आजोबा बाबासाहेब पुरंदरे यांच्या आकाशाएवढ्या वारशाकडून कामातील शिस्त आणि कामाप्रतीचा सच्चा भाव या दोनच गोष्टी स्वीकारत, नवी वाट चोखंदळणार्या नाथ पुरंदरे यांच्याविषयी...
चित्रपटसृष्टीची ओढ कोणाला नाही? रुपेरी पडदा हा कायमच स्वप्न, संघर्ष आणि माणूस घडवणारा एक जादुई अवकाश राहिला आहे. येथे प्रत्येक चेहर्याची स्वत:चीच एक कहाणी असते. या विश्वामध्ये प्रतिभेइतकेच, स्वत:ला सिद्ध करण्यासाठीची जिद्दही तितकीच महत्त्वाची. ही जिद्दच माणसाला घडवते. या जिद्दीच्या जोरावरच भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये नव्या दमाचा दिग्दर्शक आकार घेत आहे. या दिग्दर्शकाचे नाव म्हणजे नाथ पुरंदरे! नाथ यांना आजोबा ख्यातनाम इतिहासकार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वारशाचे वलय जरी असले, तरी नाथ यांनी करिअर निवडीबाबत त्यांच्या घरच्यांचीच परंपरा पुढे नेल्याचे दिसते. कारण, नाथ यांच्या घरामध्ये प्रत्येकाचे करिअर एकमेकांपासून वेगळेच!
नाथ यांचा जन्म पुण्याचा. त्यांचे बालपणही पुण्यातच गेले. पुण्यातील प्रसिद्ध अशा ‘ज्ञानप्रबोधिनी’ शाळेमध्ये त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. मात्र, शालेय जीवनापासूनच नाथ यांचा ओढा कलेकडेच अधिक. त्यामुळे साहजिकच अभ्यासाकडे दुर्लक्ष होई. त्यांच्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे, अभ्यासापेक्षा नाथ यांच्या अंगीभूत कलागुणांना वाव देण्यासच शिक्षकांनी प्राधान्य दिले. त्यातूनच नाथ यांचे कलाप्रेम अधिकच दृढ झाले. शाळेमध्ये असतानाच नाथ यांनी अनेकदा वक्तृत्व स्पर्धा, उतारा पाठांतर स्पर्धा किंवा कविता स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये शाळेचे नेतृत्व केले. या सगळ्या संधींमधूनच उद्याचा कलाकार घडत होता. दरम्यानच्या काळामध्ये नाथ यांनी तबला, ड्रम यांसारखी तालवाद्ये वाजवण्याचेही शिक्षण घेतले होते. त्यामुळे शाळेमध्ये संधी मिळताच, त्याच्या स्पर्धांमध्येही नाथ यांनी सहभाग घेतला.
नाथ यांना घरातूनच करिअर निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य लाभले होते. अटी मात्र दोनच होत्या; एक म्हणजे शालेय शिक्षण पूर्ण करणे आणि जे करिअर निवडाल त्यामध्ये सर्वोत्कृष्ट होणे. अर्थात, या दोन्ही अटी माफक आणि यशस्वीतेसाठी आवश्यक अशाच. त्यापैकी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यामुळे एक अट पूर्ण झाली. त्यामुळे साहसी खेळांमध्ये करिअर करण्याचा निर्णय नाथ यांनी घेतला. या खेळांमध्ये नाथ यांना सुरुवातीपासूनच रुची होती. त्यामुळे या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.
मात्र, अल्पावधीतच या क्षेत्रातील मर्यादा नाथ यांच्या लक्षात आल्या. या स्पर्धांदरम्यान अनेक दुखापतींचा सामना करावा लागल्याने, भविष्यात अशाच प्रकारे आयुष्य काढणे कठीण असल्याची जाणीव नाथ यांना झाली. त्यामुळे त्यांनी कला शाखेमध्ये महाविद्यालयीन जीवनाला प्रारंभ केला. यासाठी त्यांनी पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालय अर्थात, एस. पी. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. अर्थात, हा प्रवेशही त्यांनी नाट्य क्षेत्रात ‘ड्रमर’ म्हणून जबाबदारी स्वीकारण्यासाठीच घेतला. मात्र, त्यावेळी महाविद्यालयामध्ये ‘फिरोदिया’ करंडकाची तयारी सुरू होती. या स्पर्धेसाठीच्या दिग्दर्शकांनी नाथ यांच्यावर अभिनयाचीच जबाबदारी सोपवली. येथूनच नाथ यांची नाळ प्रत्यक्षपणे रंगभूमीशी जोडली गेली. त्यानंतर मात्र, नाथ यांनी मागे वळून पाहिले नाही. नाथ यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये ‘फिरोदिया’, ‘पुरुषोत्तम’, ‘सुमन’ करंडकांसारख्या स्पर्धांमध्ये हिरिरीने सहभाग घेतला. जवळपास पुण्यातील प्रत्येक नाट्यस्पर्धांमध्ये नाथ यांनी दोन ते तीन वेळा सहभागी होऊन दिग्दर्शनापासून, अभिनयापर्यंतची पारितोषिकेही मिळवली. साधारणत: आयुष्याची सात ते आठ वर्षे नाथ यांनी विविध संस्थांकडून व्यावसायिक नाटके केली असून, यातूनच त्यांच्या गाठीशी असलेली अनुभवाची शिदोरी वाढत गेली.
नाथ यांचा जम नाट्यसृष्टीमध्ये बसतो न बसतो, तोच ‘कोरोना’ महामारीचे संकट सार्या जगासमोर आ वासून उभे राहिले. त्यामुळे लागलेल्या ‘लॉकडाऊन’चा फटका नाट्यसृष्टीला बसला. त्यावेळी अनेक कलाकारांसमोर आता काय करायचे, हा प्रश्नच होता. अशावेळी नाथ यांच्या एका छायाचित्रकार असलेल्या मित्राने त्यांनी लघुपट दिग्दर्शित करूया का, अशी विचारणा केली. फळाची कोणतीही अपेक्षा न ठेवता, नाथ यांनीही त्याकडे शिकण्याची संधी म्हणून पाहिले. तोवर नाथ यांनी अनेक लघुपट पाहिले होते. मात्र, त्यांच्या निर्मितीचे ज्ञान त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे काही नवीन करून पाहू, असाच विचार करून नाथ यांनी हे शिवधनुष्य पेलले. त्यांनी एका लघुकथापटाची निर्मिती करून, ‘युट्यूब’वर प्रदर्शित केली. त्यांच्या या नव्या लघुकथापटाला संमिश्र प्रतिक्रिया आल्या. मात्र, अधिक मेहनत घेतल्यास हे अंगदेखील परके नसल्याचा विश्वास नाथ यांच्या मनामध्ये निर्माण झाला, तो लाख मोलाचा!
त्यानंतर अनेक लघुकथापटांची निर्मिती नाथ यांनी केली. ७२ तासांच्या लघुकथापटनिर्मितीच्या स्पर्धेमध्येही नाथ यांनी सहभाग घेतला. या राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेसाठी तयार केलेल्या लघुकथापटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये नाथ यांच्या लघुकथापटाला ‘कांस्यपदक’ मिळाले, तर त्या लघुकथापटामध्ये मुख्य अभिनेत्री असलेल्या रितिका क्षोत्री यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिकही मिळाले. यामुळे नाथ यांचा आत्मविश्वास अधिकच दुणावला. त्यानंतर ‘बार्बरिक’ नावाचा सर्वांगसुंदर लघुकथापट नाथ यांनी तयार करून, पुन्हा ‘युट्यूब’वर प्रदर्शित केला. नाथ यांच्या या कामाला रसिकांची मिळालेली दादही लक्षणीय ठरली. त्यामुळे याच क्षेत्राचे प्रगत ज्ञान घेण्यासाठी नाथ यांनी अमेरिकेची वाट धरली. तिथे काही वर्षे त्यांनी या क्षेत्रातील प्रगत शिक्षण आत्मसात करतानाच, नव्या प्रकल्पांवर कामही केले. अनेक देशांच्या तंत्रज्ञ, निर्माते यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने, नाथ यांच्या व्यक्तिमत्त्वावर त्याचा मोठा सकारात्मक परिणाम झाला. या शिक्षणातील शेवटच्या प्रकल्पासाठी नाथ यांनी जॅकी श्रॉफ यांच्याबरोबर एक ‘जमीर’ नावाचा कथापट केला. नाथ यांच्या या कलाकृतीला त्यांच्या विद्यापीठाने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येदेखील अधिकृत प्रकल्प म्हणून पाठवले. नाथ यांच्या मेहनतीला आंतरराष्ट्रीय विश्वाकडून मिळालेली ती दाद होती.
मात्र, असे असले; तरीही नाथ यांचे मन अमेरिकेमध्ये रमले नाही. नाथ यांना त्यांच्या चित्रपटामधून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवायचे असल्याने, त्यांनी भारतामध्ये येऊन पुन्हा काम करण्यास सुरुवात केली आहे. ‘इन्स्टाग्राम’वरील पुण्यातील पहिली ‘व्हर्टिकल’ लघुकथा बनवण्याचा मानही नाथ यांनाच जातो. यामध्ये शंतनू रांगणेकरसारख्या अनेक ताज्या दमाच्या कलाकारांनी काम केले आहे. पुढील पाच वर्षांत फक्त आणि फक्त काम करण्याचे ध्येय ठेवताना, त्यातील कालसुसंगती गाठताना अधिक दिवसागणिक प्रगल्भ होण्याचे स्वप्न नाथ यांनी पाहिले आहे. आजोबांच्या आकाशाएवढ्या वारशाकडून कामातील शिस्त आणि कामाप्रतीचा सच्चा भाव, या दोनच गोष्टी स्वीकारत, नवी वाट चोखंदळणार्या नाथ पुरंदरे यांना पुढील भविष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
- कौस्तुभ वीरकर