घाटगेंची घरवापसी

    10-Apr-2026
Total Views |
Samarjitsinh Ghatge
कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील नेते आणि ‘शाहू उद्योगसमूहा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना भारतीय जनता पक्षातच आपले भवितव्य आणि हित असल्याचे जाणवल्याने पुन्हा त्यांची घरवापसी झाली. बुधवार, दि. ८ एप्रिल रोजी आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईत समरजितसिंह घाटगे यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खा. धनंजय महाडिक, राजवर्धन नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे, मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले की, "यापुढे पक्ष आदेशानुसार चालायचे ठरवले आहे. पक्षाकडून जी जबाबदारी सोपवली जाईल, ती पार पाडण्यासाठी आम्ही जोमाने काम करून पक्षाची विचारधारा गावागावांत, घराघरांत पोहोचवू.” बर्‍याच दिवसांपासून अनेकवेळा मंत्रालय येथे, तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनातदेखील घाटगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या.
 
मुळात २०१५ मध्ये भाजपमधूनच त्यांचे सक्रिय राजकारण सुरू झाले होते. त्यांनी भाजपची कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारीदेखील सांभाळली होती. मात्र, २०१९ मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवारी न मिळाल्याने घाटगेंनी अपक्ष म्हणून, तर २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी घाटगेंचा पराभव केला. कागलचे राजकारण यामुळे ढवळून निघाले होते. महायुतीची सत्ता आल्यानंतरही हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर, बर्‍याच वेळा घाटगे यांच्या भाजपच्या नेत्यांशी भेटीगाठी वाढल्या होत्या. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातील टोकाचे वैर संपवण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती आणि दोघांना एकत्र काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार, दोन्ही गटांकडून २०२५ मध्ये संघर्षाला पूर्णविराम देऊन अनेक स्थानिक निवडणुका एकत्र लढवल्या गेल्या आणि त्यात यशही मिळविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि समरजितसिंह घाटगे यांचे फार चांगले संबंध आहेत. त्याचा फायदा घाटगे यांना होऊ शकतो. २०२९ साली विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनादेखील होणार आहे. त्यामुळे पक्षप्रवेशाचाही ‘टायमिंग’ घाटगे यांनी साधल्याची राजकीय चर्चा आहे.
प. महाराष्ट्रात ‘कमळ’
 
पश्चिम महाराष्ट्रात एकेकाळी औषधापुरता असलेला भाजप आता मात्र पूर्ण स्थिरावला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यात एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा होता. प. महाराष्ट्र म्हणजे ऊस, सहकार, साखर कारखाने, दुग्धव्यवसायावर चालणारे राजकारण. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत प. महाराष्ट्रात अवघ्या दोन जागा जिंकणार्‍या, भाजपने त्याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मात्र तब्बल २९ जागा जिंकल्या. नगरपालिका आणि नगर परिषदेतील निवडणुकीतही पश्चिम महाराष्ट्रात ५५ पैकी २३ ठिकाणी भाजपने यश प्राप्त केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतदेखील सातारा आणि सोलापूरमध्ये भाजपला चांगले यश मिळाले. राज्याच्या निवडणुकीत भाजपने २०१७च्या निवडणुकीतील विजयाचा विक्रम मोडीत काढला होता, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले होते.
 
प. महाराष्ट्रातील सातार्‍याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कोल्हापूरचे स्वर्गीय सुभाष वोरा, स्वर्गीय बाबा देसाई, तसेच विद्यमान खासदार धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, आ. शिवाजी पाटील, अध्यक्ष विजय जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, महेश जाधव, तर सांगलीत आ. सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, सुरेश खाडे, संजयकाका पाटील, नीता केळकर, सोलापूरमधील मंत्री जयकुमार गोरे, विजय देशमुख, सुभाष देशमुख, पुण्यातील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, स्व. गिरीश बापट यांसह अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजप पश्चिम महाराष्ट्रात वाढवला. सध्या अहिल्यानगर येथील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले यांच्या विरोधातील प्रबळ दावेदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची यशस्वी माघार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाने यशस्वी झाली आहे. त्यामुळे ती निवडणूक भाजपसाठी सोपी जाणार आहे. राज्यातील अग्रणी ‘गोकुळ दूध संघा’च्या निवडणुकीचे पडघम लवकरच वाजतील. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सहकारात पाय अजून घट्ट करण्यासाठी ‘गोकुळ’मध्येसुद्धा भाजप ‘एन्ट्री’ करणार, यात शंका नाही.
- अभिनंदन परूळेकर