आम्ही भारतीय स्त्रिया

    08-Mar-2026   
Total Views |
Indian Women
 
जीवनावश्यक साधनसामग्रीची वंचितता, युद्धमय स्थितीमध्ये झालेले अत्याचार याविरोधात शांती आणि ‘ब्रेड’ म्हणजे अन्नपूर्तीसाठी अमेरिका, रशियातील महिलांनी त्या-त्या टप्प्यावर संघर्ष केला. पुढे हा संघर्ष, त्याचे यश यातूनच ‘जागतिक महिला दिना’ची मुहूर्तमेढ रोवली गेली; पण आता २०२६ साली महिलांचा संघर्ष संपला का? त्यानुसार ‘जागतिक महिला दिना’चे औचित्य काय आहे? याचा मागोवा भारतीयत्वाच्या दृष्टिकोनातून घेतला; तर जाणवते की, भारतीय स्त्रीशक्ती ही इतिहास घडवणारी शक्ती होती आणि आहे. आज ‘जागतिक महिला दिना’निमित्त या स्त्रीशक्तीचा जागर, तसेच वास्तव मांडणारा हा लेख...
 
भारतीय संस्कृतीनुसार मान्यता आहे की, स्त्री आणि पुरुष हे शिवशक्ती आहेत, परस्परपूरक आहेत. त्यांच्यापैकी कुणीही एक सरस किंवा कुणीही एक दुर्बल नाही. त्यामुळे फक्त पुरुषांसाठी किंवा महिलांसाठी स्वतंत्र दिवस भारतीय विचारधारेनुसार नसतोच. मात्र, तरीही बदलत्या जगाचे संदर्भ घेताना ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्ताने महिलांच्या सन्मान-कर्तृत्वाच्या जल्लोषात सहभागी होणे गरजेचे आहे. याअनुषंगाने जगाचा विचार केला तर जाणवते की, जग मुस्लीम, ख्रिश्चन आणि मुस्लिमेतर, ख्रिश्चनेतर अशा तीन भागांत विभागले आहे. या तीनही भागांत त्या-त्या संस्कृतीप्रमाणे महिलाविषयक संदर्भ वेगळे असले, तरीसुद्धा महिलांना संधी न देण्याचे आणि तिला पुरुषांपेक्षा कमी लेखण्याच्या काही लोकांच्या पद्धती समसमानच आहेत. भारतीय स्त्रियांबाबत म्हणायचे, तर भारतात पूर्वीपासून असे होते का? तर अजिबात नाही. मुस्लीम आक्रांतांमुळे महिलांवर निर्बंध आले. क्रूर आक्रांतांनी अत्याचार करू नये म्हणून मुली-महिलांच्या वागण्यावर, त्यांच्या मुक्त संचारावर बंदी आली. दुसरीकडे, भारतीय धर्मसंस्कृतीचा आणि स्त्री-कर्तृत्वाचा परामर्श घेतला तर जाणवते की, भारतीय इतिहासात प्रत्येक वळणावर भारतीय स्त्रियांचे इतिहास घडवण्यासाठीचे योगदान शब्दातीत आहे. ‘जागतिक महिला दिना’चा मागोवा घेताना, या सगळ्या स्त्रीशक्तीचे स्मरण करणे आवश्यक आहे.
 
वैदिक काळात ‘ऋग्वेदा’च्या सूक्तांची रचना करणार्‍यांमध्ये लोपामुद्रा, घोषा, अपाला, विश्ववारा, आणि सिकता या महिलांचे योगदान आहे; तर गार्गी आणि मैत्रेयी या विदुषी शास्त्रार्थामध्ये निपुण होत्या. त्यावेळी शिक्षण घेणार्‍या महिलांचे दोन वर्ग होते, एक ‘सद्योद्वाहा’ व दुसरा ‘ब्रह्मवादिनी’. ‘सद्योद्वाहा’ वर्गातील मुली १६ वर्षांपर्यंत गुरुकुलात शिक्षण घेत, त्यांना ६४ कलांचे शिक्षण दिले जाई. पुढे १६व्या वर्षांनंतर त्या विवाह करत असत. इथे विवाह करत असत हे म्हटले आहे, म्हणजे त्या कुणाच्याही मर्जीने नव्हे; तर स्वतःच्या इच्छेने विवाह करत असत, पती निवडत असत. तर ‘ब्रह्मवादिनी’ वर्गातील स्त्रिया अविवाहित राहून ब्रह्मचर्याचे पालन करत, आजन्म विद्याग्रहण करत. हो, विधवांचा पुनर्विवाहही होत असे, म्हणजेच सती जाणे ही पद्धत नव्हती. ‘रामायण’, ‘महाभारता’चा आधार घेतला, तर त्याकाळीही महिलांचे जीवन हे काही दुर्बल शोषित-वंचिताचे जगणे नव्हते. उलट, माता सीतेसाठी ‘रामायण’ आणि द्रौपदीसाठी ‘महाभारत’ घडल्याचे म्हटले जाते. याचाच अर्थ, स्त्रियांचा सन्मान, आदर आणि सुरक्षितता याबद्दल कोणतीच तडजोड केली जात नव्हती. बौद्धकाळातही संघाची प्रथम ‘भिक्षुणी’ महाप्रजापति गौतमी, आम्रपाली, मगधची राणी खेमा, किसा गौतमी, विशाखा आणि यशोधरा या मातृशक्तींचे जीवन धम्मासाठी प्रज्वलित झाले.
 
‘थेरीगाथा’मध्ये भिक्खुनींनी स्वतंत्र काव्य आणि आध्यात्मिक स्वातंत्र्य मांडले. दुसरीकडे, जैनपरंपरेतही ‘साध्वी’ या ज्ञान, दर्शन आणि चारित्र्याचे प्रतीक आहेत. प्राचीन काळापासून त्यांना शिक्षण आणि धर्म प्रचार-प्रसाराचे पूर्ण स्वातंत्र्य होते. मंदिरनिर्माणामध्ये आणि तीर्थयात्रा आयोजनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. साध्वी चंदनबाला, ‘श्वेतांबर’ संप्रदायानुसार मल्ली देवी, राजा शतानीकची पत्नी मृगावती, ११व्या शतकातली माचिकब्बे या मातृशक्तीचे जैन संप्रदायातले योगदान कुणी तरी विसरेल का? शिखांचा विचार करता, गुरुनानक देवजी म्हणाले होते, "ज्यांच्यापासून राजे आणि महापुरुषांचा जन्म होतो, त्या स्त्रीला निंदनीय किंवा लहान कसे म्हणता येईल?” इतिहासात अनेक शीख महिलांनी धाडस, नेतृत्व आणि आध्यात्मिक उच्चता दाखवली. मुघलांविरुद्ध लढणार्‍या शीख सैनिकांचे नेतृत्व करणारी महान योद्धा माई भागो. गुरू अंगद देवजींच्या पत्नी, ज्यांनी ‘लंगर’ व्यवस्थेत मोलाची भूमिका बजावली, त्या माता खिवी. ज्यांनी सर्वोच्च बलिदान दिले, त्या वीरमाता गुजरी. संतपरंपरेतही संत मीराबाई, संत मुक्ताई, संत जनाई, ‘शैव’परंपरा जपणार्‍या संत अक्का महादेवी, संत लाल डेड अणि संतपरंपरेतल्या कितीतरी महिला संत. त्यांची आध्यात्मिक-धार्मिक शक्ती, प्रतिभा अलौकिकच. पुढच्या काळात वीरमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राणी चेन्नमा, राणी लक्ष्मीबाई ,राणी पद्मावती, राणी गायदिन्ल्यू यांचे शौर्यतेज, धर्मभावना आणि त्यानंतर माता सावित्रीबाई फुले, माता रमाबाई अशा असंख्य थोर भारतीय स्त्रियांच्या कर्तृत्वाने, त्यागाने भारताचा इतिहास घडला आहे.
 
या थोर मातृशक्तीचा वारसा जपत, पुढे स्त्रियांचे राष्ट्रीय संघटन उभारणार्‍या राष्ट्र सेविका समितिच्या लक्ष्मीबाई केळकर यांचे कार्यही ऐतिहासिक आहे. या सर्व स्त्रीशक्तींनी सिद्ध केले की, परिस्थितीवर विजय मिळवायचा असेल, तर स्वतः कर्तृत्वासाठी विचारांसाठी आणि त्यागासाठी सिद्ध व्हावे लागते. सध्या याच विचारांनी भारतीय स्त्रीशक्ती कार्यरत आहे. त्याला पूरक म्हणूनच की, काय देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये भारतीय स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठीचा अध्याय सुरू आहे. शिक्षा आणि कौशल्य विकास, आर्थिक स्वतंत्रता आणि समान वेतन, राजकीय प्रतिनिधित्व आणि नेतृत्व, सुरक्षा आणि कायदेशीर अधिकार, तसेच स्वास्थ्य आणि कल्याणापर्यंत जाण्याची संधी या पाच आयामांवर प्रयत्न सुरू झाले.
 
या पार्श्वभूमीवर जगभरात काय सुरू आहे? अमेरिकेसारख्या पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्‍या देशात आजही महिलांना गर्भपाताचा अधिकार असावा की, नसावा यावर चर्चा होते; तर अनेक मुस्लीम देशांमध्ये महिलांच्या केसांमध्ये सैतान अडकतो म्हणून त्यांनी ‘हिजाब’ घातलाच पाहिजे, अन्यथा त्यांना कठोर शिक्षा करावी, या अविचाराने कायदे होतात. त्याला विरोध म्हणून आंदोलन होते. सुदैवाने आपल्या भारतात तसे नाही. देशाच्या घटनेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय महिलांना मतदानाचा समानतेचा आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला. १९४७ सालची स्वातंत्र्याची पहाट संविधानाच्या कायद्यानुसार खरेच भारतीय महिलांच्या स्वातंत्र्याची पहाट ठरली.
 
आजची भारतीय स्त्री खंबीरतेने उभी आहे. अष्टभूजा देवीप्रमाणे ती समग्र कार्यात यश मिळवत आहे. इथे आक्षेप असाही घेतला जातो की, भारतीय स्त्रीला ‘अष्टभूजा देवी’ म्हणत तिच्याकडून एकाच वेळी असंख्य काम करून घेऊन तिला राबवले जाते. ‘त्यागमूर्ती’च्या गोंडस नावाखाली तिचे शोषण केले जाते. तर, मुद्दा आहे आत्मिक समाधानाचा. जर त्या महिलेला या सगळ्यातून आत्मिक समाधान मिळत असेल; तिचे म्हणून जे कुटुंब आहेे, त्याचे भले होत असेल आणि त्यात तिला सुख वाटत असेल, तर यामध्ये तिचे शोषण होते, असे कसे म्हणायचे? तिचे मन, तिचे विचार, तिची बुद्धी परिस्थितीनुसार काय करायचे, तिला काय हवे, हे ती स्वतः ठरवत असेल; तर तिचे शोषण होते असे म्हणणे, हे तिचे विचारस्वातंत्र्य नाकारण्यासारखे आहे. (हो; पण जिथे तिला गुलाम बनवून तिच्या मर्जीविरोधात राबावे लागते, तो अन्यायच आहे.) दुसर्‍या स्तरावर भारतीय स्त्री ही कुटुंबवत्सल आहे, म्हणून जागतिक व्यवहारात मागे आहे का? तर तसे नाही. राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण सर्वांमध्ये ती पुढे आहे. ‘मंगळयान’निर्मिती असो की, पाकिस्तानचे कंबरडे मोडणारे ‘ऑपरेशन सिंदूर’ असो, सगळ्यामध्ये महिलाशक्तीचे कर्तृत्व सिद्ध झाले.
 
त्यामुळेच ‘जागतिक महिला दिना’च्या संकल्पनेचे जागतिक स्तरावरचे आणि भारतीय स्तरावरचे मापदंड हे वेगळे आहेत. कारण, स्वतःच्या सुखासाठी दुसर्‍यांना चिरडून टाकण्याची संस्कृती अजून तरी भारतात पूर्णतः रुजली नाही. प्रेम, नातेसंबंध, परस्पर सौहार्द, सौख्य या गोष्टी आजही भारतात आहेत. एकल कुटुंबव्यवस्था फोफावली असली, तरीसुद्धा कुटुंबाचे मोल जाणणारे लोक समाजात आजही बहुसंख्य आहेत. ते मानतात की, कुटुंबव्यवस्थेचा आधार घरची स्त्रीशक्तीच आहे. त्यामुळेच ‘बाईपण भारी देवा’ यापेक्षा नात्याचे बंध जपत कर्तृत्वाची उत्तुंग भरारी घ्यावी, हे मानणार्‍या बहुसंख्य स्त्रिया आजही भारतात आहेत.
 
म्हणून आजच्या भारतीय स्त्रीला समस्या नाहीत, असे नाही. ‘लव्ह जिहाद’ आणि ‘ड्रग्ज जिहाद’, काही लोकांच्या अहंकारी वृत्तीमुळे समानतेची संधी न मिळणे, गरिबी किंवा इतर कारणांमुळे शिक्षणाची संधी नाकारणे, इतरांच्या भीतीने तिच्यावर बंधने लादणे, युद्धात तिला ‘सॉफ्ट टार्गेट’ आणि शत्रूला नमवण्याचे साधन मानणे, एक ना अनेक समस्या आहेत. भरीस भर भारतीय स्त्री-मानसिकतेला पाश्चात्त्य आणि आता तर मुस्लीम संस्कृतीनुसारही अधोरेखित करण्याचे अक्षम्य काम काही लोक मुद्दाम करतात. मुक्तता म्हणजे फक्त लैंगिक स्वैराचार आणि त्यासाठी सगळी नातीगोती, धर्म, समाज सोडणे ही संकल्पना भारतीय स्त्रीच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. ते तेच लोक आहेत, ज्यांना भारतीय धर्मसंस्कृतीचे वावडे आहे, ज्यांना भारतीय स्त्रीशक्तीचा नाश करायचा आहे. ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने या असल्या विकृत लोकांना ओळखणे गरजेचे आहे. त्यानुसार, गरज आहे देश-समाजामध्ये आपले स्थान, आपले योगदान काय आहे हे जाणून घेण्याची, गरज आहे या देशाच्या थोर स्त्रीशक्तीचा वारसा जपत स्वतःच्या आणि देशाच्या कल्याणात्मक विकासामध्ये योगदान देण्याची. तूर्तास जागृत ‘महिला दिना’च्या सगळ्यांनाच शुभेच्छा!
 
‘गिव्ह टू गेन’ : जागतिक महिला दिन संकल्पना, २०२६
 
‘जागतिक महिला दिन, २०२६’चा संकल्प आहे, ‘गिव्ह टू गेन’ म्हणजेच दानातून लाभ होय. ही संकल्पना महिला सक्षमीकरण, लैंगिक समानता आणि परस्परांना मदत करून प्रगती साधण्यावर भर देते. यामध्ये महिलांना काय द्यायचे आहे, तर महिलांना सन्मान द्या, दान द्या, दृश्यता/ओळख द्या, ज्ञान द्या, आर्थिक मदत उपलब्ध करून द्या, न्याय द्या, संसाधने उपलब्ध करून द्या, आपला आवाज उठवा, सुरक्षा द्या, सत्य सांगा, समान वेतन द्या, उत्सव साजरा करा, प्रायोजन द्या, मार्गदर्शन द्या, श्रेय द्या, निधी द्या, परिचय करून द्या, कार्यशाळा आयोजित करा, संधी द्या, सुरक्षा द्या, प्रशिक्षण द्या, आव्हानात्मक काम द्या, प्रगतीस चालना द्या, आदर्श निर्माण करा/आदर्श ठेवा, विकासासाठी संधी द्या, प्रवेश द्या/ पोहोच उपलब्ध करून द्या, वेळ द्या, हे जे मुद्दे अधोरेखित झाले आहेत; त्यातील काहीच मुद्द्यावर जरी समाजातून प्रयत्नपूर्वक कार्य झाले, तरी महिला सुरक्षित, सुखी, संपन्न होतील. दि. ८ मार्च रोजीच नव्हे, तर ३६५ दिवस हा संकल्प सिद्ध करायला हवा.
 
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.