‘पॉड टॅक्सी’ : मुंबईच्या शहरी वाहतुकीला नवा वेग

Total Views |
 
Pod Taxi
 
'मुंबई इन मिनिट्स’ या संकल्पनेवर आधारित महानगराच्या विकासावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले. त्यांच्या या महत्त्वाकांक्षी ‘व्हिजन’अंतर्गतच मुंबईत जगभरातील अद्ययावत वाहतूक प्रणाली उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. मेट्रो, मोनो, जलवाहतूक अशा बहुआयामी वाहतूक प्रणालींसोबतच भविष्यात मुंबईत ‘पॉड टॅक्सी’ सेवाही प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. नुकतेच ‘बीकेसी’ मार्गे वांद्रे ते कुर्ला या मार्गावर धावणार्‍या ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले. त्यानिमित्ताने ‘पॉड टॅक्सी’ या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील आधुनिक दळणवळण पर्यायाचा आढावा घेणारा हा लेख...
 
मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात वाहतुककोंडी, वेळेचा अपव्यय आणि प्रदूषण ही तीन मोठी आव्हाने प्रवाशांबरोबरच सरकारसमोरही उभी असतात. या पार्श्वभूमीवर ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’कडून प्रस्तावित ‘स्वयंचलित जलद वाहतूक प्रणाली’ अर्थात, ‘पॉड टॅसी’ प्रकल्प हा शहराच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणणारा प्रकल्प ठरणार आहे. विशेषतः वांद्रे-कुर्ला संकुल शहरातील गजबजलेल्या व्यापारी केंद्राला अधिक कार्यक्षम, जलद आणि पर्यावरणपूरक ‘कनेटिव्हिटी’ प्रदान करण्याचा यामागील मुख्य उद्देश आहे.
 
‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची एकूण लांबी ८.८५ किमी असून, त्यामध्ये २२ अत्याधुनिक स्थानके उभारण्याचे नियोजन आहे. या स्थानकांमधील अंतर साधारणतः २०० मीटर ठेवण्यात येणार असल्याने प्रवाशांना सहजपणे ही सेवा उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात ३.३६ किमीचा मार्ग विकसित करण्यात येणार असून, कुर्ला ते वांद्रे (पूर्व) या मार्गावर आठ महत्त्वाची स्थानके असतील. कुर्ला, ‘एलबीएस’ मार्ग, ‘एमएमआरडीए पे अ‍ॅण्ड पार्क’ (जी ब्लॉक), ‘बीडीबी गेट-११’, वांद्रे (पूर्व), कलानगर, जुनी ‘एमएमआरडीए’ इमारत आणि उत्पादन शुल्क विभाग ही त्या टप्प्यातील स्थानके आहेत.
 
चालकविरहित प्रणाली
 
‘पॉड टॅक्सी’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ही प्रणाली पूर्णपणे स्वयंचलित आणि चालकविरहित आहे. ‘एआय’ आधारित तंत्रज्ञानामुळे प्रत्येक ‘पॉड’ सुरक्षित, अचूक आणि कार्यक्षम पद्धतीने चालवले जाते. प्रत्येक ‘पॉड’मध्ये सहा प्रवासी बसू शकतात आणि ते बॅटरीवर चालणार्‍या समर्पित मार्गिकेवर धावते. ही ‘पॉड्स’ जास्तीत-जास्त ४० किमी प्रतितास वेगाने धावतात आणि केवळ १५ सेकंदांच्या अंतराने एकमेकांच्या मागोमाग येतात, ज्यामुळे प्रतीक्षा वेळ अत्यल्प राहतो.
 
‘डिमांड’आधारित थांबा
 
या प्रणालीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ‘डिमांड’आधारित थांबा. म्हणजेच, प्रवाशांनी ज्या स्थानकासाठी बुकिंग केले आहे, त्याच स्थानकात ‘पॉड टॅक्सी’ थांबेल. इतर स्थानकांवर थांबा नसल्याने प्रवाशांच्या वेळाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. ही सुविधा खासगी वाहनांसारखीच अनुभव देणारी असून, सार्वजनिक वाहतुकीत एक नवीन संकल्पना म्हणावी लागेल. ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्प ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ (पीपीपी) तत्त्वावर राबविला जाणार आहे. यामुळे राज्य सरकार किंवा ‘एमएमआरडीए’वर प्रकल्पाचा आर्थिक भार पडणार नाही. उलट, या प्रकल्पातून महसूल उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. हे ‘मॉडेल’ दीर्घकालीन वाहतूक व्यवस्था आणि कार्यक्षम व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे ठरते.
 
‘फर्स्ट आणि लास्ट माईल कनेटिव्हिटी’
 
‘पॉड टॅक्सी’ प्रणाली ‘बीकेसी’ला मुंबईच्या प्रमुख उपनगरीय रेल्वेस्थानकांशी जोडणार आहे. कुर्ला आणि वांद्रे या दोन महत्त्वाच्या उपनगरीय स्थानकांमधून ‘फर्स्ट आणि लास्ट माईल कनेटिव्हिटी’ प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. याशिवाय, ही प्रणाली मेट्रो मार्गिकांशीदेखील एकात्मिक केली जाणार आहे. विशेषतः ‘मेट्रो मार्गिका-३’ आणि ‘मेट्रो मार्गिका-२ ब’वरील स्थानकांशी जोडणीमुळे मुंबईचे सार्वजनिक परिवहन जाळे अधिक मजबूत होईल.
 
कसा असेल ‘पॉड’?
 
प्रत्येक ‘पॉड’चे (टॅक्सी) मोजमाप ३.९ मीटर लांबी, २.०१ मीटर रुंदी आणि १.८ मीटर उंची असे असून, ते पूर्णपणे वातानुकूलित आहे. प्रवाशांच्या आरामाचा विशेष विचार करून या डिझाईनची आखणी करण्यात आली आहे. याशिवाय, संपूर्ण प्रणालीचे नियंत्रण एका अत्याधुनिक ‘सेंट्रल कंट्रोल रूम’मधून केले जाईल, ज्यामुळे सुरक्षितता आणि कार्यक्षमता दोन्ही सुनिश्चित होतात. या प्रकल्पासाठी वांद्रे (पूर्व) येथील ‘आरएलडीए’ भूखंडावर डेपो उभारण्याचे नियोजन आहे. येथे ‘पॉड टॅक्सी’ची देखभाल, दुरुस्ती आणि संचालन व्यवस्थापन केले जाईल. ही सुविधा प्रणाली सुरळीत चालण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
 
शून्य कार्बन उत्सर्जन
 
पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प तितकाच महत्त्वपूर्ण आहे. ‘पॉड टॅक्सी’ ‘शून्य-कार्बन’ (Zero Carbon) तत्त्वावर आधारित असून, बॅटरीवर चालणारी असल्यामुळे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण होणार्‍या कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरू शकते.
 
दररोज सुमारे १.०९ लाख प्रवाशांना सेवा
 
वाहतुककोंडी कमी करणे, हा या प्रकल्पाचा आणखी एक मोठा फायदा आहे. रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी झाल्यास प्रवासाचा वेळ वाचेल आणि शहरातील एकूण वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल. विशेषतः ‘बीकेसी’सारख्या व्यावसायिक केंद्रात, जिथे दररोज हजारो लोक प्रवास करतात, तिथे ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. २०३१ पर्यंत या प्रकल्पाद्वारे दररोज सुमारे १.०९ लाख प्रवाशांना सेवा देण्याचे लक्ष्य आहे. हे आकडे मुंबईसारख्या शहरासाठी मोठे असून, सार्वजनिक वाहतुकीच्या वापरात वाढ होण्याची शयता दर्शवतात. भाडेदर २१ रुपये प्रतिकिमी (२०२२च्या दरांनुसार) निश्चित करण्यात आले असून, ते तुलनेने परवडणारे मानले जातात.
 
‘स्मार्ट मोबिलिटी’च्या दिशेने मोठे पाऊल
 
एकूणच, ‘पॉड टॅसी’ प्रकल्प हा मुंबईच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग ठरू शकतो. आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि प्रवाशांच्या सोयीचा विचार, यामुळे हा प्रकल्प शहराच्या ‘स्मार्ट मोबिलिटी’च्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. योग्य अंमलबजावणी आणि वेळेत पूर्णतः साधली गेल्यास, हा प्रकल्प केवळ ‘बीकेसी’पुरता मर्यादित न राहता, भविष्यात मुंबईच्या इतर भागांमध्येही विस्तारला जाऊ शकतो. मुंबईकरांसाठी ही केवळ नवीन वाहतूक सेवा नसून, जलद, सुरक्षित आणि शाश्वत भविष्यासाठीची एक महत्त्वाकांक्षी झेप आहे.
 
ग्राफिस
 
- एकूण लांबी : ८.८५ किमी
 
- एकूण स्थानके : २२ स्थानके
 
- मार्ग : वांद्रे ते कुर्ला
 
पहिला टप्पा : लांबी : ३.३६ किमी
 
- स्थानकांची नावे (पहिला टप्पा) : कुर्ला, ‘एलबीएस’ मार्ग, ‘एमएमआरडीए पे अ‍ॅण्ड पार्क (जी ब्लॉक), ‘बीडीबी गेट-११’, वांद्रे
(पूर्व), कलानगर, जुनी ‘एमएमआरडीए’ इमारत, उत्पादन शुल्क विभाग.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.