मुंबई : (Justice Yashwant Varma Resigns) अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर केला आहे. १४ मार्च २०२५ रोजी त्यांच्या निवासस्थानी जळालेल्या अवस्थेत रोकड सापडल्याच्या कथित प्रकरणामुळे त्यांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबादला बदली करण्यात आली होती. त्यांनी ५ एप्रिल २०२५ रोजी शपथ घेतली होती आणि सध्या त्यांच्यावरील आरोपांच्या अंतर्गत चौकशीसंदर्भात त्यांच्यावर खटला सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ही घडामोड घडली आहे.(Justice Yashwant Varma Resigns)
बदली करण्यात आली असली तरी न्यायमूर्ती वर्मा यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्यांच्याविरुद्ध सुरू असलेली चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना न्यायिक कामांपासून दूर ठेवण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी गठीत केलेली तीन सदस्यीय समिती आगामी पावसाळी अधिवेशनात आपला अहवाल सादर करेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी १२ ऑगस्ट रोजी लोकसभेने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारी बहुपक्षीय नोटीस स्वीकारल्यानंतर, महाभियोग प्रक्रिया सुरू करण्याच्या संदर्भात त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.(Justice Yashwant Varma Resigns)
यापूर्वी जानेवारी महिन्यात, सर्वोच्च न्यायालयाने यशवंत वर्मा यांनी दाखल केलेली रिट याचिका फेटाळून लावली होती. या याचिकेत त्यांनी न्यायाधीश (चौकशी) कायदा, १९६८ अंतर्गत चौकशी समिती स्थापन करण्याच्या लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, चौकशी समितीच्या स्थापनेत काही त्रुटी दिसून येतात. तथापि, या त्रुटी इतक्या गंभीर आहेत का की संपूर्ण कार्यवाही रद्द केली जावी, हे न्यायालय पाहिल. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने दोन दिवसांच्या सुनावणीनंतर हा निर्णय घेतला तथापि, खंडपीठाने न्यायमूर्ती वर्मा यांना संसदीय समितीसमोर उत्तर दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यास नकार दिला.(Justice Yashwant Varma Resigns)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\