सिलीगुडी : (Droupadi Murmu) पश्चिम बंगालमध्ये कार्यक्रमाचे ठिकाण बदलल्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, “मला असे वाटते की राज्य सरकार आदिवासी समाजाचे भले करू इच्छित नाही, ममता माझ्या धाकट्या बहिणीसारख्या आहेत. मी देखील बंगालची कन्या आहे,” असं त्या म्हणाल्या.
राष्ट्रपती संथाळ समाजाच्या ९व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये आल्या होत्या. या परिषदेदरम्यान कार्यक्रमाचे ठिकाण बदलल्यामुळे अनेक लोक उपस्थित राहू शकले नाहीत, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमस्थळ बदलल्यामुळे नाराजी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, मूळ कार्यक्रम सिलीगुडीच्या बिधाननगर येथे आयोजित होणार होता. त्या ठिकाणी मोठे मैदान असल्यामुळे मोठ्या संख्येने लोक कार्यक्रमात सहभागी होऊ शकले असते. मात्र प्रशासनाने सुरक्षा आणि इतर व्यवस्थापकीय कारणांचा हवाला देत कार्यक्रमाचे ठिकाण बदलून बागडोगरा विमानतळाजवळील गोपालपूर येथे ठेवले.
त्या म्हणाल्या की, “जर कार्यक्रम बिधाननगरमध्ये झाला असता तर अधिक चांगले झाले असते. तिथे खूप जागा आहे आणि जास्त लोक सहभागी होऊ शकले असते.” गोशाईपूर परिसरातील मैदान लहान असल्यामुळे अनेक लोक कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. तसेच कार्यक्रमाचे ठिकाण अशा भागात ठेवण्यात आले जिथे लोकांना पोहोचणे कठीण होते, असेही त्यांनी सांगितले.
स्वागतासाठी मंत्री अनुपस्थित
जेव्हा राष्ट्रपती शनिवारी दिनांक ०७ मार्च ला दुपारी कार्यक्रमस्थळी पोहोचल्या, तेव्हा फार कमी लोक उपस्थित होते. सिलीगुडीचे महापौर गौतम देब हे विमानतळावर त्यांचे स्वागत करणारे एकमेव प्रतिनिधी होते. प्रोटोकॉलनुसार, राष्ट्रपतींचे स्वागत करण्यासाठी सहसा मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारमधील एखादा मंत्री उपस्थित असतो.
मात्र या वेळी सिलीगुडीचे महापौर गौतम देब हेच विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. याबाबत बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या, “ममता बॅनर्जी माझ्यावर नाराज आहेत की नाही, हे मला माहीत नाही. पण त्याने काही फरक पडत नाही.”
संथाळ समाजाच्या योगदानाची आठवण
कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपतींनी संथाळ समाजाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात या समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, मात्र त्याला इतिहासात पुरेशी मान्यता मिळालेली नाही.
त्या म्हणाल्या की, बाबा तिलका मांझी यांनी सुमारे २४० वर्षांपूर्वी शोषणाविरुद्ध बंड पुकारले होते. त्यानंतर १८५५ मध्ये सिदो-कान्हू, चांद-भैरव आणि फूलो-झानो यांनी संथाळ हुलचे नेतृत्व केले आणि अन्यायाविरुद्ध लढा उभारला.
शिक्षण आणि संस्कृती जपण्याचे आवाहन
राष्ट्रपतींनी संथाळ तरुणांना शिक्षण स्वीकारण्याचे आणि आपली भाषा व परंपरा जपण्याचे आवाहन केले. त्यांनी ओल चिकी लिपीचे शोधक पंडित रघुनाथ मुर्मू यांचे स्मरण करत सांगितले की, १९२५ मध्ये तयार झालेल्या या लिपीमुळे संथाली भाषा आणि साहित्याला नवी ओळख मिळाली.
त्या म्हणाल्या की, आदिवासी तरुणांनी शिक्षण आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भाषा, संस्कृती आणि परंपरा जपत प्रगतीकडे वाटचाल केल्यास आदिवासी समाज देशाच्या विकासात मोठे योगदान देऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.