कॅनडाच्या विद्यमान सरकारने ‘कोम्बॅटिंग हेट अॅट’ या नावाचा कायदा आणण्याचे ठरविले असून, या प्रस्तावित कायद्यामुळे त्या देशामध्ये उजळ माथ्याने वावरणार्या खलिस्तानी चळवळीला पायबंद बसणार आहे. कॅनडाचा हा प्रस्तावित कायदा म्हणजे भारताचा विजय मानला जात आहे.
कॅनडाच्या ‘कोम्बॅटिंग हेट अॅट’ या नव्या कायद्यामुळे खलिस्तानी गटांशी संबंधित चिन्हे, तसेच त्यांचे उपक्रम यांच्यावर बंधने येणार आहेत. भारताने कॅनडामधील खलिस्तानी गटांच्या विविध हालचालींबद्दल त्या देशाकडे वेळोवेळी चिंता व्यक्त केली होती. कॅनडाचा हा प्रस्तावित कायदा म्हणजे भारतीय राजनैतिक मुत्सद्देगिरीचा विजयच म्हणावा लागेल. भारताने जागतिक पातळीवर दहशतवादाविरुद्ध आवाज उठविला होता. पण, अनेक देशांनी हा स्थानिक विषय असल्याचे सांगून त्याकडे दुर्लक्ष केले. पण, आता कॅनडा सरकारने जो प्रस्तावित कायदा केला आहे, तो लक्षात घेता भारताचे म्हणणे किती योग्य होते हे त्यावरून लक्षात यावे. कॅनडा सरकारच्या या ‘कोम्बॅटिंग हेट अॅट’मुळे खलिस्तानी दहशतवादावर बंदी घातली जाईल. तसेच या चळवळीशी संबंधित चिन्हांवरही निर्बंध येणार आहेत. हा भारताचा ऐतिहासिक विजयच!
‘कोम्बॅटिंग हेट अॅट’ हा कायदा कॅनडाच्या प्रतिनिधीगृहाने अलीकडेच संमत केला. भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली दहशतवादावर पांघरूण घातले जाऊ शकत नाही, असाच संदेश या कायद्याने दिला आहे. या कायद्यातील तरतुदींनुसार बंदी घालण्यात आलेल्या ‘बब्बर खालसा’ यासारख्या खलिस्तानी संघटनांना आपले झेंडे किंवा प्रचार साहित्य सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करता येणार नाही. अशी कोणतीही कृती बेकायदेशीर ठरविण्यात आली आहे. तसेच धार्मिक स्थळांच्या बाहेर लोकांना अडविणे किंवा धमकाविण्याचे प्रकार हा गुन्हा मानला जाणार आहे. कॅनडामधील खलिस्तानी गटांच्या कारवायांबद्दल भारताने त्या देशाच्या सरकारकडे वारंवार चिंता व्यक्त केली होती. तसेच विविध जागतिक व्यासपीठांवरून त्याकडे जगाचे लक्ष वेधले होते. खलिस्तानी गटांच्या उपक्रमांकडे ‘फ्री स्पीच’ म्हणून प्रदीर्घ काळ पाहिले जात होते. पण, खलिस्तानी तत्त्वज्ञान म्हणजे केवळ वैचारिक विरोध नसून, हे तत्त्वज्ञान म्हणजे संघटित दहशतवादाचा आणि फुटीरतावादाचा भाग असल्याचे लक्षात आल्याने कॅनडा सरकारने भाषणस्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ नये, म्हणून ‘कोम्बॅटिंग हेट अॅट’ हा कायदा आणण्याचा निर्णय घेतला.
खलिस्तानी झेंडे फडकाविणे, दहशतवादी संघटनांचे उदात्तीकरण करणे, अशा गटांच्या प्रचारात सहभागी होणे या सर्व गोष्टी आता या कायद्याअंतर्गत आणण्यात आल्या आहेत. पण, कॅनडा सरकारच्या या प्रस्तावित कायद्यास अंतर्गत विरोधही झाला. त्या देशात खलिस्तानी विचारांच्या गटांचा प्रभाव मोठा आहे. त्यांच्याकडून हा कायदा येऊ नये म्हणून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. शीख समाज कॅनडामध्ये मोठ्या संख्येने आहे. त्यातील लहानसा; पण प्रभावी गट खलिस्तानी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणारा आहे.
प्रारंभी भारताचे म्हणणे त्या देशाकडून गांभीर्याने घेतले जात नव्हते. अनेक खलिस्तानी दहशतवादी त्या देशात आश्रयाला असल्याकडेही भारताने लक्ष वेधले होते. पण, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. पण, आता कॅनडा सरकारचेही डोळे उघडले असल्याचे दिसून येते. कॅनडाच्या लोकप्रतिनिधींनी संमत केलेल्या ‘कोम्बॅटिंग हेट अॅट’मुळे त्या देशात सक्रिय असलेल्या खलिस्तानी गटांना पायबंद बसेल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.
‘धुरंधर-२’ची ‘खान कंपनी’शिवाय घोडदौड!
सध्या ‘धुरंधर-२’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने बॉस ऑफिसवर अवघ्या ११ दिवसांत एक हजार, ३६३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून, हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सर्वत्र गर्दी करीत आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटात ‘खान कंपनी’चा अंतर्भाव नाही. तरीही, हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. नावात ‘खान’ असेल, तरच बॉलीवूडचा चित्रपट चांगला चालतो, असा जो समज झाला होता, तो ‘धुरंधर’ चित्रपटाने पार खोटा ठरविला आहे. ‘खान कंपनी’चा सहभाग नसला; तरी ‘धुरंधर-२’ने प्रचंड यश मिळविले आहे. आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंह याची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने अवघ्या सात दिवसांमध्ये एक हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला. शाहरुख खान याची भूमिका असलेला ‘पठाण’ आणि प्रभासची भूमिका असलेला ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटांचे विक्रम या चित्रपटाने मोडीत काढले आहेत. कित्येक दशकांपासून बॉलीवूडवर विशिष्ट कुटुंबांचा, काही प्रभावी गटांचा प्रभाव असल्याचे दिसून येत होते. यास ‘इनसाईडर कल्चर’ म्हणून संबोधले जात असे.
एखाद्या चित्रपटाचे यश हे त्या चित्रपटाच्या कथानक, आशय यापेक्षा त्यामध्ये कोणता अभिनेता भूमिका करीत आहे, त्यावर जोखले जात असे. विशेषत: ‘खान कंपनी’चे म्हणजे शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांचे चित्रपट चांगला व्यवसाय करीत असत. पण, ‘धुरंधर-२’ने हे सर्व खोटे ठरविले. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ‘जवान’, ‘अॅनिमल’ आणि ‘पठाण’ या चित्रपटांचे विक्रम मोडले. केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवरही हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला. दिग्दर्शक आदित्य धर यांनी ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. तो चित्रपटही खूप गाजला. आता ‘धुरंधर’ चित्रपटही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. प्रभावी लेखन आणि कथन यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. ‘धुरंधर-१’ चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. प्रेक्षक त्या चित्रपटाच्या दुसर्या भागाची प्रतीक्षा करीत होते. या चित्रपटानेही प्रेक्षकांना अजिबात नाराज केले नाही. ‘धुरंधर-२’ चित्रपटाने बॉलीवूडचे जुने-पुराने नियम नव्याने लिहिता येतात, हे दाखवून दिले आहे. ‘खान कंपनी’शिवाय चित्रपट अत्यंत यशस्वी होतो, हे आदित्य धर यांच्या ‘धुरंधर-२’ चित्रपटाने दाखवून दिले आहे.
काश्मीरमध्ये १५ जुलैपासून कुंभमेळा!
जम्मू-काश्मीरमधील बंदीपुरा जिल्ह्यातील शादिपोरा येथे कित्येक वर्षांपासून वार्षिक यात्रा भरत होती. आता ही खंडित झालेली यात्रा पुन्हा सुरू होत आहे. येत्या दि. १५ जुलै ते दि. २४ जुलै या काळात या दहा दिवसांच्या कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या अमरनाथ यात्रेच्या काळातच हा कुंभमेळा होणार आहे. गेल्या दि. २६ मार्च रोजी स्वामी कालिकानंद सरस्वती यांनी या कुंभमेळ्याची घोषणा केली. या दहा दिवसांच्या या कुंभमेळ्यास तीन ते चार लाख भाविक येतील, असे स्वामी कालिकानंद सरस्वती यांनी सांगितले. अशाच प्रकारचा कार्यक्रम २०१६ मध्ये योजण्यात आला होता. त्यामध्ये ३५ हजार भाविक सहभागी झाले होते.
प्राचीन काळापासून शादिपोरा हे पवित्र क्षेत्र मानले जात आहे. याठिकाणी वितस्ता आणि सिंद नदी यांचा संगम आहे. ‘वितस्ता’ म्हणजे ‘झेलम’ या नावाने ओळखली जात असलेली नदी. प्राचीन साहित्यामध्ये सिंद (सिंधू नव्हे) नदीचा उल्लेख ‘काश्मीर गंगा’ असा केला जात असे. हरमुख पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गंगाबल सरोवरातून सिंद नदीचा उगम होतो. १०८ किलोमीटरचा प्रवास करून ही नदी वितस्ता नदीस शादिपोरा येथे मिळते. कल्हाणच्या ‘राजतरंगिणी’ या ग्रंथामध्ये या नदीचा उल्लेख आहे. प्रयागराज येथील त्रिवेणी संगमाइतके महत्त्व या स्थानास दिले जाते. काश्मिरी हिंदू या नदीच्या काठावर श्राद्धविधी करतात. आपल्या नातलगांच्या अस्थींचे विसर्जन याठिकाणी करतात. काश्मीरमध्ये १३२० मध्ये इस्लामचे आक्रमण झाल्यानंतर या धार्मिक यात्रेस ओहोटी लागली. २०१६ साली जो मेळा आयोजित करण्यात आला होता, तो ४७ वर्षांनंतर आयोजित करण्यात आला होता. आता यावर्षी या कुंभमेळ्याचे आयोजन होत आहे. काश्मिरी हिंदू मोठ्या संख्येने या कुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत!