धोरणात्मक स्थैर्याची फलश्रुति

    11-Apr-2026
Total Views |

आशिया-प्रशांत क्षेत्रातील गुंतवणूक प्रवाहांमध्ये भारत अग्रस्थानी असल्याचे एका ब्रिटिश संस्थेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. गेल्या दशकात भारत सरकारने राबवलेल्या सुसंगत आणि दूरदृष्टीपूर्ण आर्थिक धोरणांची ही ठोस पावतीच म्हणावी लागेल. जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेची धोरणात्मक परिपक्वतेमुळेच गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. आशिया-प्रशांत क्षेत्रातील 31 टक्के गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देणे, हीच बाब विशेष उल्लेखनीय. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात तंत्रज्ञान क्षेत्राचा वाटा 29 टक्के, वित्तीय सेवा क्षेत्राचा 15 टक्के आणि ‌‘आयटी‌’ सेवा क्षेत्राचा वाटा 13 टक्के आहे. या सर्व क्षेत्रांतील वाढती गुंतवणूक भारताच्या आर्थिक परिवर्तनाचे प्रतीक ठरते आहे. या क्षेत्रांतील प्रगती हे नवतंत्रज्ञानाच्या स्वीकारासाठी सरकारच्या आग्रही भूमिकेचे फलित म्हणावे लागेल. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप परिसंस्थांना मिळालेल्या प्रोत्साहनामुळे, भारताने जागतिक स्तरावर आपली एक वेगळीच छाप सोडली आहे.

देशांतर्गत उत्पादनाचा वाढता परिघ हेदेखील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे मुख्य कारण. उत्पादन क्षमता वाढविणे, निर्यातवृद्धी साधणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, या त्रिसूत्रीवर सरकारने ठामपणे काम केल्याने भारताची अर्थव्यवस्था उत्पादन क्षेत्रातही लक्षणीय कामगिरी करत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारातही भारताने दाखवलेला मुत्सद्दीपणा आणि चातुर्य उल्लेखनीय असेच. अमेरिकेच्या व्यापारी शुल्काचा सामना करताना, भारताने संयम राखत पर्यायी बाजारपेठांचा शोध घेतला आणि विविध देशांशी संतुलित करार करून निर्यातवाढीचा मार्ग खुला ठेवला. याचबरोबर, ‌‘आरबीआय‌’ने अवलंबिलेली लवचीक मौद्रिक धोरणेही या प्रवासातील महत्त्वाचा आधारस्तंभ ठरली आहेत. चलनवाढ नियंत्रणात ठेवताना विकासालाही चालना देण्याचा संतुलित दृष्टिकोन ‌‘आरबीआय‌’ने सातत्याने ठेवला आहे. त्यामुळेच आज भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास एका शाश्वत गतीने होत असून, दीर्घकालीन फायद्याच्या आशेने परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करणारा ठरत आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीवर ब्रिटनच्या या अहवालानेच शिक्कामोर्तब केल्याने भारतीय अर्थव्यवस्थेची ‌‘मृत‌’ म्हणत, निर्भत्सना करणाऱ्यांचा मुखभंग झाला आहे.

दंभे करी भक्ती, सोंग दावी जना

मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील सतदेव गावामध्ये सलग 21 दिवस झालेल्या अनुष्ठानानिमित्ताने 11 हजार लीटर दूध नर्मदा नदी पात्रात अर्पण करण्यात आले. इतके दूध नर्मदा नदीला अर्पण केल्याच्या घटनेने वाद निर्माण झाला असून, त्यावर विविध मतमतांतरे समोर येत आहेत. अनुष्ठानकर्त्यांची ही कृती श्रद्धा असून, पवित्र भावनेने ते केल्याचे मत आयोजकांकडून व्यक्त करण्यात आले, तर त्याच्या विरुद्ध बाजूला अंधश्रद्धा, पर्यावरणाची हानी, मध्य प्रदेशातील कुपोषित बालकांची समस्या असे विविध मुद्दे चर्चेत आले. भारतीय संस्कृतीमध्ये नदीचे अस्तित्व केवळ भौतिक नसून, ती चैतन्य मानली जाते. या दृष्टिकोनातून पाहता, नर्मदेप्रती व्यक्त झालेली भावना निःसंशय पवित्र आहे. मात्र, तिच्या अभिव्यक्तीचे स्वरूप विचारात घेण्याची आवश्यकता आज अधिक प्रकर्षाने जाणवते. वास्तविक, भक्ती हा अंतर्मुखतेचा प्रवास. भक्तीची व्याख्या करताना भक्तिसूत्रात नारद मुनी म्हणतात, ‌‘सा त्वस्मिन्‌‍ परम्‌‍ प्रेमरूपा|‌’ अर्थात, मनामध्ये निर्माण होणारे शुद्ध प्रेम म्हणजे भक्ती होय. परमेश्वरप्राप्ती आपण केवळ आपल्या अंतरात्म्यात प्रेमतत्त्वाची जोपासना करूनच करू शकतो. त्यामुळे प्रेमस्वरूप असलेल्या भक्तीला दिखाव्याची गरज नाही. परिणामी, हजारो लीटर दूध नदीत अर्पण करणे ही भक्ती आहे की प्रदर्शन, हा प्रश्न टाळता येत नाही.

हिंदू संस्कृतीचा संदेश ‌‘सर्वभूतहिते रताः‌’ असा आहे. यामध्ये सर्व जीवांच्या कल्याणाचा विचार अंतर्भूत आहे. त्यामुळेच भक्ती करताना हा विचार मूळस्थानी असणे आवश्यक. भक्ती आणि अवडंबर यामधील भेद अत्यंत सूक्ष्म असला, तरी तो ओळखणे आज प्रत्येकालाच अपरिहार्य आहे. अवडंबर हे बाह्य प्रदर्शनावर आधारलेले असते; तर भक्ती मनाच्या शुद्धतेतून व्यक्त होते. म्हणूनच, ‌‘अंतरीं निर्मळ वाचेचा रसाळ| त्याचे गळां माळ असो नसो‌’ असे तुकोबाराय म्हणतात. ‌‘संपूर्ण चातुर्मास‌’ पुस्तकात असलेली आणि श्रावणात वाचण्यात येणारी ‌‘खुलभर दुधाची‌’ कहाणीदेखील याठिकाणी पथदर्शन करणारी ठरते. नर्मदेच्या काठावर घडलेली ही घटना भक्तीच्या मूळ तत्त्वांचा पुनर्विचार करण्याची एक संधी आहे. अशा घटना टाळण्यासाठी ‌‘दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे‌’ हा समर्थ रामदास स्वामींचा संदेश उपयुक्त ठरणार आहे. कोणत्याही परंपरेचा आदर राखत, तिचा आशय समजून घेतला; तरच अनेक कृतींचे स्वरूप बदलू शकते.

- कौस्तुभ वीरकर