गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संगमावर वसलेले कोल्हापूर हे शहर शतकानुशतके आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जीवनाचे एक महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. या शहराची ओळख म्हणून केंद्रस्थानी उभे आहे करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर-महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि पूजनीय शक्तिस्थानांपैकी एक. सह्याद्रीच्या पायथ्याशी उभे असलेले हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचे स्थान नाही; ते चालुय घराणे आणि शिलाहार घराण्याच्या स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना, शाक्त तत्त्वज्ञानाचे जिवंत प्रतीक आणि प्राचीन भारतीय खगोलज्ञानाची साक्ष देणारे एक अद्भुत स्थळ आहे. आपल्यातले अनेकांचे हे कुलदैवतदेखील असेल. आजच्या ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने या शक्तिकेंद्राचा मागोवा घेण्यासाठी लेखप्रपंच.
पुराण परंपरेनुसार कोल्हापूरचा प्रदेश प्राचीन काळी ‘करवीर’ या नावाने ओळखला जात होता. ‘करवीर महात्म्य’ या ग्रंथात वर्णन केले आहे की, या प्रदेशात ‘कोल्हासुर’ नावाच्या राक्षसाचा अत्याचार वाढला होता. देवतांच्या विनंतीवरून देवी महालक्ष्मीने येथे अवतार घेतला आणि त्या असुराचा वध केला. त्यानंतर देवीने या प्रदेशातच निवास केला आणि त्यामुळे या क्षेत्राला ‘करवीरनिवासिनी’ महालक्ष्मीचे स्थान प्राप्त झाले. या परंपरेमुळे कोल्हापूर स्वतंत्र आद्यशक्तीच्या उपासनेचे केंद्र बनले. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोल्हापूर हे एक पूर्ण शक्तिपीठ मानले जाते.
संशोधकांच्या मते, महालक्ष्मी मंदिराची मूळ उभारणी इ.स. सातव्या-आठव्या शतकात प्रारंभिक चालुय (म्हणजेच, बदामी चालुय किंवा त्यांच्या जवळच्या प्रभावाखालील) काळात झाली असावी. पुढील शतकांमध्ये विशेषतः शिलाहार (९व्या ते १२व्या शतकात) आणि यादव राजवटीत मंदिराचा मोठा विस्तार झाला. शिलाहारांनी मंदिराला सध्याचे स्वरूप देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी दख्खनमध्ये मंदिर स्थापत्याला मोठा आश्रय दिला आणि कोल्हापूरचे मंदिर त्याच परंपरेतील नागर शैलीच्या पूर्णरूपाचा एक महत्त्वाचा भाग मानले जाते. मराठा साम्राज्याच्या काळातही या देवस्थानाला मोठा मान होता. अनेक सरदार आणि राजांनी मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी आणि उत्सवांसाठी देणग्या दिल्या. त्यामुळे मंदिर केवळ धार्मिकच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र बनले. आजूबाजूचा ओसरीचा परिसर, महाद्वार, गरुड मंडपाचा भाग इत्यादी गोष्टी या कालखंडात तयार केल्या गेल्या. म्हणजे या भागावर राज्य करणार्या प्रत्येकाने आपला हातभारदेखील या दैवीकार्याला लागावा, याच इच्छेने मंदिराचे काम केलेले दिसते.
महालक्ष्मी मंदिर संपूर्णपणे स्थानिक, भक्कम काळ्या बेसॉल्ट दगडात बांधलेले आहे. हा दगड दख्खनी वास्तुकलेचे वैशिष्ट्य आहे. या दगडांच्या भक्कम बांधणीमुळे मंदिराला एक स्थिर आणि गूढ भव्यता प्राप्त झाली आहे. मंदिराच्या आराखड्यात पारंपरिक हिंदू मंदिर स्थापत्यातील तीन मुख्य घटक स्पष्टपणे दिसतात-गर्भगृह (sanctum santorum), अंतराळ (vestibute) आणि मंडप (hall).
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दीपमाळा आणि गुढमंडप दिसतो. या मंडपातील स्तंभांवर अत्यंत सूक्ष्म नक्षीकाम केलेले आहे. खांबांची रचना ही ’घट-पल्लव’ प्रकारची असून त्यावर पट्टा (bands) आणि कीर्तिमुख यांची शिल्पे कोरलेली आहेत. नर्तकी, गंधर्व, यक्ष-यक्षिणी, विविध देवतांचे रूप आणि पौराणिक प्रसंग, विष्णूचे विविध अवतार, भैरव, श्रीयंत्र, राशीचक्र आणि शिव-पार्वती कथांचे दगडी शिल्प येथे दिसतात. स्तंभांच्या रचनेतून प्रकाश आणि सावलीचा खेळ निर्माण होतो, ज्यामुळे संपूर्ण मंडप जणू एक जिवंत शिल्पकाव्य वाटतो.
मंदिराभोवती मजबूत प्राकारभिंत असून, त्यात अनेक लहान देवालये आहेत. संपूर्ण संकुल पाहताना असे वाटते की, हे केवळ एक देवालय नसून, मध्ययुगीन धार्मिक जीवनाचे एक सजीव नगर आहे. मुख्य मंदिराच्या शिखरावर नागरशैलीचा प्रभाव दिसतो, जो नंतरच्या काळात पुनर्बांधणी करताना जोडला गेला असावा.
मंदिराच्या गर्भगृहात प्रतिष्ठित असलेली महालक्ष्मीची मूर्ती बहुमोल शिलेतून कोरलेली असून, सुमारे तीन फूट उंच आहे. देवीचे चार हात असून ती ‘म्हाळुंग’ (बिजापूरक), ‘गदा’, ‘ढाल’ (खेटक) आणि ‘पानपात्र’ ही आयुधे धारण केलेली आहे-हे तिचे शक्तीचे आणि समृद्धीचे रूप दर्शवते. ती अलंकारांनी सजलेली आहे. तिच्या मुकुटावर नाग (सर्प) आणि शिवलिंगाचे चिन्ह दिसते-हे शैव, शाक्त आणि वैष्णव परंपरेच्या समन्वयाचे (syncretism) प्रतीक मानले जाते. मूर्तीचे हे चतुर्भुज (four-armed) रूप हे योगमाया लक्ष्मीचे असल्याचे काही अभ्यासक मानतात.
या मंदिराचे एक महत्त्वपूर्ण आणि स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्य म्हणजे, देवीची मूर्ती पश्चिमाभिमुख (facing west) आहे. भारतीय मंदिर स्थापत्यात मूर्ती सामान्यतः पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून स्थापित केली जाते; त्यामुळे ही दिशा अत्यंत दुर्मीळ मानली जाते. पश्चिमाभिमुखतेमुळे या मंदिराच्या स्थापत्य नियोजनाला विशेष महत्त्व प्राप्त होते आणि किरणोत्सवासाठी ही रचना मूलभूत ठरते.
कोल्हापूर मंदिराचे सर्वात महत्त्वाचे धार्मिक वैशिष्ट्य म्हणजे, येथे महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तीन शक्तिरूपांची संयुक्त उपासना केली जाते. मुख्य गर्भगृहात महालक्ष्मी प्रतिष्ठित असून, तिच्या परिसरामध्ये दक्षिणेला महाकाली (दक्षिणमुखी) आणि उत्तरेला महासरस्वती (उत्तरमुखी) यांची मंदिरे आहेत.
देवी महात्म्य (दुर्गा सप्तशती) या ग्रंथातील तत्त्वज्ञानानुसार, या तीन देवता विश्वातील त्रिगुणांचे प्रतिनिधित्व करतात:
महाकाली - तमोगुण, संहार आणि संरक्षण
महालक्ष्मी - रजोगुण, सृजन आणि समृद्धी
महासरस्वती - सत्त्वगुण, ज्ञान आणि प्रकाश
या त्रिसंयोजनामुळे कोल्हापूरचे मंदिर आद्यशक्तीच्या पूर्णत्वाचे प्रतीक बनते. येथे भक्ताला देवीच्या सर्व शक्तिरूपांचा अनुभव एकाच ठिकाणी मिळतो.
हिंदू परंपरेनुसार देवी सतीच्या शरीराचे अवयव पृथ्वीवर पडलेल्या स्थळांना ‘शक्तिपीठे’ म्हणतात. अनेक पुराणपरंपरांनुसार कोल्हापूर येथे देवी सतीचा ’डोळा’ पडला होता, असे मानले जाते आणि म्हणूनच कोल्हापूर हे त्या पवित्र स्थळांपैकी एक आहे. त्यामुळे येथे देवीची उपासना केवळ स्थानिक देवतेप्रमाणे न होता, विश्वशक्तीच्या स्वरूपात केली जाते.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणीची सप्तशृंगी (अर्धे पीठ) ही प्रमुख स्थळे मानली जातात. या परंपरेत करवीरनिवासिनी महालक्ष्मीला पूर्ण शक्तिपीठ म्हणून विशेष स्थान आहे.
महालक्ष्मी मंदिराचे सर्वात अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे, येथे दरवर्षी साजरा होणारा किरणोत्सव. वर्षातून दोनदा-साधारणपणे दि. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान आणि दि. ९ ते ११ नोव्हेंबर या दरम्यान-सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणे पश्चिमेकडून महाद्वारातून आत येतात आणि मंदिराच्या प्रवेशमार्गातून सरळ गर्भगृहात प्रवेश करत देवीच्या मूर्तीवर पडतात आणि ती संपूर्ण देवीची मूर्ती सूर्यतेजाने उजळून जाते.
ही घटना योगायोग नसून, प्राचीन वास्तुकारांनी केलेल्या अचूक स्थापत्य नियोजनाचे उदाहरण आहे. मंदिराची पश्चिमाभिमुख दिशा, प्रवेशद्वाराची रचना, गरुड मंडपातील विशिष्ट छिद्रे आणि गर्भगृहाची स्थिती अशा प्रकारे आखण्यात आली आहे की, विशिष्ट दिवसांमध्ये सूर्यकिरणे देवीच्या प्रतिमेला स्पर्श करतात. हा क्षण हजारो भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या रचनेत खगोलशास्त्रीय अचूकता (astronomical precision) आणि स्थापत्यशास्त्राचा अद्भुत मिलाफ दिसतो.
किरणोत्सवामुळे महालक्ष्मी मंदिर प्राचीन भारतीय स्थापत्य आणि खगोलशास्त्र यांचा संगम दर्शवणारे एक महत्त्वाचे उदाहरण ठरते.
शतकानुशतके महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्र राहिले आहे. नवरात्रोत्सव (विशेषतः आश्विन महिन्यात), किरणोत्सव आणि विविध धार्मिक सोहळ्यांमुळे शहरात उत्सवमय वातावरण निर्माण होते. स्थानिक हस्तकला, व्यापार आणि पर्यटन यांनाही या मंदिरामुळे चालना मिळाली आहे. आजही कोल्हापूरला भेट देणार्या प्रवाशांसाठी महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून एक सांस्कृतिक अनुभव आहे.
करवीरनिवासिनी महालक्ष्मीचे मंदिर म्हणजे इतिहास, स्थापत्य, तत्त्वज्ञान आणि भक्ती यांचा एक अद्वितीय संगम आहे. काळ्या दगडात उभ्या असलेल्या या मंदिराच्या भिंतींमध्ये शतकानुशतकांचा इतिहास साठलेला आहे. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या त्रिस्वरूपातून विश्वशक्तीचे दर्शन घडते, तर किरणोत्सवाच्या दिवशी सूर्यकिरण देवीच्या पश्चिमाभिमुख प्रतिमेला स्पर्श करताच संपूर्ण मंदिर जणू दिव्य प्रकाशाने उजळून निघते.
या मंदिराच्या प्रांगणात उभे राहिल्यावर जाणवते-हे केवळ देवदर्शनाचे स्थान नाही; तर भारतीय संस्कृतीच्या शाश्वत परंपरेचे एक जिवंत केंद्र आहे. करवीरनिवासिनी अंबाबाईचे हे देवस्थान खरोखरच दगडात कोरलेली एक दिव्य कविता आहे, जी प्रत्येक भक्ताला आणि प्रवाशाला आपल्या शांत प्रकाशात सामावून घेते.
- इंद्रनील बंकापुरे