शाश्वत जीवनानंदासाठी भगवान महावीरांची गुरुवचने

    01-Apr-2026
Total Views |
Bhagwan Mahavir
 
नुकतीच २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती साजरी करण्यात आली. भगवान महावीर यांचे विचार अहिंसा, पर्यावरण, जैवविविधता या तत्त्वज्ञानातून मानवी जीवनाचा वातावरणाशी सुसंवाद साधण्यासाठी निरंतर मार्गदर्शक आहेत. भूत, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेत भगवान महावीरांचे विचार सगळ्यांना आत्मशक्ती आणि प्रेरणा देतात. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
 
करुणा आणि मैत्रीचा जीवन सारांश असणार्‍या भगवान महावीरांची धर्मनीती प्राणिमात्रांवर दया करणारी आहे. निसर्गातील प्रत्येक पशु-पक्षी प्राणी आपापल्या परीने पृथ्वीच्या संरक्षणासाठी मदतच करत असतो. अशा सर्व आत्म्यांचे जीवन दुःखरहित करणे, अशी जैन धर्माची शिकवण आहे. अहिंसा हाच धर्म आणि प्रत्येक आत्मा सर्वांसाठी सारखाच असल्यामुळे जगणार्‍या प्रत्येक प्राणिमात्राला अन्न, पाणी, निवारा उपलब्ध असण्याची असण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारावी, असे तत्त्वज्ञान जैन धर्मात प्रामुख्याने मांडले आहे. प्राणिमात्रांची निर्व्याज सेवा करताना कोणताही मोबदला अपेक्षित न करणे, आपल्याकडे उपलब्ध असणार्‍या बाबींचा साठा न करणे, आपल्या कार्यामुळे निसर्गातील संसाधने इतर प्राणिमात्रांना उपलब्ध होणार नाहीत, अशी कोणतीही कृती न करणे, याची जाणीव जैन धर्मात करून देण्यात आली आहे.
 
जीवदयाचा अर्थ ‘शारीरिक इजा’ असा सीमित नसून तो मानासिक इजा असाही अभिप्रेत आहे. पृथ्वीतलावरील अनेक सूक्ष्मजीव, वृक्षसंपदा जिवंतपणाचे उदाहरण ठरतात आणि त्यामुळेच त्यांना होणारी इजा मानवाच्या मनास नेहमी क्लेशदायक ठरावी. भारतीय संस्कृतीत अनंत कालापासून पशुपक्षांना होणार्‍या इजा परंपरा म्हणून रूढ झाल्या आहेत; मात्र कोणताही प्राणी अत्याचाराचा विचार ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वज्ञानास छेद देणारा असल्यामुळे सद्विवेकी मानवाकडून अपेक्षित नाही. यामुळेच भगवान महावीरांचा संदेश जीवन तप, त्याग आणि संस्कारांच्या मूल्यांशी निगडित आहे.
 
जगात आज पर्यावरणविषयक दिसून येणार्‍या अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे भगवान महावीरांनी आपल्या तत्त्वज्ञानातून २ हजार, ६०० वर्षांपूर्वी मानवास सांगितली आहेत. भौतिकशास्त्राच्या साधनांची उपलब्धता नसताना विज्ञान विचारातून महावीरांनी पाणी आणि जमिनीवर असंख्य जीव-जंतू आपले जीवन जगत असून शक्य असणार्‍या सर्व पर्यायांतून त्यांच्या योग्य रक्षणाची जबाबदारी मानवास दिली आहे. मानवाच्या लोभीपणातून निसर्गातील प्रदूषणास पूरक ठरणारे संसाधनांच्या र्‍हासाचे वर्तन आध्यात्मिक आणि नैतिक जबाबदार्‍या स्वीकारून समाजात कमी व्हावे, असा संदेश त्यांनी दिला. प्रत्येक जीवासाठी जन्म, वाढ, जीवन, र्‍हास आणि मृत्यू असेच चक्र असल्यामुळे भूतलावरील ८४ लक्ष जिवंत असणार्‍या जड जीवांना मानवी कल्याणाची साथ मिळणे गरजेचे ठरते. प्रत्येक सामान्य मानवाने आणि मुनिजनांनी पाच कठोर तत्त्वे आपापल्या परीने कठोरपणे अनुपालन करावीत, असा संदेश देताना अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अस्तेय आणि अपरिग्रह यांचा अवलंब करावा, असे सूचित केले आहे.
 
अपरिग्रह वृत्ती म्हणजे विनाकारण साठा आणि इतरांसाठी अनुपलब्धता. ज्या गोष्टी अजिबात गरजेच्या नाहीत, त्यांचा संग्रह स्वतःसाठी फायद्याचा असला, तरी इतरांसाठी नक्कीच उपलब्धता नसल्यामुळे क्लेशदायक ठरतो. त्यामुळे सर्वांबरोबर उपलब्ध बाबींचे वितरण केल्याने मिळणारा आनंद निश्चित मोठा असतो. जीवनासाठी कमीत कमी आणि सीमित साधनांची गरज वाटणे, हे जैन धर्माचे मूळ तत्त्वज्ञान ठरते. मनाचा लोभीपणा, संग्रहवृत्ती, स्वतःच्या विकास, आत्मनिर्भर करणारा संग्रह यातून समाजात श्रेष्ठ आणि कनिष्ठ जीवन जगणारा समूह तयार होतो, कलह वाढतात, वैचारिक एकवाक्यता कमी होते. याच कारणांसाठी अपरिग्रह तत्त्वाचा स्वीकार करून धन संपत्ती, साधने यांचा त्याग करण्याची जीवनशैली विकसित होते.
 
निसर्गसृष्टीतील साधने संरक्षित करा, संवर्धित करा, पुनर्वापर करा, पुनर्रचित करा आणि कमीत कमी वापर करा, यांमुळेच पर्यावरणचक्र संतुलित ठेवता येईल, असा वातावरण परिघाच्या संवर्धनातील सहिष्णुतेचा विचार भगवान महावीरांनी दिला आहे. आत्मा शुद्ध आणि शांत करण्यासाठी दया आणि करुणा यांचा अवलंब अवश्य अपेक्षित असून राग, गर्व आणि तिरस्कारातून नकारात्मक भावना निर्माण होतात आणि मोक्षपदाचा मार्ग कुंठित होतो. जैन तत्त्वज्ञानात नैतिकतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सामाजिक सामंजस्य आणि निरंतर सद्भाव जपण्यासाठी उच्च नैतिकता मानवाकडून अपेक्षित करण्यात आली आहे. मानवाच्या जडणघडणीत शाकाहार, मांसाहार आणि दुग्ध शाकाहार अशा प्रकारच्या विचारांचा जगात जगात मतप्रवाह असला, तरी अहिंसा तत्त्व जपण्यासाठी आणि जीवदयाशी निगडित आचरणासाठी केवळ शाकाहार हेच तत्त्व जैन धर्म सुनिश्चित करते.
 
केवळ प्राणी हिंसा इतकाच विचार नसून वनस्पतीजन्य ऊर्जेच्या ज्या मानवी आहारातील बाबी जमिनीतून उपटून, उखडून, तोडून काढल्या जातात, त्याही बाबतीत सजीव असणार्‍या मातीतील सूक्ष्मजीवांनी हानी पोहोचू शकते, म्हणून ते वर्ज्य आहेत, याचाही सखोल विचार महावीरांनी समाजाला दिला आहे. चुकीच्या परंपरा आणि झालेले परिवर्तन विज्ञान युगात टाळण्यासाठी शाकाहाराचा अवलंब सर्व दूर होण्यासाठी विचार प्रवाही होणे, आज गरजेचे आहे. भगवान महावीरांनी दिलेली गुरुवचने त्यांच्या १२ वर्षांच्या कठोर तपश्चर्य नंतर समाजाला मिळाली असून वयाच्या ३०व्या वर्षी आधी संपत्ती, सत्ता आणि नंतर ग्रह त्याग केल्यानंतर त्यांना पावापुरी येथील जलमंदिरात साधना करता आली. सनातन हिंदू धर्मातील अनेक मुनिवरांनी संन्यासी तपस्या केल्या आणि त्यातील जैन धर्म हा एक जीवन मार्ग आहे. वर्धमान म्हणूनही ओळखले जाणारे भगवान महावीर आपल्या शिकवण आणि गुरुवचनांच्या ग्रंथातून आज आपल्याला कळू शकतात; कारण त्यांचे मुख्य शिष्य इंद्रभूती गौतम यांनी महावीरांचे सर्व विचार आग म्हणून संकलित केले आहेत. खरे तर, अनेक जैन आचार्यांनी प्रसारित केलेले ग्रंथ १९व्या शतकात मोठ्या प्रमाणात होऊ शकलेले
नाहीत. जैन धर्मानुसार अभिप्रेत असलेले आचरण कर्तव्यातून मानवाने अवलंबण्यासाठी दहा दिवसांचे विशेष ‘पर्युषण’ काळ दरवर्षी साजरा केला जातो.
 
विज्ञान युगात अहंकार, गर्व, शिक्षणाचा अभिमान वाढला असल्यामुळे जैन धर्मीयांकडून होणारा क्षमायाचनेचा संस्कार समाजासाठी अमूल्य भेट आहे आणि माफी कुणा एका व्यक्तीची नसून ब्रह्मांडातील सर्व प्राणिमात्रांची जाते मागितली जाते आणि नकळत घडणार्‍या पापासाठी क्षमा याचना होते, याचे चिंतन धनाढ्य, बलाढ्य मानवाने करणे अपेक्षित आहे. मुक्ती किंवा मोक्ष मिळवण्यासाठी आणि जीवनात कायमस्वरूपी आनंद प्राप्त होण्यासाठी सतत धडपडत असणार्‍या जगातील प्रत्येक माणसासाठी जैन धर्मीय शिकवण अतिशय मार्मिक आणि अमूल्य आहे. सर्वाधिक सामाजिक उपक्रम, सर्वाधिक सामाजिक दातृत्व निधीवितरण, सर्वाधिक सामाजिक कार्यात सहभाग, सर्वाधिक दातृत्व वृत्ती अशा अनेक गुणांनी जैन धर्मीय समुदाय हिंदू समाजात ओळखला जातो. महाराष्ट्रात पवित्र जैन मंदिरांची स्थापना करण्यात आली असून यात नेमगिरी-जिंतूर, नाईचाकूर, नवागड, रामटेक, दहिगाव, विजय गोपाल, कारंजा, कुंथलगिरी, पोदानपूर, शिरड शहापूर, आसेगाव, कुंडल, कात्रज, तळेगाव अशा अनेक ठिकाणी भक्तिभावाने समाज नतमस्तक होतो.
 
आपल्या देशात श्री महावीरजी (राजस्थान), ओसियन (राजस्थान), पावापुरी (बिहार), माऊंट अबू (राजस्थान), शिखरजी (झारखंड), सोनगिरी (मध्य प्रदेश), पालीटाना (गुजरात), वेरूळ (महाराष्ट्र), गोमटेश्वर (कर्नाटक), दिल्ली अशा ठिकाणी भगवान महावीरांची पवित्र मंदिरे आहेत. संकेतस्थळावरून प्रत्येक मंदिराबाबत अतिशय सविस्तर आणि उपयुक्त माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. सहकार्य आणि सहिष्णुता ओतप्रोत मनात असणारा जैन समाज आपल्या अद्भुत योग्यतेतून समाज विकासासाठी सतत अग्रेसर आहे. भगवान महावीरांचा विचार समाजाला शाश्वत विकासाची दिशा, नैतिकता, सौहार्दता, प्रेम, नीती देण्यासाठी प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे, प्रत्येकाने अभ्यासणे आणि किमान शिकवण दरवर्षी अंगीकृत करत आचरणात आणणे अपेक्षित आहे. जैन धर्मीय सामाजिक संस्थांच्या कार्यास आर्थिक बळापेक्षा नैतिक पाठबळाची भक्कम साथ समाजाकडून अपेक्षित असून सामान्य नागरिकाकडून ‘कर्तव्यातून सद्भावना’ उपक्रमासाठी पुरवणे अपेक्षित आहे. जीवनातील आनंद वृद्धिंगत करताना वातावरणातील सगळ्याच जीवमात्रांचा आनंद पाहण्याचा योग लाभण्यासाठी आणि कृतार्थ जीवनाचा मोक्ष मिळवण्यासाठी भगवान महावीरांच्या चरणी नतमस्तक होऊन विचारांच्या प्रेरणांचा स्वीकार करणारा महावीर कल्याणक दिवस साजरा करणे, काळाची गरज आहे.
 
 
- परेश शाह
(लेखक उच्च न्यायालयाद्वारा मॉनिटरिंग असणार्‍या महाराष्ट पशु संवर्धन समितीचे पीआरओ सदस्य आहेत.)