भारतीय ज्ञानपरंपरेचा वेध घेताना...

    10-Apr-2026   
Total Views |

Dr. Pritam Selmokar
 
भारताच्या प्राचीन ज्ञान-विज्ञानाचा आधुनिक शिक्षणात अंतर्भाव करण्यासाठी विचारकार्य करणार्‍या पुण्यातील डॉ. प्रीतम सेलमोकर यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
  
भौतिकशास्त्र, विज्ञान, गणित, स्थापत्यशास्त्र, धातुशास्त्र आणि इतर सर्वच विज्ञान क्षेत्रांमध्ये भारताचे प्राचीन ज्ञान वैभवशाली आहे. आताचे विज्ञान प्रगत आहेच; पण त्यासोबत आपल्या प्राचीन विज्ञान-परंपरेची माहिती विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२०’ नुसार ‘भारतीय ज्ञानपरंपरा’ याचा अंतर्भाव केला आहे. यासंदर्भातला अभ्यासक्रम काय असायला हवा, याबाबतचे संशोधन कार्यविचार करणार्‍यांपैकी एक म्हणजे डॉ. प्रीतम सेलमोकर. ‘मॅकेनिकल इंजिनिअरिंग’मध्ये ‘मायक्रो वायर इडियम’ या विषयावर ‘पीएचडी’ची पदवी प्राप्त झालेल्या डॉ. प्रीतम. त्या एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अध्यापक आहेत. अभियांत्रिकी शिक्षणाबद्दल प्राचीन भारताचे विज्ञान कसे अंतर्भूत करता येईल, यासाठी त्या सातत्याने संशोधन आणि लिखाण करतात. ‘मॅकेनिकल इंजिनिअरिंग’ हे क्षेत्र जरी यांत्रिक असले, तरीसुद्धा डॉ. प्रीतम या केवळ अध्यापन आणि यांत्रिकी विषय यात अडकल्या नाहीत.
 
अध्यापन करतानाच, विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक जाणिवा निर्माण करणे, आपल्या सांस्कृतिक परंपरा, प्राचीन ज्ञान याबाबत त्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण करणे, यासाठी त्या विविध उपक्रम राबवतात. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले असून, त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी अनेक पुरस्कारही प्राप्त आहेत. डॉ. प्रीतम यांचा ‘आत्मभान’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे, तर ‘उद्योगशीलतेचा अमृतकाल’ हे त्यांचे पुस्तक युवकांना स्वयंरोजगाराकडे वळणे का गरजेचे आहे, यावर प्रभावी विषय मांडणी करते. पूर्ण भारतातल्या इंजिनिअरिंग कॉलेजचे नियमन करणारी ‘एआयसीटीई’ संस्थेने यशस्वीतेसाठी ३२ जीवन-कौशल्ये नमूद केली आहेत. डॉ. प्रीतम यांनी त्यांचे बाबा जीवन मुळे यांच्यासोबत ३२ जीवन-कौशल्यांवर दोन पुस्तके लिहिली आहेत. अभियांत्रिकी विज्ञानातील जिज्ञासू संशोधक, अध्यापक, कवी, लेखक आणि अत्यंत समाजशील सामाजिक कार्यकर्ता अशी डॉ. प्रीतम यांची ओळख. पुण्यात स्थायिक असलेल्या डॉ. प्रीतम यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ.
 
लातूरच्या प्रा. जीवन मुळे आणि प्रभा मुळे या ब्राह्मण समाजाच्या दाम्पत्याला दोन अपत्ये. त्यांपैकी एक प्रीतम. मुळे दाम्पत्य अत्यंत समाजशील. अत्यंत सुसंस्कृत वातावरणात प्रीतम यांचे लहानपण मजेत गेले. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश करण्याआधीच त्यांच्या आई-बाबांनी त्यांना वाचनाची गोडी लावली होती. बालांसाठी असलेली अनेक पुस्तके त्यांनी इयत्ता पहिलीत येण्याआधीच वाचलेली होती. यावरून मुळे यांच्या घरचे शैक्षणिक वातावरण समजून येते. मुळेंच्या घरात जातीय विषमतेला थारा नव्हता की, कोणत्याही भेदाभेदाला जागा नव्हती. त्यांच्या घरी घरकामाला येणार्‍या महिला असोत की, वाहनचालक या सगळ्यांना घरातल्यासारखीच वागणूक दिली जाई. घरात समरसतेचा वारसा होता.
 
अभ्यासात हुशार असलेल्या प्रीतम यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यांना दहावीला गुणही चांगले मिळाले. पण, याच काळात आई आजारी पडली. याच काळात बाबांची बदली नाशिकला झाली. तिथे कुणीही ओळखीचे नव्हते. नवीन शहरात नव्याने सगळे जुळवायचे होते. आईची प्रकृती, घरातल्या जबाबदार्‍या यामुळे प्रीतम यांनी ठरवले की, बाबा ज्या महाविद्यालयात अध्यापक आहेत, तिथेच शिकायचे. त्यामुळे त्यांना वैद्यकीय शिक्षणाऐवजी अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळावे लागले. त्यामुळे ‘बीई’ शिक्षणासाठी त्या छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या. ‘बीई’ अंतिम परीक्षेमध्ये त्यांना ‘सुवर्णपदक’ मिळाले. त्याच काळात त्या ‘अभियांत्रिकी अध्यापक वर्ग-१’ची ‘एमपीएससी’ची परीक्षाही उत्तीर्ण झाल्या. दरम्यान, प्रीतम यांचा विवाह डॉ. हेमंत सेलमोकर यांच्याशी झाला. त्या पतीसोबत पुण्यात राहायला आल्या. पुढे प्रीतम यांना वर्षभरातच कन्यारत्न झाले. मुलगी सात महिन्यांची असतानाच, त्यांना सरकारी महाविद्यालयात अध्यापकाच्या नोकरीची संधी मिळाली. त्याकाळी त्यांचे पती कामानिमित्त बहुतेकदा परदेशी असत. मुलगी, घर आणि नोकरी यांचा मेळ जमवत प्रीतम यांनी ‘एमई’चे शिक्षण घेतले. याच काळात प्रमोद काळे यांच्यामुळे त्यांचा संपर्क भारतीय शिक्षण मंडळाशी आला. प्रमोद काळे, वामनराव गोगटे, तसेच उपेंद्र कुलकर्णी यांसारख्या समाजशील व्यक्तींशी त्यांचा संपर्क आला. त्यांच्या निःस्वार्थी समाजभानाने प्रीतम यांना प्रेरणा मिळाली. त्यामुळेच ‘कोरोना’ काळात आणि त्यानंतरही वंचित वस्त्यांमधील गरीब विद्यार्थ्यांसाठी त्या काम करू लागल्या. या विद्यार्थ्यांनी कोणत्याही कारणाने शाळा अर्ध्यावर सोडू नये, यासाठी त्या कार्यरत आहेत. ऊसतोड कामगार महिलांच्या सक्षमीकरणासाठीही त्या काम करतात. त्यांचे पती डॉ. हेमंत यांची त्यांना साथ आहेच. त्या म्हणतात, "भारतीय ज्ञानपरंपरेचा वारसा अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात मांडायचा आहे. त्यासाठी संशोधन-कार्य करत राहणार.” डॉ. प्रीतम यांचे कार्य-विचार चौकटीबाहेरचे आहेत. त्यांच्या विचारकार्याचा विस्तारा अखंड होवो, ही सदिच्छा!
९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.