'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना जोर; खा. सावंतांकडून पक्षनिष्ठेचा लेखी पुरावा

    10-Apr-2026   
Total Views |
 
Arvind Sawant
 
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्ष ‘फोडाफोडी’च्या चर्चा रंगू लागल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून उबाठा गटातील खासदारांशी संपर्क साधला जात असल्याच्या बातम्यांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडली. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांनी या खासदारांसोबत बैठक घेतल्याचेही बोलले जाते. यात प्रामुख्याने अरविंद सावंत यांचे नाव समोर आल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट आपल्या पक्षनिष्ठेचा पुरावा दिला. भर पत्रकार परिषदेत त्यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ असल्याचे एका कागदावर लिहून दिले. मात्र, अरविंद सावंतांवर अशा प्रकारे आपली पक्षनिष्ठा सिद्ध करण्याची वेळ का आली असावी? असा प्रश्न प्रकर्षाने उपस्थित होतोय.
 
सध्या उबाठा गटाकडे ९ खासदार आहेत. या खासदारांना फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून ऑपरेशन टायगर राबवण्यात येत असल्याच्या बातम्या वारंवार कानावर पडतात. मात्र, त्यानंतर या बातम्या केवळ चर्चेपुरत्याच मर्यादित राहतात आणि त्यातून काही हाती लागत नाही. आता पुन्हा एकदा या चर्चांनी जोर धरलाय. एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटातील ९ खासदारांपैकी ८ खासदारांशी थेट संपर्क साधत ठाण्यात एक गुप्त बैठक बोलवली. या बैठकीला उबाठा गटाचे ६ खासदार प्रत्यक्ष हजर होते, तर उर्वरित २ खासदारांनी व्हिडीओ कॉलद्वारे चर्चेत सहभाग घेतल्याच्या बातम्या गुरुवारी सकाळी माध्यमांमध्ये झळकल्या. या बैठकीत अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, राजाराम वाकचौरे, ओमराजे निंबाळकर, राजाभाऊ वाजे आणि संजय जाधव हे खासदार उपस्थित असल्याचे बोलले गेले. (Arvind Sawant) 
 
मात्र, खुद्द एकनाथ शिंदे यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. “उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही," असे ते म्हणाले. (Arvind Sawant)
 
त्यानंतर खा. अरविंद सावंत यांनी तडकाफडकी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकारावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून शिंदे सेनेत कोण कोण जाणार त्या ८ जणांमध्ये माझाही फोटो आहे. या बातमीचा मी कडाडून निषेध करतो. एका जरी ठिकाणी त्यांच्या पक्षाचा कॉल आला असेल अथवा मी त्यांच्याशी बोललो असेल तर जी शिक्षा द्याल ती मी भोगेन. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे ज्या शिवसेनेचे नेतृत्व करतात, त्या पक्षाचा मी शिवसैनिक आहे. मला उभं चिरले तरी मी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही आणि उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही. ठाकरे यांच्या एका फोन कॉलवर मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी मला आमदार केले. तर उद्धव ठाकरे यांनी खासदार केले," असे ते म्हणाले. एवढेच नाही तर त्यांनी भर पत्रकार परिषदेत आपण उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबतच राहणार असल्याचे एका कागदावर लिहून दिले. परंतू, त्यांना अशा प्रकारे आपल्या निष्ठेचा पुरावा देण्याची गरज का भासली? हा यानिमित्ताने उपस्थित होणारा मोठा प्रश्न आहे. (Arvind Sawant)
 
राजकारणात निष्ठा ही नेहमीच गृहीत धरली जात नाही. विशेषतः जेव्हा पक्षांतर्गत फुटीचा इतिहास ताजा असतो, तेव्हा तर प्रत्येक नेत्यापुढे आपली निष्ठा वारंवार सिद्ध करण्याची कसोटी असते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत आता उबाठा गटातील प्रत्येक नेत्यावर संशयाची सावली आहे. खरंतर, त्यातूनच वेळोवेळी ऑपरेशन टायगरच्या चर्चा रंगत असतात आणि त्यामुळे उबाठा गटात काही आलबेल नाही का? असाही प्रश्न निर्माण होतो. (Arvind Sawant)
 
शिवाय अरविंद सावंत यांची लेखी निष्ठा ही केवळ त्यांची वैयक्तिक भूमिका नसून, सध्याच्या राजकीय अस्थिरतेचे लक्षण दिसते. उबाठा गटात उघड बंडाचे संकेत सध्या दिसत नसले तरी अविश्वासाचे वातावरण मात्र नक्कीच आहे, हेच यावरून सिद्ध होताना दिसते. (Arvind Sawant)
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....