चि. व चि.सौ.का., शांतीत क्रांती, तिघी अशा निरनिराळ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजेच मृण्मयी गोडबोले. मृण्मयी आता पुन्हा एकदा नव्या चित्रपटासह येत आहे आणि तो म्हणजे तो ती आणि फुजी. याचनिमित्ताने मृण्मयीने मुंबई तरुण भारतशी खास संवाद साधला. यावेळी या चित्रपटाविषयी, ललित प्रभाकरसोबतच्या तिच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीविषयी मृण्मयीने दिलखुलास बातचीत केली.
“तो आणि ती” समजतं, पण “फुजी” कोण आहे? आणि या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार?
तर तो ती तू म्हणाल्याप्रमाणे ट्रेलरमधून आपल्या समोर आलेलेच आहेत. पण एक अतिशय महत्त्वाचं पात्र ह्या चित्रपटातला जे आहे फुजी म्हणजे जपान मधला माऊंट फुजी. जो एक एक पर्वत आहे, अर्थातच तो जपान मधला सगळ्यात उंच पर्वत आहे. जपानमध्ये Japanese culture मध्ये. जपानमधील सर्वात उंच आणि भव्य पर्वत म्हणून त्याला विशेष मान आहे, आणि त्याच्याशी जोडलेली जीवनदृष्टी चित्रपटभर जाणवत राहते. सुरुवातीपासूनच त्याचे संदर्भ येत राहतात आणि शेवटी त्याचं भव्य दर्शन होतं. त्यामुळे पात्रांबरोबरच प्रेक्षकांचाही हा प्रवास पूर्णत्वाला जातो, आणि चित्रपटाची फिलॉसोफी ही माऊंट फुजीच्या विचारांशी जोडलेली वाटते.
म्हणजे ही पात्र भारतात भेटतात, प्रेमात पडतात आणि त्या नात्यातली सहजता भारतातल्या भागात दिसते. सात वर्षांनी ते जपानमध्ये पुन्हा भेटतात, तेव्हा ते माणूस म्हणून खूप बदललेले, अधिक परिपक्व आणि स्थिर झालेले असतात. हा बदल दाखवण्यासाठी जपान आणि Mount Fuji ची पार्श्वभूमी प्रभावीपणे वापरली आहे.
“ची व ची सौ का”नंतर तुमची जोडी पुन्हा कशी जमली? कास्टींग कसं ठरलं?
अर्थात हा विचार दिग्दर्शकांच्या मनात कुठेतरी असणारच. आमची दोघांची निवड करतानाही काही सुंदर योगायोग जुळून आले. ‘ची व ची सौ का’मध्ये आम्ही आधुनिक रोमँटीक नात्यावर भाष्य केलं होतं, जे प्रेक्षकांना खूप आवडलं आणि लिव्हइन सारख्या संकल्पनांबाबत स्वीकृती वाढवण्याचं कामही त्या चित्रपटानं केलं. आता काही वर्षांनंतर पुन्हा आम्ही आजच्या शहरी नात्यांबद्दल, त्यातील आव्हाणं आणि प्रेम म्हणजे नेमकं काय यावर आधारित कथा घेऊन आलो आहोत. हा एक योगायोग. दुसरा म्हणजे, ‘ची व ची सौ का’नंतर ललित आणि मी पुन्हा थेट या चित्रपटातच एकत्र आलो, आणि चित्रपटातली पात्रंही सात वर्षांनी भेटतात. म्हणूनच जसं पात्रं पुन्हा एकमेकांना नव्याने शोधतात, तसंच आम्ही कलाकार म्हणूनही एकमेकांना नव्याने समजून घेण्याचा आणि आमच्यात झालेला बदल एक्सप्लोर करण्याचा अनुभव घेतला आणि हेच यामधलं खास वैशिष्ट्य ठरतं.
चित्रपटाप्रमाणेच आजच्या बदलत्या काळातल्या रिलेशनशिप्सकडे तू वैयक्तिक आयुष्यात कसं पाहतेस?
म्हणजे नातं हे इतकं सोपं नसतं. आपण मोठं होताना पाहिलेल्या लव्ह-डव्ही चित्रपटांमध्ये सगळं गोड दिसतं. गाणी, रोमँस, सुंदर क्षण. ते खरं असतं, पण नातं फक्त तेवढंच नसतं. कोणतंही नातं प्रेमाचं असो, मैत्रीचं किंवा कुटुंबातलं टिकवण्यासाठी दररोज प्रयत्न करावे लागतात. ते गृहित धरून चालत नाही. नातं टिकतं ते आपल्या घेतलेल्या निर्णयांमुळे आणि सतत केलेल्या प्रयत्नांमुळे. त्यात दोन्ही बाजूंनी समान योगदान, तडजोड आणि समजून घेणं गरजेचं असतं. “meet me halfway” जसं म्हणतो तसं. आजच्या काळात संपर्क सोपा झाला असला, तरी खरं घेवाण-देवाण आणि सातत्याने केलेली मेहनतच नातं सुंदर आणि मजबूत बनवते.
बऱ्याच फेस्टीवल्समध्ये चित्रपट पाहिला गेलाय त्यामुळे आत्तापर्यंतचा सर्वात लक्षात राहिलेला feedback कोणता?
प्रेक्षकांच्या feedback बद्दल सांगायचं तर पुणे फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपट दाखवला तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही जाणवली की सिनेमा प्रत्येकाला भिडला. नातं कसं हळूहळू बिघडत जातं आणि एक प्रभाव निर्माण होतो, हे प्रेक्षकांनी स्वतःच्या आयुष्यातही अनुभवल्यासारखं वाटलं.
चित्रपटानंतर प्रेक्षकांमध्ये सतत चर्चा होती चूक कोणाची? तो बरोबर की ती? पण कुणालाही ठामपणे एका बाजूने उभं राहता आलं नाही. कारण आयुष्यासारखंच इथेही सगळं काळं णि पांढरं या मध्ये विभागता येत नाही. ही पात्रं अगदी खरी, हाडामासाची वाटतात, ना पूर्ण चांगली, ना पूर्ण वाईट. त्यामुळेच प्रेक्षकांनी फक्त “आवडला” इतक्यावर न थांबता त्या पात्रांवर चर्चा, विवाद करणं सुरू ठेवलं. हाच आमच्यासाठी सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा feedback आहे.
लेटर्स अ लाईफमध्ये विक्रम गोखलेंसोबत काम केलंस तोही चित्रपट आता प्रदर्शित होत आहे. एखादी खास आठवण सांगशील का?
या शॉर्टफिल्म साठी आम्ही फक्त दोन दिवस एकत्र काम केलं, आणि त्या वेळी सेटवर आम्ही दोघंच कलाकार होतो. त्यामुळे तो वेळ खूप खास ठरला. जसं कथेत मी एका ज्येष्ठ व्यक्तीसोबत वेळ घालवते, तसंच काहीसं खर्या आयुष्यात माझं आणि विक्रम काकांचं झालं गप्पा, जेवण, वाडीत फिरणं. त्यांना काम करताना पाहणं हा एक अविस्मर्णिय अनुभव होता. ते संवाद कसे म्हणतात, पॉझ कसे घेतात, भूमिकेत कसे शिरतात ही सगळी प्रक्रिया जवळून पाहायला मिळाली. अचानक पाऊस, छोट्या अडचणी… या सगळ्यांना ते कसं सहज सांभाळतात, हेही शिकायला मिळालं. म्हणूनच हा अनुभव खूपच खास आहे. आजही त्या शॉर्टफिल्मची आठवण झाली की सर्वात आधी विक्रम काकांची आठवण येते एक कलाकार म्हणून ते त्यांच्या कामातून कायम आपल्याबरोबर राहतात.
तुझा आणि ललितचा पडद्यामागचा बॉन्ड कसा आहे?
‘ची व ची सौ का’च्या वेळी आम्ही पहिल्यांदा भेटलो. तेव्हा एकमेकांना अजिबात ओळखत नव्हतो, पण त्या चित्रपटादरम्यान आणि वर्कशॉप्स, कुंगफू ट्रेनिंगमुळे आमची मैत्री झाली. सुरुवातीला बॉन्ड नवीन होता, पण नंतर एकत्र नाटकं, सीरिज केल्यामुळे तो खूप मिसळून गेलो. हेच या चित्रपटासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. कारण नातं फक्त संवादातून नाही, तर त्या सहजतेतून आणि एकमेकांच्या देवाण-घेवाणीतून दिसतं. आम्ही एकमेकांची कलाकार म्हणून खूप प्रशंसा करतो आणि एकत्र मोठे ही झालो आहोत.
आमची संवेदनशीलता, आवडी-निवडी आणि कामाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बऱ्यापैकी जुळतो. त्यामुळे एकत्र काम करताना एक खास सहकार्यशक्ती तयार होते आणि हा bond आमच्यासाठी खूप special आहे.
तुझ्या कामासाठी कुटुंबातून मध्ये सर्वात जास्त प्रशंसा किंवा फिडबॅक कोणाकडून मिळतं?
माझी आई खूप पक्षपाती biased आहे असं मी नेहमी म्हणते, कारण पहिली प्रशंसा नेहमी तिच्याकडूनच मिळते. तिला मला पडद्यावर पाहायला खूप आवडतं आणि ती माझे सगळेच सिनेमे पुन्हा पुन्हा पाहते. तसेच भावाचे, वहिनीचेही पाहते. माझी वहिनी (गिरीजा ओक) आणि मी दोघीही अभिनेत्री असल्यामुळे आमच्यात वेगळ्याच चर्चा होतात एकमेकींना समजून घेणं, प्रेरित करणं. भाऊ आणि वडील मात्र प्रामाणिकपणे टीका करतात, आणि ते खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यातूनच ग्रोथ होते. त्यामुळे आईची प्रशंसा आणि त्यांची टीका—असं एक छान संतूलन घरात तयार होतं.
- अपर्णा कड