मुंबई : (Israel Slams Pakistan) पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यावर इस्रायलने कठोर शब्दांत टीका केली आहे. ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलला 'मानवतेसाठी कलंक' आणि 'कॅन्सर' संबोधणारी एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आक्रमक पवित्रा घेत कडक शब्दांत फटकारल्यानंतर ख्वाजा आसिफ यांनी तातडीने ती पोस्ट डिलीट करत माघार घेतली आहे.(Israel Slams Pakistan)
काय म्हटले होते ख्वाजा आसिफ ?
ख्वाजा आसिफ यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करताना इस्रायलवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की, "गाझा, इराण आणि आता लेबनॉनमध्ये इस्रायल निष्पाप लोकांची हत्या करत आहे. हा देश मानवतेसाठी शाप असून एक कॅन्सर आहे." इतकेच नव्हे तर, ज्यांनी पॅलेस्टाईनच्या भूमीवर हा देश वसवला ते नरकात जळतील, असे प्रक्षोभक विधानही त्यांनी केले होते.(Israel Slams Pakistan)
नेतान्याहू यांचा कडक इशारा
या पोस्टवर इस्रायलने तीव्र संताप व्यक्त केला. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने अधिकृत निवेदन जारी करत म्हटले की, "पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी इस्रायलला नष्ट करण्याचे केलेले आवाहन अत्यंत आक्षेपार्ह आहे. शांततेचा मध्यस्थ म्हणवून घेणाऱ्या कोणत्याही देशाकडून इस्रायलच्या विनाशाची भाषा करणे पूर्णतः अस्वीकार्य आहे. असे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही." तसेच, तणाव कमी करण्यासाठी तटस्थ मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी देखील याला 'ज्यू विरोधी' मानसिकता असल्याचे सांगत आसिफ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.(Israel Slams Pakistan)
इस्रायलच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानच्या गोटात अस्वस्थता पसरली. अखेर कोणतीही अधिकृत माफी न मागता ख्वाजा आसिफ यांनी आपली वादग्रस्त पोस्ट 'एक्स' वरून हटवून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या घडामोडींमुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात नवीन वाद निर्माण झाला असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.(Israel Slams Pakistan)