकाळच्या कोवळ्या उन्हाची अनुभूती देतात. मुंबई कधीही थांबत नाही. मात्र, तरीसुद्धा या शहराच्या अंतरंगात कुठेतरी शांतता आहे, संयम आहे, याची आपल्याला यातून प्रचिती येते. त्याचबरोबर विविध रंगांचा चष्मा लावल्यावर ही शहरं आपल्याला कशी दिसतील, याची प्रचितीसुद्धा काही निवडक चित्रांच्या माध्यमातून चित्रकाराने साकारली आहे. प्रत्येक शहराचं स्वतःचं असं एक जीवन असतं. कारण, प्रत्येक शहर जिवंत असतं. वेगवेगळ्या तऱ्हेने शहरं वाढत राहतात, माणसं वस्त्या करत जातात. हा जिवंतपणा कागदावर आणण्यात चित्रकार यशस्वी झाला आहे. मुंबईमध्ये 20 वर्षांहून अधिक काळ वास्तव्य केल्यानंतर आता-आता या शहराची रूपरेखा मला उमजायला लागली आहे, असं मत चित्रकाराने व्यक्त केलं.
कोलकाता शहराला आजही स्वतःची अशी एक विशिष्ट लय. एका बाजूला प्रगतीची वळणं घेत असताना आपली संस्कृती, आपल्या शहराचं स्वत्व टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्नही कोलकातावासीयांनीही केला. दीडशे वर्षांहून अधिक काळ लोकसेवेत असलेली ‘ट्राम’ आता शेवटच्या घटका मोजत आहे. हीच ओळख मंडल यांनी आपल्या चित्रातून साकारली आहे. इथेसुद्धा पाऊस आहे आणि पावसात भिजून स्थिर उभं असलेलं शहर आहे. कोलकाताच्या रस्त्यांवर आजही वावरत असते, ती हाताने ओढून नेणारी रिक्षा. एक किंवा दोन माणसं या रिक्षामध्ये बसून प्रवास करतात. अशाच एका रिक्षावाल्याचं लोभस चित्रमंडळ मंडल यांनी साकारलं आहे. या चित्रामध्ये एक माणूस आपल्या रिक्षात बसलेला दिसतो. एका बाजूला लोक आपल्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त आहेत आणि हा मात्र एकाकी सगळ्यांच्या मधे शांत आहे. एका कवीने म्हटलेच आहे -
जर म्हणावे एकटा तर
सोबती आहेत लाखो
अन् पहावे तर स्वतःचा
हातही हातात नाहीप्रत्येक शहरामध्ये माणसं कुठल्या ना कुठल्या व्यवस्थेमध्ये अडकलेली आहेत. एकाच वेळेला हजारो माणसं इथून तिथे जात आहेत. मात्र, यांच्यापैकी प्रत्येक जण हा एकाकीपणा अनुभवतो आहे. हा अनुभव सशक्तपणे मांडणं, ही एक वेगळीच कसोटी.
एका बाजूला या महानगरांचं विश्व रेखाटणाऱ्या मंडल यांनी वाराणसीचे घाटसुद्धा तितक्याच ताकदीने उभारले आहेत. आपल्याला इथे विशाल मंदिरं दिसत असली, तरी त्या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या चित्राच्या केंद्रस्थानी आहेत. तिथे लोकांचा प्रवाह आणि प्रवास एकत्र घडतो. श्रद्धेचा एक सुंदर संगम आपल्याला यानिमित्ताने अनुभवायला मिळतो. प्रत्येक कलाकार एका विशिष्ट ध्यानमग्न अवस्थेत आपल्या कलाकृतीची पूर्तता करीत असतो. त्याची तल्लीनता ज्यावेळेला त्याच्या कलाकृतीमध्ये उतरते, तेव्हा ती कसदार बनते. पूरनेंदू मंडल यांनी हाच भाव आपल्या कलाकृतीमध्ये उतरवला आहे, हे निश्चित!