बोरिवली नॅशनल पार्कमध्ये शिकार झालेल्या बिबट्याची ओळख पटली; बिबट्या राहत होता...

    01-Apr-2026
Total Views |
 leopard poached in sgnp
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची शिकार करुन त्याची कातडी विकणाऱ्या शिकाऱ्यांना डहाणू वन विभागाने अटक केली होती (leopard poached in sgnp). या कातडीवरील ठिपक्यांच्या (रोझेट पॅटर्न) आधारे बिबट्याची ओळख पटविण्यात आली शिकार झालेला बिबट्या हा राष्ट्रीय उद्यानातील नर बिबट्या आहे (leopard poached in sgnp). दरम्यान मंगळवारी डहाणू वन विभागाने या प्रकरणी आरोपीच्या घराची झडती घेतली असून इतर आरोपी फरार आहेत. (leopard poached in sgnp)
 
 
डहाणू वन विभागाने रविवारी रात्री खानिवडे येथून बिबट्याच्या कातडीची तस्करी उघडकीस आणली. यावेळी पकडण्यात आलेल्या दोन आरोपींनी बोरिवली राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची शिकार करुन त्याची कातडी काढल्याचे कबुली दिली. यातील एक आरोपी हा मिरा-भाईंदर येथील काशीगाव येथील राहणारा असून त्याने त्याठिकाणी जंगलात जाऊन बिबट्याची शिकार केल्याचे सांगितले. त्यावरुन वनकर्मचाऱ्यांनी तपासाची सूत्रे फिरवली. कातडीबरोबरच बिबट्याचे दात आणि नखे हे इतर सहआरोपींकडे असल्याचे पकडलेल्या आरोपीने सांगितले. मात्र, इतर अवयव असलेले आरोपी फरार झाले आहेत. वन विभागाने मंगळवारी पकडलेल्या आरोपीसोबतच फरार असलेल्या आरोपींच्या काशीगाव येथील घरांची झडती घेतली. मात्र, त्यांना कोणताही मुद्देमाल आढळून आला नाही. बुधवारी या आरोपींना न्यायालयात सादर केले जाणार आहे.
 
 
दरम्यान ताब्यात घेतलेल्या कातडीवरुन डहाणू वन विभागाने शिकार झालेल्या बिबट्याची ओळख पटवली आहे. प्रत्येक बिबट्याच्या शरीरावरील ठिपक्यांची (रोझेट पॅटर्न) रचना वेगवेगळी असते. या रचनेवरुन त्यांची स्वतंत्र ओळख पटवता येते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दरवर्षी बिबट्यांची गणना होत असल्याने कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपलेल्या बिबट्यांची छायाचित्र उपलब्ध असतात. याच छायाचित्रांमधील ठिपक्यांची (रोझेट पॅटर्न) रचना कातडीवरील ठिपक्यांशी जुळवल्यानंतर शिकार झालेला बिबट्या हा एल-३० सांकेतिक क्रमांक असलेला नर बिबट्या असल्याचे उघड झाले आहे. हा बिबट्या साधारण पाच ते सहा वर्षांचा होता. ज्याचे छायाचित्र २०२३-२४ साली राष्ट्रीय उद्यानात पार पडलेल्या बिबट गणनेदरम्यान टिपण्यात आले होते. हा बिबट्या काशीगावला लागून असलेल्या राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्येच अधिवास करत होता.