‘राजा शिवाजी’चा दमदार टीझर रिलीज, संजय दत्त ते जिनिलिया देशमुख हे कलाकार मुख्य भूमिकेत

    01-Apr-2026
Total Views |

मुंबई : बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटासोबत थिएटरमध्ये खास दाखवण्यात आलेल्या या टीझरने आधीच प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. मोठ्या पडद्यावर हा टीझर पाहिलेल्या प्रेक्षकांकडून त्याचे भरभरून कौतुक झाले होते आणि सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून निर्मात्यांनी हा फर्स्ट लूक डिजिटल माध्यमावर प्रदर्शित केला आहे. तर काहीच तासांत लाखो लोकांनी हा टीझर पाहिला आहे.

‘राजा शिवाजी’ हा हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील एक भव्य आणि वेगळ्या धाटणीचा सिनेमॅटिक प्रयत्न मानला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रम आणि वारशाला अभूतपूर्व भव्यतेत साकारण्याचा हा प्रयत्न आहे. हा चित्रपट खऱ्या अर्थाने पॅन-इंडिया स्तरावर सादर केला जात असून, यात इतिहास, भावना आणि प्रेरणा यांचा संगम पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता रितेश विलासराव देशमुख मुख्य भूमिकेत झळकणार असून दिग्दर्शनाची धुरा देखील त्यानेच सांभाळली आहे. चित्रपटाच्या कथानकाचा गाभा हा स्वराज्याच्या स्थापनेच्या प्रवासावर आधारित आहे. एका पुत्राने घेतलेल्या पवित्र शपथेपासून सुरू झालेला हा संघर्ष, त्याची जिद्द, धैर्य आणि दूरदृष्टी यांचा प्रेरणादायी प्रवास यात मांडण्यात आला आहे. टीझरमधून या प्रवासाची एक झलक पाहायला मिळते, ज्यात तीव्रता, भावना आणि पराक्रम यांचा प्रभावी मिलाफ दिसून येतो.




या चित्रपटात हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची फौज एकत्र पाहायला मिळत आहे. रितेश देशमुखसह चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, बोमन इराणी, अमोल गुप्ते आणि जेनेलिया देशमुख असे अनेक नामांकित कलाकार या महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

२ मिनिटे ३१ सेकंदांच्या या टीझरमध्ये चित्रपटातील कलाकारांची ओळख करून देण्यात आली आहे. सुरुवातीला संजय दत्तचा (Sanjay Dutt) भयावह शासक म्हणून लूक पाहायला मिळतो, जो मराठ्यांवर राज्य करण्याच्या उद्देशाने लढताना दिसतो. त्यानंतर अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची संभाजी शहाजी भोसले यांच्या भूमिकेत झलक दाखवण्यात आली आहे, ज्यात ते तलवारबाजी करताना दिसतात. पुढे इतर कलाकारांच्या झलकेनंतर रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांचा ‘राजा शिवाजी’ अवतार स्क्रीनवर समोर येतो, जो स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित आहे. भव्य सेट्स, दमदार अ‍ॅक्शन, समृद्ध विश्वनिर्मिती आणि उच्च दर्जाचे तांत्रिक काम यामुळे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट एक नेत्रदीपक अनुभव ठरणार आहे. संगीताची जबाबदारी प्रसिद्ध जोडी अजय-अतुल यांनी सांभाळली असून, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे.

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा नसून, प्रेरणा, अभिमान आणि स्वराज्याच्या विचारांची नव्याने अनुभूती देणारा ठरणार आहे.