Girish Mahajan : राजकीय पोळी भाजण्यासाठी वल्गर विधानं; मंत्री गिरीश महाजनांचं रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

    08-Mar-2026   
Total Views |
Girish Mahajan
 
मुंबई : (Girish Mahajan) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार गंभीर आरोप करत आहेत. भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी रोहित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे बारामती परिसरातील दृश्यमानता कमी झाली आणि त्यामुळेच विमान अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त केली. तर आमदार रोहित पवार यांनी भाजपकडून गलिच्छ पद्धतीचे राजकारण सुरु असल्याचे म्हणत हा आरोप फेटाळला. भाजपवर केलेल्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित दादांच्या अपघाती निधनाचे राजकारण करू नये, असे महाजन यांनी म्हटले. राजकीय पोळी भाजण्यासाठी कोणीही असे वल्गर विधान करू नये, असेही ते म्हणाले.
 
रोहित पवारांचा घातपाताचा संशय
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ ला विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर अवघा महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अशा पद्धतीने शेवट होईल याची कल्पना कुणालाच नव्हती. दरम्यान अजित पवारांच्या अपघातानंतर हा अपघात आहे की घातपात याच्या चर्चा सुरु झाल्या.
 
आमदार रोहित पवारांनी तीन ते चारवेळा पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवारांचा मृत्यू घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. त्यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेला अहवाल, विमानसेवा देणाऱ्या कंपनीला मिळत असलेले अभय, तसेच त्या कंपनीच्या मालकाला चौकशीदरम्यान मिळालेली विशेष वागणूक यावर भाष्य केले होते. अजित पवारांना न्याय मिळाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार
रोहित पवारांच्या आरोपांवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. “गलिच्छ राजकारण कुणाकडून सुरु आहे सगळ्यांना दिसतं आहे. पण मी पुन्हा सांगेन की अजित पवारांच्या अपघाती निधनाचं राजकारण कुणीही करु नये. उगाच काहीही बोललं जातं आहे, कुणी म्हणतंय बॉम्ब ठेवला, कुणी म्हणतंय सुसाईड बॉम्बर होता, वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. कुणीही अकलेचे तारे तोडत आहेत. या प्रकरणाची चौकशी व्हावी ही सगळ्यांची भावना आहे. मुख्यमंत्र्यांनाही हेच वाटतं आहे. त्यामुळे राजकीय पोळी शेकण्यासाठी कुणी व्हल्गर विधान करु नये,” असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
 
जय पवारही घेणार पत्रकार परिषद
अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे सोमवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. जय पवार या पत्रकार परिषदेत काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने तसेच मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. केंद्र शासनाकडूनही गंभीर दखल या अपघाताची घेण्यात आली आहे. कुणाला काही वाटत असेल तर त्यांनी दिल्लीला जावं. अपील करायचं असेल तर ते करावं. कुणाला अर्ज करायचा असेल तर करू शकतात. काही मागणी करायची असेल तर करू शकतात. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये १०० टक्के पारदर्शकता आहे. संभ्रम असण्याची काडीमात्र शक्यता नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.