कोकणच्या कोळंबीला सातासमुद्रापार उच्चांकी मागणी

मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मत्स्य विभागाची दमदार कामगिरी

Total Views |
Maharashtra’s Fish Exports
 
मुंबई : (Maharashtra’s Fish Exports)  महाराष्ट्राने मत्स्य निर्यात क्षेत्रात पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. अमेरिका आणि चीनसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये कोकणातील कोळंबीला मोठी मागणी असून तिची गुणवत्ता आणि चव यामुळे परदेशी ग्राहकांमध्ये ती लोकप्रिय ठरत आहे. मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मत्स्यव्यवसाय निर्यातीला चालना मिळते आहे.
 
केंद्र सरकारच्या अहवालानुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातून तब्बल 7 हजार 343 कोटी 40 लाख रुपयांच्या समुद्री उत्पादनांची निर्यात झाली आहे. गेल्या पाच वर्षांत या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून 2020-21 मधील 3 हजार 684 कोटींच्या तुलनेत निर्यात दुप्पट झाली आहे. निर्यातीचे परिमाणही वाढून वार्षिक 2.27 लाख मेट्रिक टनांवर पोहोचले आहे.कोकण किनारपट्टी हा या यशाचा कणा ठरला असून, विशेषतः कोळंबी आणि गोठवलेल्या मासळीचा निर्यातीत मोठा वाटा आहे.
 
हेही वाचा : Ashok Kharat case: अशोक खरात प्रकरण आणखी गुंतागुंतीचे? विशेष सरकारी वकीलांनी घेतली माघार?
 
मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात मत्स्यव्यवसाय विभागाने आधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि निर्यातक्षमतेत वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारामुळे कोकणातील मच्छीमारांना थेट जागतिक बाजारपेठांशी जोडण्यास मदत झाली आहे. भारताच्या एकूण मत्स्य निर्यातीत अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ ठरली असून 2024-25 मध्ये 22 हजार 723 कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. त्यानंतर चीन (10 हजार 668 कोटी), युरोपियन युनियन, दक्षिण-पूर्व आशिया आणि जपान या देशांमध्येही भारतीय मासळीला मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि वाढत्या उत्पादन खर्चासारख्या आव्हानांवर मात करत महाराष्ट्राने गुजरात आणि आंध्र प्रदेशासारख्या राज्यांच्या बरोबरीने आपले स्थान टिकवून ठेवले आहे.
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.