आईपण, बाईपण आणि मायलेकींचं भावविश्व!

    08-Mar-2026
Total Views |
tithi movie marathi
 
मुलगी म्हणजे आईचं प्रतिबिंब आणि आई तिचा आरसाच! स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वपूर्ण; पण तितकंच गुंतागुंतीचं नातं म्हणजे मायलेकीचं आणि बहिणींचंही नातं. अशाच या नात्यांच्या भावविश्वाला उलगडणारा चित्रपट म्हणजे ‘तिघी.’ ‘जागतिक महिला दिना’चे औचित्य साधून ‘तिघी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला दाखल झाला आहे.
 
तरुण दिग्दर्शिका जिजीविषा काळेच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर आई आणि दोन मुलींच्या नात्यातील सूक्ष्म भावना प्रामाणिकपणे उलगडतो. चित्रपटाची कथा हेमलता रानडे, तिच्या दोन मुली स्वाती आणि सारिका यांच्या नात्याभोवती फिरते. हेमलताची भूमिका भारती आचरेकर यांनी साकारली आहे, तर स्वातीच्या भूमिकेत नेहा पेंडसे आणि सारिकाच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी दिसतात. स्वाती आपला पती मल्हार (पुष्कराज चिरपुटकर) सोबत मुंबईत राहते, तर हेमलता आणि सारिका पुण्यात एकत्र राहतात. सारिकाचं आयुष्य प्रामुख्याने आईच्या आजारपणाभोवती आणि तिच्या देखभालीभोवती फिरतं. आईची काळजी घेताना तिने स्वतःच्या आयुष्याकडे आणि स्वप्नांकडे दुर्लक्ष केल्याची खंत तिच्या मनात सतत घर करून बसलेली असते. करिअर आणि आईची जबाबदारी या दोन टोकांमध्ये ती पूर्णपणे अडकलेली दिसते. त्यामुळे तिच्या मनात मोठी बहीण स्वातीबद्दलही नाराजी दडलेली असते. स्वाती लग्नानंतर मुंबईत स्थायिक झाली आणि आम्हाला एकटं सोडून गेली, अशी भावना सारिकाच्या मनात खोलवर रुजलेली.
 
दरम्यान, हेमलताला कर्करोगासारखा गंभीर आजार असल्याचं समोर आल्यानंतर, या तिघींमधील नात्यांतील दडलेले तणाव, मतभेद आणि न बोललेलं प्रेम हळूहळू वर येऊ लागतं. परंतु, दुसरीकडे स्वातीचं आयुष्यही फारसं सुखकर नाही. तिच्या ऑफिसमधील बॉस (जैमिनी पाठक) तिच्या कमकुवतपणाचा फायदा घेत, तिच्यावर मानसिक आणि लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न करतो. या माध्यमातून चित्रपटात  ‘कॉर्पोरेट कल्चर’ आणि सौम्य किंवा अदृश्य स्वरूपातील मानसिक, लैंगिक शोषणाचे परिणाम आणि त्यातून निर्माण होणारी भीती यांसारखे गंभीर विषय अत्यंत संवेदनशीलपणे हाताळले गेले आहेत. तसेच एक खूप मोठा ‘ट्विस्ट’सुद्धा आहे, जो तुम्हाला चित्रपटातच पाहावा लागेल. चित्रपटाची पटकथा निखिल महाजन यांनी लिहिली असून, संवाद प्राजक्त देशमुख यांचे आहेत. दिग्दर्शिका जिजीविषा काळेने पहिल्याच चित्रपटात आत्मविश्वासपूर्ण दिग्दर्शन करत, महाजन यांच्या पटकथेतील प्रत्येक स्तर प्रभावीपणे उलगडला आहे, असंच म्हणावं लागेल.
 
‘तिघी’ अनेक स्तरांवर मानवी नात्यांचा शोध घेतो. अनेकदा कौटुंबिक ताण-तणावावर, नात्यांच्या खोलीवर आधारित चित्रपट नाटकांसारखे किंवा टिव्ही मालिकांसारखे वाटतात. मात्र, ‘तिघी’मध्ये सिनेमॅटिक भाषा प्रभावीपणे वापरली आहे, तर चित्रपटातील एक-एक दृश्य सिनेमा संपल्यानंतरही मनात घर करून राहते. ‘सिनेमॅटोग्राफर’ मिलिंद जोग यांची फ्रेमिंग आणि मित रंगछटा कथेला साजेशा आहेत. जखमा, वेदना आणि दडपलेल्या भावना या सर्व गोष्टी त्यांनी दृश्यरूपात अत्यंत सुंदर पद्धतीने मांडल्या आहेत. चित्रपटात मोजकी; पण प्रभावी पात्रं आहेत. चित्रपटातलं घर विशेषत्वाने प्रेक्षकांना लक्षात राहील असं. कारण, संपूर्ण कथाच त्या घराभोवती फिरते. कोणत्याही कृत्रिम सेटचा वापर न करता, खर्‍या घराचा वापर केलेला पाहायला मिळतो. त्यामुळे कथा आणखीनच वास्तवदर्शी भासते. घरात आई आजारी असली की, संपूर्ण घर आजारी होतं, हीच गोष्ट अगदी प्रभावीपणे चित्रपटात दाखवली आहे.
 
"ताई, तुला आठवतं का? लहानपणी मी एक चित्र काढलं होतं. तू, मी आणि आपल्या दोन्ही बाजूला आई. तेव्हा संपूर्ण वर्ग माझ्यावर हसला होता,” या चित्रपटातील भावनिक संवादाची तीव्रता इतकी प्रभावी ठरते की, प्रेक्षकांच्या डोळ्यांत नकळत अश्रू तरळतील. हा संवाद केवळ दोन बहिणींमधील आठवणींचा नाही, तर त्यांच्या नात्यात दडलेल्या वेदना आणि प्रेम यांना खोलवर स्पर्श करून जातो. एकूणच चित्रपटातील संवाद ही या कथानकाची जमेची बाजू म्हणावी लागेल.कारण, लेखक प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेले संवाद अत्यंत वास्तववादी आणि भावनिक आहेत. प्रत्येक प्रसंगाला योग्य शब्दांची जोड मिळाल्याने पात्रांच्या भावना अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात.
 
चित्रपटात काही दृश्ये विशेष लक्ष वेधून घेतात. उदाहरणार्थ, सारिका घराच्या एका कोपर्‍यात बसलेली असते, तिच्या करिअरबद्दल मिळालेल्या एका बातमीमुळे ती एकाच वेळी स्तब्ध आणि आनंदित असते. बाहेर सुरू असलेले फटायांचे आवाज त्याक्षणी तिच्यासाठी त्रासदायकही ठरतात आणि काही सत्य उलगडण्याचं कारणही बनतात. कथेतील एक धक्कादायक गुपित आणि बालपणीच्या आघातांचा मोठेपणीच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो, हे चित्रपट अत्यंत संवेदनशीलतेने मांडतो. या रहस्याशिवायही ‘तिघी’ स्त्रीच्या आयुष्यातील गुंतागुंतीच्या भावविश्वाचा वेध घेण्यात प्रभावी ठरतो. स्त्रीत्व, जबाबदार्‍या, अपराधीपणाची भावना आणि नात्यांतील न बोललेले प्रश्न यांची मांडणी चित्रपटात वास्तववादी पद्धतीने करण्यात आली आहे.
अभिनयाच्या बाबतीतही ‘तिघी’ विशेष ठरतो. भारती आचरेकर यांनी हेमलताच्या हट्टी आणि कठोर स्वभावाला अत्यंत प्रभावीपणे साकारलं आहे. नेहा पेंडसे स्वातीच्या भूमिकेत मन हेलावून टाकणारा अभिनय करते; तर सोनाली कुलकर्णीने साकारलेली नाराज आणि अंतर्मुख सारिका प्रेक्षकांच्या मनात घर करते. पण, सारिकाच्या भूमिकेला आणखी वाव नक्कीच देता आला असता. अत्यंत महत्त्वाचं पात्र असताना त्याविषयी प्रेक्षकांच्या मनात फक्त कुतूहलच राहून जातं.
 
इतर कलाकारांनीही आपल्या भूमिका समर्थपणे साकारल्या आहेत. जैमिनी पाठक यांनी भयावह बॉसची भूमिका प्रभावीपणे रंगवली आहे, तर पुष्कराज चिरपुटकर स्वातीच्या विस्कळीत स्वभावाच्या पतीच्या भूमिकेत दिसतो. निपुण धर्माधिकारी यांनी सारिकाच्या समजूतदार मित्राची आणि बिझनेस पार्टनरची भूमिका साकारली आहे. त्यामुळे सगळी पात्रं आपापल्या भूमिकांमध्ये अगदी चपखल दिसतात.
 
एकूणच, ‘तिघी’ हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. अंतिम दृश्यात येणारा भावनिक टप्पा प्रेक्षकांना खोलवर स्पर्श करून जातो आणि चित्रपटाला एक प्रभावी पूर्णविराम देतो. ‘आईचं घर, हजार आठवणी’ या टॅगलाईनसह प्रेक्षकांसमोर आलेला ‘तिघी’ हा चित्रपट फक्त एक कथा सांगत नाही, तर प्रत्येकाच्या मनात दडलेल्या आई-मुलींच्या नात्याच्या असंख्य आठवणींना अलगद स्पर्श करतो. चित्रपट संपल्यानंतरही त्या आठवणी मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतात, हेच या चित्रपटाचं खरं यश म्हणावं लागेल.
 
दिग्दर्शक : जिजीविषा काळे, निर्माते : निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्नील भंगाळे, नेहा पेंडसे बायस
 
कलाकार : भारती आचरेकर, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी, पुष्कराज चिरपुटकर, जैमिनी पाठक
 
पटकथा : निखिल महाजन
 
रेटिंग : ४ स्टार
 
 
- अपर्णा कड