मुंबई : (Mangalprabhat Lodha) “जैन समाज हा हिंदू आहे. राजकीय षडयंत्र करून त्यांना अल्पसंख्यांक समाजात समाविष्ट केले आहे. पण आता अल्पसंख्यांक समाजातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे,” असे वक्तव्य अलीकडेच कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. यामागची नेमकी पार्श्वभूमी आणि त्यांची भूमिका काय आहे, यावर मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी दै. मुंबई तरूण भारतशी साधलेला संवाद.
१) जैनांनी अल्पसंख्यांकांचा दर्जा सोडून स्वतःला हिंदू म्हणवावे, असे जाहीर आवाहन आपण जैन समाजाला केले आहे. त्यामागची पार्श्वभूमी काय?
- हिंदुंमध्ये फूट पाडून राज्य करण्याची मुघलांची राजकीय नीती होती. त्यानंतर इंग्रजांनीही फोडा आणि राज्य करा हीच नीती अवलंबली. पुढे स्वातंत्र्यानंतर पंडीत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी या गांधी परिवारानेही भारतात एकछत्र राज्य करण्यासाठी हिंदूंना एकत्र होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. यातूनच त्यांनी जैन समुदायाला तुम्ही हिंदू नाहीत, असे सांगितले. मुस्लिम समाजातही अनेक जाती आहेत. पण त्यात त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. मात्र, आता जनतेला हिंदुत्वाच्या एकतेचे महत्व कळले आहे.(Mangalprabhat Lodha)
२) आपण जैनांना अल्पसंख्यांक करण्यामागे काही राजकीय षडयंत्र असल्याचा उल्लेख केला आहे. हे षडयंत्र नेमके काय होते?
- काँग्रेसने षडयंत्र करून तुम्ही हिंदू नसून जैन आहात, असे विष जैन समुदायात पेरले. तुम्ही अल्पसंख्यांक आहात असे त्यांना सांगितले. मी १० वर्षांपासून याचा विरोध करत आहे. हा हिंदूस्थान असून आम्ही सर्वजण हिंदू आहोत. आमचा धर्म जैन असून आम्हाला त्याचा अभिमान आहे. आम्ही जैन धर्माचे पूर्ण पालन करू. परंतू, आम्ही हिंदू नसून अल्पसंख्यांक आहोत, हे सांगणे एक राजकीय षडयंत्र होते, हे लोकांना आता कळले आहे.(Mangalprabhat Lodha)
३) जैनांनी अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याचा विचार कसा पुढे आला?
- डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची आज जयंती आहे. ज्यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली त्यावेळी त्यांच्या मनात काय होते? त्यांना संघाची स्थापना करण्याची गरज का वाटली? जोपर्यंत हिंदू एकत्र होत नाहीत, सामाजिक भान ठेवून देशासाठी जबाबदारी घेत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माण साध्य होणार नाही, असे त्यांना वाटले. आज संघ शताब्दी वर्षात हिंदू एकत्र झाले आहेत. सत्ता, त्यातून साधन आणि पुन्हा सत्ता हे काँग्रेसचे चक्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोडले आहे. राम जन्मभूमी आंदोलनातून हे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी हिंदू एक आहे, असा भाव मनात घेऊन सगळे एकत्र आले होते. आमची पूजेची पद्धत जरी वेगळी असली तरी आम्ही हिंदुच आहोत हे सर्व समुदायांना पटले आहे. काँग्रेसच्या राजकीय षडयंत्राचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळेच काही जैन मुनींसोबत झालेल्या चर्चेनंतरच अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याचा विचार पुढे आला आहे. यावर सर्वांचे एकमत झाले तर, यासंदर्भात कायदेशीर कार्यवाही करण्याचा विचार आहे.(Mangalprabhat Lodha)
४) अल्पसंख्यांकांचा दर्जा असल्याने जैन समुदायाला कोणते लाभ मिळतात? यातून बाहेर पडल्यानंतर त्याचा काय परिणाम होणार?
- पूर्वी दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात जैन समाज प्रभावी होता. तिथे आम्ही हिंदू नसून जैन आहोत असा वाद झाला. त्यावेळी उपराष्ट्रपती तथा माजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे हातात एक पुस्तक घेऊन आले होते. एकेकाळी दक्षिण भारतात २२ ते २३ टक्के जैन समाज होता, तो आता ३ टक्के राहिला आहे, असे त्यांनी सांगितले. याचे कारण हिंदूंमध्ये फूट पाडण्याच्या षडयंत्राला आम्ही बळी पडलो. अल्पसंख्याक दर्जा असल्याने फायदा आहे पण तो खूप कमी आहे. सरकारच्या अल्पसंख्यांक विभागाकडून मिळणारा ९८ टक्के लाभ मुस्लीम समाज घेतो. इतर समाज फक्त नावापुरते अल्पसंख्यांक आहेत. केवळ एक विशिष्ट समाज सर्व लाभ घेताना दिसतो. त्यामुळे फायदे कमी आणि नुकसान मोठे आहे. पुढचे ५० वर्षे असेच सुरु राहिले आणि ते एकमेकांसमोर उभे राहिले तर काय होणार, याचा विचार आजच्या पुढाऱ्यांनी केला पाहिजे. यासाठीच मी कमीत कमी ५० साधुसंत आणि पुढाऱ्यांची भेट घेतली. त्या सर्वांनी यावर चर्चा करण्यासाठी तयारी दर्शवली. यावर विचार व्हावा, असे सर्वांना वाटले. त्यामुळे मी हा विषय समाजापुढे ठेवला आहे.(Mangalprabhat Lodha)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....