Oracle Layoffs: आयटी क्षेत्रात खळबळ! सकाळी ६ वाजता मेल अन्... या कंपनीने एकाचवेळी तब्बल ३०,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं!

१२ हजार भारतीय बेरोजगार

    01-Apr-2026   
Total Views |

ORACLE

मुंबई : (Oracle Layoffs) ओरॅकल कंपनीने आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. भारतासह अनेक देशांमध्ये या कंपनीने कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी जवळपास ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. या कर्मचाऱ्यांना सकाळी ६ वाजता थेट ई-मेल पाठवून कळवण्यात आले की, तुम्हाला नोकरीवरून काढण्यात आले आहे आणि तोच त्यांचा शेवटचा कामाचा दिवस (वर्किंग डे) असेल. अचानक हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्याने आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.(Oracle Layoffs)
ईमेलमध्ये काय म्हटलं होतं?

"कंपनीने एका व्यापक संघटनात्मक बदलाचा भाग म्हणून काही पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच हा तुमच्या कामाचा शेवटचा दिवस आहे," असं 'ओरॅकल लीडरशिप'कडून पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे आपली नोकरी जाणार आहे याची त्या कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आली नव्हती तसेच त्यांना एचआरकडूनही कोणत्याच प्रकार संपर्क करण्यात आला नाही. स्थानिक स्तरावरील मॅनेजर्सलाही याची काहीच कल्पना नव्हती. अचानक ज्या लोकांना कामावरुन कमी करायचे आहे त्यांना ईमेल्स पाठवून नोकरीवरुन काढून टाकण्यात आले.(Oracle Layoffs)
माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, ओरॅकल कंपनी ८ ते १० अब्ज डॉलर्सची खर्च बचत करण्याच प्रयत्न करत आहे. ही कंपनी आपल्या एआय डेटा सेंटरचा विस्तार करण्यासाठी या पैशांचा वापर करणार आहे. गेल्या काही महिन्यांत या कंपनीवर अंदाजे ५८ अब्ज डॉलर्सचे कर्ज झाले आहे. त्याच्या शेअर्समध्येही लक्षणीय घसरण झाली आहे.(Oracle Layoffs)
रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. "आजच्या AI च्या जमान्यात कुणाच्याही नोकरीची हमी राहिली नसून तुम्ही कितीही जुने कर्मचारी असाल तरी कोणत्याही क्षणी तुम्हाला नोकरीतून कमी केल्याचा ई-मेल तुमच्या इनबॉक्समध्ये येऊन तुम्ही बेरोजगार होऊ शकता, हे ओरॅकल कंपनीच्या ताज्या निर्णयाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आलं. हे कितीही महत्त्वाचं असलं तरी आज सुरु असलेल्या राजकारणात ते कुणालाही दिसणार नाही. आपल्याला मात्र राजकारणाच्या पलीकडं जाऊन सिस्टिमच्या विरोधात लढावं लागणार आहे, हे प्रत्येकानेच ध्यानात घेण्याची गरज आहे," असं रोहित पवारांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.(Oracle Layoffs)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\