मुलांनी केवळ पुस्तकी शिक्षण न घेता, उत्तम माणूस म्हणून घडावे, याकरिता ‘वारसा एक जपणूक’ ही संस्था कार्यरत आहे. आजच्या धावपळीच्या युगात जिथे मानवी मूल्ये मागे पडताना दिसतात, तिथे ही संस्था मुलांमध्ये आणि पालकांमध्ये माणुसकीचा धर्म रुजवण्याचे मोलाचे काम करीत आहे. या संस्थेच्या समाजकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
मानसी आणि राहूल पिकले या दाम्पत्याने २०१६ मध्ये ‘वारसा एक जपणूक’ या संस्थेची स्थापना केली. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, या उद्देशाने संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. मानसी आणि राहूल हे दोघेही ‘मेकॅनिकल इंजिनिअर’ म्हणून कार्यरत होते. या नोकरीदरम्यानच्या काळात त्यांना दुबईमध्ये काम करण्याचीही संधी मिळाली. तिथे काम करत असतानाच २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी नोकरी सोडून समाजासाठी काहीतरी काम करण्याचा निश्चय केला. पण, नक्की सामाजिक क्षेत्रात काय काम करायचे, हे ठरविले नव्हते. मराठी माणसासाठी काम करायचे, ही खूणगाठ मात्र त्यांनी मनाशी पक्की बांधली होती. पण, दुबईमध्ये मराठी माणसाचा डेटा आणायचा कोठून हा मोठा प्रश्न होता. मग त्यांनी २०१८ मध्ये एक ‘रशियन सुपर मार्केट’ खरेदी केले. त्यांनी या ‘रशियन सुपर मार्केट’लाच ‘मराठी सुपर मार्केट’मध्ये रूपांतारित केले. थालीपीठाची भाजणी आणि हापूस आंबे विकणार्या या सुपरमार्केटने एक ’मराठी सुपरमार्केट’ म्हणून लवकरच प्रसिद्धी मिळवली आणि या माध्यमातून त्यांना मराठी ग्राहकांशी स्वतःला जोडणे सोपे झाले. याच काळात ‘कोविड’ आला. पण, ‘कोविड’च्या संकटातही मानसी आणि राहूल यांनी ग्राहकांना चांगली सेवा दिली. त्यामुळे या दाम्पत्याने मराठी लोकांचा विश्वास कमाविला.
एके दिवशी सकाळी, राहूल दैनंदिन पूजा करून नेहमीप्रमाणे सुपर मार्केटमध्ये पोहोचले. त्यावेळी त्यांच्या दुकानात पुण्यातील एक मराठमोळे कुटुंब त्यांच्या पाच ते सहा वर्षांच्या मुलासह आले होते. त्यावेळी त्या मुलाने राहूल यांनी कपाळास लावलेले गंध (रक्तचंदन) पाहिले आणि आपल्या आईची ओढणी पकडून तिला "राहूलकाकाच्या ‘फॉरहेड’मधून रक्त येत आहे,” असे सांगितले. ही घटना राहूल आणि मानसी यांच्या मनावर खोलवर परिणाम करून गेली. हे असेच सुरू राहिले, तर आपले भविष्य काय असणार, अशी चिंता शांत बसू देईना. सध्याच्या पिढीची नाळ भारतीय संस्कृतीशी जोडण्याची, आपल्या संस्कृतीविषयी आणि देशाविषयी माहिती देण्याची त्यांना नितांत गरज वाटू लागली आणि त्यातूनच ‘वारसा एक जपणूक’ची स्थापना झाली. २०२३ पर्यंत मराठी माणसांचे बर्यापैकी नेटवर्क या दाम्पत्याने उभे केले होते आणि आता वेळ होती, ती पूर्ण वेळ ‘वारसा’च्या कामात
स्वतःला झोकून देण्याची. त्या दिशेने पहिले पाऊल होते, सुपर मार्केट विकून टाकण्याचे. ते त्वरित घडले आणि हे दाम्पत्य आता पूर्णपणे ‘वारसा’च्या कामात गढून गेले.
सुरुवातीस २०१९ साली त्यांनी दुबईमधील मुलांना मनाचे श्लोक शिकविण्याचा उपक्रम सुरू केला. हा उपक्रम केवळ दोन मुलांना घेऊन सुरू झाला. हळूहळू संस्थेशी मुलांसोबत २०० ते ३०० कुटुंबे जोडली गेली. ते लहान मुलांसाठी संस्कारवर्ग घेत असत. या वर्गातून मनाचे श्लोक, संताची चरित्रे किंवा एखाद्या धार्मिक विषयावर त्यांना माहिती सांगत. परदेशातील या मुलांचे शिक्षणही परदेशात होत असल्याने त्यांना भारताबाबत फारशी काही माहिती नसते. ते फक्त आजी-आजोबांना भेटण्यासाठी उन्हाळी सुटीत भारतात येतात. एवढाच काय तो त्यांचा भारताशी संबंध आणि दुबईत त्यांना भारताबाबतची माहिती उपलब्ध होत नाही. परिणामी, या मुलांमध्ये देशभक्तीचा, देशप्रेमाचा अभाव दिसून येतो. या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे, हेही नीटसे माहीत नसते. फक्त मुलांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही याविषयी फारशी माहिती नसते. मुलांना देशभक्ती आणि भारतीय संस्कृती आणि आपली परंपरा शिकवायचे, असे पिकळे दाम्पत्याने ठरविले.
पालक नोकरीसाठी घराबाहेर पडल्यावर मुलांना संस्कारवर्गासाठी कोण आणून सोडणार, या कारणास्तव मुलांची संख्या रोडावू नये, याकरिता ते ऑनलाईन वर्ग घेतात. आपला कोणताही सण असो; त्यात दिवाळी, होळी असे मोठे सण तर या वर्गाच्या माध्यातून सर्वांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. एवढेच नव्हे, तर भोंडला, तुळशीचे लग्न हेही तेथील मुलांना अनुभवता येते. मुलांसोबत त्यांचे पालकही उत्सवात सहभागी होतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, हे वर्ग/उपक्रम पूर्णपणे विनामूल्य असतात. सण येण्यापूर्वी एक महिना अगोदर त्याची जय्यत तयारी सुरू केली जाते. प्रत्येकाला एखादी वस्तू आणायची किंवा विशिष्ट जबाबदारी नेमून दिली जाते. सर्व कुटुंबीयांचा त्यात सहभाग असतो. मुले सण साजरा करणार, म्हटल्यावर त्यांचे पालकही त्यात हिरिरीने भाग घेतात. वारसाच्या या कामामुळे त्यांना दुबईतील ‘सांस्कृतिक मंडळ’, ‘महाराष्ट्र मंडळ’, ‘इंडियन पीपल फोरम्’ यांच्याकडून त्यांच्या स्वतःच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाते. वेगवेगळ्या बोधस्पर नाटिका, नृत्य मुले बसवतात आणि सादर करून प्रेक्षकांच्या टाळ्या पटकावतात.
यावर्षीच्या शिवजयंतीनिमित्त ‘वारसा’च्या मुलांनी एक महानाटिका बसविली होती. विषय होता, आपले बर्हिजी नाईक. ४० मिनिटांची ही महानाटिका म्हणजे, नाटिका, पोवाडा, शास्त्रीय नृत्य यांचा एक अतुलनीय असा अविष्कारच होता. निवेदनापासून सादरीकरणापर्यंत सगळे या मुलांनीच केले आणि प्रत्येकाने शाबासकी कमावली. आता दुबईत ‘वारसा एक जपणूक’ संस्थेचे नाव तिथूनच्या नामांकित संस्थांमध्ये घेतले जाते. आज दुबईतील किमान २०० कुटुंबांतील १०० मुले ‘वारसा’ संस्थेशी जोडली गेली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ‘वारसा’च्या दुबईतील मुलांसाठी सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथे शिबीर घेतले जाते. दुबईत जुलै महिन्यात उन्हाळा असतो. त्याकाळात मुले शिबिरासाठी भारतात येतात. त्यासाठी मुंबईहून बस करून मग सज्जनगड येथे जातात. प्रातःस्मरण, मनाचे श्लोक मुलांना शिकविले जाते. सगळ्याचा गाभा धार्मिक असतो. खोटे का बोलू नये, एखादी भीती मनात असेल, तर त्याला सामोरे कसे जायचे, सायंउपासना, योगासने मुलांना शिकविले जातात. या मुलांमागोमाग त्यांचे पालकही येतात. त्यात अध्यात्म आणि जीवन हा कार्यक्रम पालकांसाठी केला जातो. पुढे आपल्या भारतभेटीत ‘वारसा’ची भेट डोंबिवलीतील एका ‘बालसंगोपन केंद्रा’शी झाली. त्याची निस्वार्थ सेवा आणि समाजकार्य ‘वारसा’ला भावले. ‘वारसा भारत’ या ‘बालसंगोपन केंद्रा’शी सलग्न होऊन त्यांच्या खांद्यास खाडा मिळवून काम करू लागले. या संगोपन केंद्रात आज १७ मुली आहेत, वयोगट सहा ते १४. या मुलांसाठी ‘वारसा’ने लगेच साप्ताहिक संस्कारवर्ग सुरू केले. मुलांना आपली परंपरा, आपले संत, आपली मूल्ये शिकवण्यास सुरुवात झाली. बघता बघता ही वार्ता पसरून काही बाहेरची कुटुंबे आणि त्यांची मुलेही संस्थेला जॉईन झाली. या भारतातील मुलांसाठीही दिवाळीच्या सुटीत सज्जनगडावर शिबीर आयोजित केले जाते.
‘मन निरोगी तर सगळे निरोगी’ या उक्तीप्रमाणे, मनावर काम करणे, ही दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक बाब. त्यासाठी ‘ठाव अंतर्मनाचा’ हा साप्ताहिक वर्ग ‘वारसा’ संस्था चालवते. हा वर्ग लहान मोठ्यांसाठी असतो, ज्यात नामस्मरण आणि त्याचे महत्त्व शिकवले जाते. ज्येष्ठत्व हे एक प्रकारचे बालपण असते, असे म्हणतात; अगदी तेच मनाशी धरून ‘वारसा’ परिवार बेघर आजी-आजोबांसाठीही कार्यरत आहे. मलंग गडाच्या पायथ्याशी एक संस्था आहे. त्या वृद्धाश्रमात गेल्यावर, तेथील आजी-आजोबांना तुम्हाला काय हवे, असे विचारणा केल्यावर, "आम्हाला काही नको; थोडा वेळ कोणीतरी आमची येऊन विचारपूस करावी किंवा आमच्याशी गप्पा माराव्यात,” असे उत्तर ऐकताच ‘वारसा’ने या आजी-आजोबांकरिता एक वेगळा वर्ग सुरू केला. ज्यात त्यांच्याशी संवाद साधला जातो, हितगुज केले जाते. गप्पागोष्टी, विनोद वैचारिक देवाणघेवाण हे या वर्गाचे इप्सित असते. हे आजी-आजोबा चातक पक्ष्यासारखी या वर्गाची वाट पाहात असतात. त्यांच्या सुरकुत्या पडलेल्या चेहर्यावरचे निखळ हास्य ‘वारसा’ संस्था, पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद म्हणून स्वीकारते. आपल्या प्रत्येक भारत भेटीत पिकळे दाम्पत्य एक दिवस का होईना, पण या आजी-आजोबांबरोबर घालवतात. त्यांच्याबरोबर संस्थेत जाऊन राहतात. गुजगोष्टी करतात.
अशाच एका प्रसंगात पिकळे दाम्पत्यांचा संपर्क पाचघर नावाच्या आदिवासी गावाशी आला. कसारा स्थानाकवरून २२ किमीवर असलेले हे खेडेवजा गाव. गावात ४० एक घरे आणि एक जिल्हा परिषदेची शाळा आणि या शाळेतील पहिली ते पाचवी इयत्तेतील ५३ आदिवासी मुले-मुली. ‘वारसा’ या ५३ मुलामुलींसाठी साप्ताहिक वर्ग घेतो. आठवड्यातून तीन दिवस असणार्या या वर्गात या मुलांना आपले संस्कार, आपली मूल्ये शिकवली जातात. यात पाचघर गावकर्यांचे अमूल्य सहकार्य लाभते आणि त्यांच्या चेहर्यावरचे समाधान ‘वारसा’ परिवारास नेहमीच नवी उमेद देते. अर्थात, जसजसे काम वाढू लागले, तसतसे मनुष्यबळाची निकड भासू लागली. म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग! इथेही ‘वारसा’ परिवाराचे काम पाहून त्याने भारावून जाऊन, तसेच काहीसे ध्येय असणारी काही निवडक मंडळी एकत्र आली आणि त्यातून स्थापन झाले ‘वारसा नियामक मंडळ.’ या मंडळात पाच सदस्य आहेत. सर्व कार्यक्रम/उपक्रम याचा निर्णय सर्वानुमते या नियामकमंडळाकडून घेतला जातो. हे नियामक मंडळाचा ‘वारसा’ संस्थेच्या यशात अमूल्य वाटा आहे, हे सांगणे न लगे.
जास्तीत जास्त परिवार वारसाशी जोडले जावेत, कुटुंबातील लहान-मोठ्या सर्वांनाच, आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्माची ओळख आणि माहिती पटावी, हे ‘वारसा’चे परमोच्च ध्येय आहे. वर नमूद केल्याप्रमाणे, ‘वारसा’ संस्था, कोणतेही आर्थिक व्यवहार करत नाही. हे सर्व उपक्रम आणि कार्यक्रम हे विनामूल्य असतात. समाजाशी असलेली बांधिलकी आणि समाज ऋण फेडण्याचा हा एक अति स्वल्प प्रयत्न ‘वारसा’ परिवार गेली आठ वर्षे करत आहे. सरतेशेवटी, पिकळे दाम्पत्याने केलेले आवाहन सांगून हा लेखास विराम देऊ. पिकळे दाम्पत्याने आवाहन केले आहे की ”आपला धर्म आणि आपली नीतिमूल्ये जपणे आणि जोपासणे, हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असते, ही मूल्ये आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हे त्याहूनही महत्त्वाचे. चला तर, या. आम्हाला या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आपल्या सर्वांच्या सोबतीची नितांत गरज आहे. आपला धर्म वाढवूया. आपली मूल्ये जपूया आणि जोपासूया. आपला हा अमूल्य वारसा आपल्या पुढच्या पिढीस सोपवूया. जय श्रीराम”!