'आरोग्य आणि निरामयता’ विषयक परिसंस्थेला बळकटी देण्याचे लक्ष्य

    10-Apr-2026
Total Views |
Homeopathy in India
 
दरवर्षी दि. १० एप्रिल हा दिवस ‘जागतिक होमिओपॅथी दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी ‘शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी’ अशी या दिनाची संकल्पना आहे. यानिमित्ताने, ‘होमिओपॅथी चिकित्सा पद्धती’ केवळ वैयक्तिक आरोग्य सुधारण्यातच नव्हे; तर परवडणारे, पर्यावरणपूरक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वसमावेशक आरोग्यविषयक ‘मॉडेल’ उभारण्यात कशी योगदान देत आहे, यावर विचार करण्याची ही योग्य वेळ आहे.
 
भारत आज सर्वांसाठी समान, सर्वसमावेशक आणि सर्वांगीण आरोग्य-पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेने पुढे जात असताना, आपण एक मूलभूत प्रश्न विचारला पाहिजे; देशातल्या शेवटच्या गावातील तळगाळातल्या व्यक्तीपर्यंत योग्य त्यावेळी दर्जेदार आरोग्यसेवा कशी पोहोचवता येईल?
 
याचे उत्तर, केवळ पायाभूत सुविधांचा विस्तार किंवा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर यात सामावलेले नाही; तर लोकांना सहज उपलब्ध, परवडणार्‍या आणि समाजासाठी विश्वासार्ह ठरतील अशा बळकट व्यवस्था उभारण्यात आहे. याअनुषंगाने, ‘होमिओपॅथी’ भारतीय पारंपरिक औषध प्रणालींसह एक शांत; परंतु प्रभावी शक्ती म्हणून उदयास येत आहे, जी तळागाळातील सर्वांगीण आरोग्य व्यवस्थेत परिवर्तन घडवते आहे.
 
आदिवासी भाग, दुर्गम ग्रामीण प्रदेश आणि शहरातील दुर्लक्षित समुदायांमध्ये ‘होमिओपॅथी’ आरोग्यसेवा पुरवठ्यातील महत्त्वाच्या उणिवा भरून काढत आहे. तिचा प्रभाव केवळ तिचा परिणाम किती होतो, यावर मोजला जात नाही; तर जिथे सर्वाधिक गरज आहे, त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याच्या तिच्या क्षमतेवर आधारित आहे.
 
दरवर्षी दि. १० एप्रिल हा दिवस ‘जागतिक होमिओपॅथी दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी ‘शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी’ अशी या दिनाची संकल्पना आहे. यानिमित्ताने, ‘होमिओपॅथी चिकित्सा पद्धती’ केवळ वैयक्तिक आरोग्य सुधारण्यातच नव्हे; तर परवडणारे, पर्यावरणपूरक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वसमावेशक आरोग्यविषयक ‘मॉडेल’ उभारण्यात कशी योगदान देत आहे, यावर विचार करण्याची ही योग्य वेळ आहे.
 
१८व्या शतकात सॅम्युअल हॅनिमन यांनी विकसित केलेली ही ‘पॅथी’ १९व्या शतकात भारतात आली. ‘सीमिलिया सीमिलिबस युरेंटर’ (Similia Similibus Curentur) म्हणजेच, ‘सारख्याने सारखे बरे होते’ या तत्त्वावर ‘होमिओपॅथी’ आधारित आहे. काळाच्या ओघात, ती भारताच्या विविधतेने नटलेल्या आरोग्य व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनली आहे. हिचे वैशिष्ट्य म्हणजे, ती रुग्णकेंद्री आणि सर्वांगीण दृष्टिकोन असलेली चिकित्सा पद्धती आहे.
 
तळागाळात ‘होमिओपॅथी’चे ओळखले जाणारे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांची सातत्यता. अनेक दुर्लक्षित भागांमध्ये ही आरोग्यसेवा तात्पुरती नसून निरंतर आणि डॉक्टर-रुग्ण यांच्यातल्या प्रदीर्घ नातेसंबंधांवर आधारित असते. दीर्घकालीन आजार, पुनरावृत्ती होणारे संसर्ग आणि जीवनशैलीशी संबंधित विकारांच्या व्यवस्थापनात ‘होमिओपॅथी’चा व्यक्ती-विशिष्ट उपचारांचा दृष्टिकोन डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात दीर्घकालीन बंध निर्माण करतो. यामुळे उपचार-पथ्ये यांचे पालन आणि पर्यायाने एकूण आरोग्यावर परिणाम, यात लक्षणीय सुधारणा दिसते.
 
आज भारतात २९०पेक्षा अधिक ‘होमिओपॅथिक’ वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये आहेत. तसेच देशभरात मोठे वैद्यकीय जाळे आहे. मात्र, ‘होमिओपॅथी’चा खरा प्रभाव संस्थांमध्ये नव्हे, तर समाजातील प्रत्यक्ष उपचारांत दिसून येतो. झारखंडच्या आदिवासी जिल्ह्यांमध्ये, छत्तीसगढच्या जंगल पट्ट्यात आणि हिमाचल प्रदेशातील दुर्गम वसाहतींमध्ये, अशा ठिकाणी एकच डॉटरदेखील संपूर्ण समुदायाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम घडवू शकतो.
 
‘होमिओपॅथी’ची एक महत्त्वाची ताकद म्हणजे तिचे सुलभ असणे. ही औषधे स्वस्त, वाहतुकीस सोपी असतात आणि साठवणुकीसाठी काही गुंतगुंतीची व्यवस्थाही आवश्यक नसते. ज्या भागांमध्ये पुरवठा साखळी कमकुवत आहे आणि आरोग्य कर्मचारी कमी आहेत, अशा ठिकाणी ही वैशिष्ट्ये अत्यंत महत्त्वाची ठरतात.
 
आपल्या लोकसंख्येचा मोठा भाग असलेल्या आणि ज्यांना अनेकदा आजारांचा अधिक भार सहन करावा लागतो, अशा आदिवासी समाजासाठी, आरोग्यसेवा त्यांच्या संस्कृतीशी सुसंगत असणेही आवश्यक असते. ‘होमिओपॅथी’चा सौम्य आणि आक्रमक नसलेला दृष्टिकोन, पारंपरिक उपचार पद्धतींशी सुसंगत असल्यामुळे ती अधिक स्वीकारार्ह आणि सुलभ ठरते.
 
या क्षमतेची दखल घेत, भारत सरकारने ‘होमिओपॅथी’ला मुख्य प्रवाहातील आरोग्यसेवेत समाविष्ट करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. ‘राष्ट्रीय आयुष’ अभियानांतर्गत, १२ हजार, ५००हून अधिक ‘आयुष्मान आरोग्य मंदिरे (आयुष)’ स्थापन करण्यात आली आहेत, इथे सामुदायिक पातळीवर सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवा दिली जाते, ज्यामध्ये ‘होमिओपॅथी’चाही समावेश आहे.
 
आणखी एक महत्त्वाचे म्हणजे, ‘होमिओपॅथी’ भारतातील असंसर्गजन्य म्हणजे जीवनशैलीच्या आजारांशी लढण्यासाठीही योगदान देत आहे. ‘केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषदे (CCRH)’ने मधुमेह, हृदयविकार आणि इतर दीर्घकालीन आजारांसाठी राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये ‘होमिओपॅथी’चा समावेश केला आहे; जे तिचे प्राथमिक आरोग्यसेवेपलीकडील महत्त्व अधोरेखित करते.
 
त्याहीपेक्षा उत्साहवर्धक बाब म्हणजे, वैद्यकीय-सेवा देण्याची नवनवीन ‘मॉडेल्स’ विकसित केली जात आहेत. ‘आयुष्मान आरोग्य मंदिरां’मध्ये सर्व चिकित्सा-सेवा एकाच जागी दिल्या जात असल्याने त्यांची उपलब्धता आणि विश्वासार्हता दोन्ही वाढली आहे. ‘मोबाईल वैद्यकीय युनिट्स’ दुर्गम भागात पोहोचत आहेत, तर समुदाय संपर्क उपक्रम आणि साथीच्या रोगांवरील प्रतिसादात्मक अभियानांमध्ये विविध सार्वजनिक आरोग्य परिस्थितींमध्ये ‘होमिओपॅथी’ची उपयुक्तता सिद्ध केली आहे.
 
सर्वात प्रभावी मॉडेल म्हणजे, मूलभूत होमिओपॅथी प्रशिक्षण घेतलेले समुदाय आरोग्य कार्यकर्ते. योग्य ज्ञान आणि संदर्भ व्यवस्थेच्या मदतीने, हे कार्यकर्ते कमी खर्चात आरोग्यसेवा मोठ्या प्रमाणावर वाढवू शकतात. समुदायआधारित दृष्टिकोनामुळे अधिक प्रभावी परिणाम घडू शकतात, हे ‘स्वास्थ्य रक्षा’ आणि ‘सीसीआरएच’ने राबवलेल्या उपक्रमांनी आधीच सिद्ध केले आहे.
आगामी काळात, शाश्वत आरोग्य आणि कल्याण यांचे महत्त्व अधिक अधोरेखित होईल. आजारांवरील वाढते खर्च, दीर्घकालीन दुर्धर आजारांचा वाढता भार आणि प्रतिजैविक प्रतिकारासारख्या नव्या आव्हानांसाठी प्रभावी, तसेच आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ उपायांची गरज आहे.
 
‘होमिओपॅथी’ चिकित्सा आणि उपचार या दृष्टिकोनाशी सुसंगतच आहे. तिच्या कमी खर्चाच्या उपचारांमुळे कुटुंबे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील आर्थिक ताण कमी होतो, तसेच या चिकित्सा पद्धती पर्यावरणाला हानिकारक नसल्याने पर्यावरणपूरक आरोग्य पद्धतींना यातून प्रोत्साहन मिळते. आता आपले लक्ष्य या प्रयत्नांचा विस्तार करण्यावर असले पाहिजे - दुर्गम भागांमध्ये प्रशिक्षण वाढवणे, औषधे अखंड उपलब्ध असतील हे सुनिश्चित करणे, सखोल संशोधन आणि दस्तऐवजीकरणाला प्रोत्साहन देणे आणि सामुदायिक आरोग्य कार्यकर्त्यांना सक्षम करणे. जेव्हा दर्जेदार आरोग्यसेवा प्रत्येक नागरिकापर्यंत भौगोलिक किंवा सामाजिक-आर्थिक स्थितीचा भेदभाव, तसेच अडथळे न येता पोहोचेल, त्याचवेळी ‘विकसित भारत’ ही संकल्पना खर्‍या अर्थाने साकार होईल. ‘होमिओपॅथी’ तिच्या समुदायाशी असलेल्या मजबूत नात्यामुळे आणि शाश्वत दृष्टिकोनामुळे हे उद्दिष्ट साध्य करण्यात अत्यंत प्रभावी भूमिका पार पाडू शकेल.
 
आपल्या आरोग्य व्यवस्थेची खरी कसोटी तिच्या सर्वांत प्रगत सुविधांमध्ये नाही, तर समाजाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लोकांची सेवा करण्याच्या क्षमतेत आहे. जेव्हा एखाद्या दुर्गम गावातील कुटुंबाला साध्या, परवडणार्‍या उपचाराने दिलासा मिळतो, तेव्हा त्यातून एक मजबूत संदेश दिला जातो- भारतामधील आरोग्यसेवा अधिक समावेशक, अधिक मानवी आणि खर्‍या अर्थाने सर्वव्यापक होत आहे.
 
- प्रतापराव जाधव  
 
(लेखक आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आहेत.