Kunal Kamra controversy : कॉमेडी हा माझा व्यवसाय, मी चूक केलेली नाही...

एकनाथ शिंदेंवरील गाण्याप्रकरणी विशेषाधिकार समितीसमोर कुणाल कामराची साक्ष

    10-Apr-2026   
Total Views |
Kunal Kamra controversy

मुंबई : (Kunal Kamra controversy) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे चर्चेत आलेला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांची गुरुवारी विधिमंडळाच्या विशेषाधिकार समितीसमोर साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी कॉमेडी हा माझा व्यवसाय असून मी चूक केलेली नाही, असे कुणाल कामरा यांनी सांगितले.(Kunal Kamra controversy)
 
विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष आ. प्रसाद लाड यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. याबद्दल माध्यमांशी बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, "स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंग कविता केली होती. याप्रकरणी प्रविण दरेकर यांनी विशेष हक्क समितीकडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार, दोन ते तीनवेळा कुणाल कामरा याची सुनावणी झाली. आता दरेकर आणि कुणाल कामरा यांची समोरासमोर साक्ष नोंदणी झाली. यामध्ये दरेकरांनी केलेले आरोप वाचण्यात आले. समिती अध्यक्ष म्हणून मी कुणाल कामरा यांना विचारले. पण मी चूक केलेली नाही, असे त्यांचे म्हणणे होते."(Kunal Kamra controversy)
 
कुणावरही द्वेष भावनेने कारवाई करणार नाही
 
"कुणाल कामरा यांना त्यांचा गुन्हा मान्य असेल तर ते दिलगिरी व्यक्त करणार का, असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. त्यावर त्यांच्या वकिलांनी काही पेपर सादर करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर समिती योग्य तो निर्णय घेईल. कुणावरही द्वेष भावनेने कारवाई केली जाणार नाही. समितीसमोर कुणाल कामरा चांगल्या प्रकारे वागले. समितीचा कारभार मराठीत असल्याने ते ज्याला मराठी समजेल असे वकील घेऊन आले होते. मी व्यंगातून गाणे निर्माण केले. कॉमेडी हा माझा व्यवसाय आहे. त्यामुळे मी ते गाणे केले आणि लोकांना ते आवडले," असे कामरा यांनी सांगितल्याचेही ते म्हणाले.(Kunal Kamra controversy)
 
सुषमा अंधारेंची सुनावणी लवकरच
 
"या प्रकरणात सुषमा अंधारे यांनासुद्धा नोटीस बजावली होती. परंतू त्यांची प्रकृती खराब असून त्या रुग्णालयात असल्याचे पत्र त्यांनी पाठवले. त्यामुळे येणाऱ्या १० ते १२ दिवसांत त्यांचीही साक्ष नोंदवली जाईल. त्यानंतर लवकरात लवकर समिती याबाबतचा निर्णय घेईल," असेही प्रसाद लाड यांनी सांगितले.(Kunal Kamra controversy)
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....