मुंबई : (Deonar Dumping Ground) देवनार कचरा डेपो परिसरातील रहिवाशांना अखेर मोठा दिलासा मिळाला असून, नुकत्याच मिळालेल्या किनारी नियमन क्षेत्र (सीआरझेड) मंजुरीमुळे देशातील सर्वात मोठ्या आणि ब्रिटीश काळापासून अस्तित्वात असलेल्या या कचरा डेपोच्या स्वच्छतेचा मार्ग मोकळा झाला आहे.
अनेक दशकांपासून हा विस्तीर्ण कचरा डेपो वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटना आणि गंभीर आरोग्य धोक्यांसाठी कुप्रसिद्ध राहिला आहे. दरवर्षी येथे लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे आकाशात विषारी धुराचे लोट पसरतात आणि परिसरातील नागरिकांच्या जीवनावर तसेच उपजीविकेवर मोठा परिणाम होतो. २०१६ आणि २०१८ मधील आगींच्या घटना जीवित व मालमत्तेच्या मोठ्या नुकसानीच्या तीव्र आठवणी आजही ताज्या आहेत. सीआरझेड मंजुरीमुळे या कचरा भूमीवर साचलेल्या जुन्या कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यामुळे वायू गुणवत्ता, जमीन वापर आणि सार्वजनिक आरोग्यात लक्षणीय सुधारणा होणार आहे. त्यामुळे दीर्घकाळ या परिस्थितीला सामोरे गेलेल्या नागरिकांमध्ये आता आशादायी वातावरण आहे. (Deonar Dumping Ground)
तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात साचलेल्या ज्वलनशील मिथेन वायूमुळे याभागात वारंवार आग लागते. शहरी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, देवनार येथील बायो-मायनिंग ही केवळ स्वच्छता मोहीम नसून, ती एक व्यापक पुनरुज्जीवन प्रक्रिया आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून निर्मूलन झाल्यानंतर या जागेचा भविष्यात सार्वजनिक उपयोगासाठी पुनर्वापर करता येऊ शकतो. (Deonar Dumping Ground)
“आम्ही अनेक वर्षे धूर, दुर्गंधी आणि आरोग्य समस्यांमध्ये जगलो आहोत. जर ही स्वच्छता प्रत्यक्षात झाली, तर आमचे जीवनच बदलून जाईल. उन्हाळा असो वा पावसाळा, या विषारी कचऱ्याचा आमच्या आरोग्यावर परिणाम होतच राहतो.”
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.