मुंबईत मेट्रो नंतर आता पॉड टॅक्सीचे जाळे विस्तारणार

Metro Connectivity : नवी मुंबई, मुंबई महानगरात 3 पॉड टॅक्सी प्रकल्प काशीगाव–दहिसर मेट्रोलाही गती

Total Views |
METRO MMRDA
 
मुंबई :(Metro Connectivity)मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला वेग आणि दिशा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहेत. यासंबंधित राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार, दि.१० एप्रिल रोजी आयोजित या बैठकीनंतर मंत्री सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
दरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत काशीगाव ते गायमुख मेट्रो मार्ग पुढे दहिसर चेक नाक्यापर्यंत वाढवून मेट्रो लाईन ९शी जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठी सुमारे ₹८,५५३ कोटींचा खर्च अपेक्षित असून, पुढील आठवड्यात निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यानंतर तीन ते चार महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले. या जोडणीमुळे ठाणे, मीरा-भाईंदर आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे.(Metro Connectivity)
 
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “काशीगाव ते गायमुख आणि पुढे दहिसरपर्यंतची मेट्रो कनेक्टिव्हिटी (Metro Connectivity) ही या परिसरातील नागरिकांसाठी गेमचेंजर ठरणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प आता वेगाने पूर्णत्वास नेण्याचा आमचा निर्धार आहे.”(Metro Connectivity)
 
पुढे त्यांनी माहिती दिली की, घोडबंदर मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी विद्यमान ३० मीटर रुंदीचा रस्ता ६० मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. सुमारे ५.५ ते ६ किलोमीटर लांबीचा हा काँक्रीट रस्ता तयार करण्यासाठी अंदाजे ₹१,२०० कोटी खर्च करण्यात येणार असून, जमीन संपादनासाठी अतिरिक्त ₹१५० ते ₹२०० कोटी खर्च अपेक्षित आहे. या कामामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामध्ये आदिवासी जमिनींचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने त्या बांधवांना न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण प्रक्रिया एमएमआरडीए मार्फत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे.(Metro Connectivity)
 
दरम्यान, भविष्यातील शहरी वाहतूक व्यवस्थेचा विचार करून पॉड टॅक्सी प्रकल्पालाही गती देण्यात येत आहे. मुंबईतील बीकेसीमध्ये सुरू झालेल्या प्रकल्पाच्या धर्तीवर ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई येथे सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सहा महिन्यांत सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण करून २०२९ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याबाबत सरनाईक यांनी स्पष्ट केले की, “पॉड टॅक्सी ही भविष्यातील वाहतूक व्यवस्था आहे. ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये हा प्रकल्प राबविल्यास वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल होईल.”(Metro Connectivity)

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.