"कल्याण पूर्व मतदारसंघ हा माझ्यासाठी केवळ मतदारसंघ नसून, एक कुटुंब आहे. मतदारसंघातील विकासकामांना आता गती मिळत आहे. मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवीत, कल्याण पूर्वचा चेहरामोहरा बदलणार असून, या मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास आहे,” अशी भावना कल्याण पूर्व मतदारसंघाच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली. आज ‘जागतिक महिला दिना’निमित्ताने त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत...
अनेक वर्षे कुटुंबाची जबाबदारी सांभाळत, आता आमदार म्हणून कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आपण यशस्वीपणे प्रतिनिधित्व आपण करीत आहात. तेव्हा, या मतदारसंघाच्या पालक म्हणून आपल्या काय भावना आहेत?
घर सांभाळताना जे जे शिकायला मिळाले, तेच आज लोकप्रतिनिधी म्हणून उपयोगी पडत आहे. संयम, नियोजन आणि प्रत्येकाची काळजी घेण्याची सवय मला घरातूनच मिळाली. आज मतदारसंघातील नागरिकांनाही मी माझ्या कुटुंबासारखेच मानते. लोकांनी दिलेला विश्वास हीच माझी ताकद आहे. पद हे माझ्यासाठी सत्ता नाही, तर सेवा करण्याची जबाबदारी आहे.
कल्याण पूर्व मतदारसंघाच्या विकासासाठी आपले नेमके कोणत्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत?
कल्याण पूर्व मतदारसंघाचा विकास हा माझ्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. काही गोष्टी मागे राहिल्या होत्या; पण आता मतदारसंघात विकासकामांना गती मिळत आहे. रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य या बाबींवर कामदेखील सुरू आहे. निधी आणि मंजुरीसाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. कल्याण पूर्वला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
आज ‘जागतिक महिना दिन.’ तेव्हा, एक महिला आमदार म्हणून आपल्या मतदारसंघात महिलांसाठी काही विशेष योजना राबवित आहात का?
मी असे मानते की, महिला सक्षम झाल्या, तर घर आणि समाज दोन्ही मजबूत होतात. त्यामुळे महिलांना बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी करण्याचा आमचा प्रयत्न असतो. याशिवाय, महिलांसाठी स्वयंरोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. शासकीय योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचावा, यासाठी मार्गदर्शन केले जाते. मुलींच्या शिक्षणाकडे आणि त्यांच्या सुरक्षिततेवर मी विशेष लक्ष दिले आहे. महिलांना स्वावलंबी बनवणे, हेच माझे ध्येय आहे.
अलीकडच्या काळात शाळकरी मुली, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसते. असे प्रकार रोखण्यासाठी एक महिला आमदार म्हणून आपली भूमिका काय?
मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहेत. महिलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, दोषींवर कडक कारवाई व्हावी, यासाठी प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवला जातो. त्याचबरोबर मुलांना चांगले संस्कार आणि महिलांचा सन्मान शिकवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. समाजानेही याविरोधात ठाम भूमिका घेतली पाहिजे.
महापालिका आणि नगर परिषद निवडणुकीत कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथे महिला प्रतिनिधींना मोठे यश मिळाले. यानिमित्ताने राजकारणात महिलांचा सहभागही वाढलेला दिसतो. या राजकारणातील बदलाकडे आपण कसे बघता?
महिलांनी राजकारणात पुढे यावे, ही काळाची गरज आहे. समाजाने महिलांवर विश्वास दाखवला आहे, हे आनंददायी आहे. महिला निर्णयक्षम असतात आणि संवेदनशीलतेने काम करतात. त्यामुळे त्या समाजकारण आणि राजकारण दोन्ही उत्तम प्रकारे करू शकतात.
आज ‘जागतिक महिला दिना’निमित्त ‘नारीशक्ती’ला काय संदेश द्याल?
सबल व्हा! सशक्त व्हा! स्वकर्तृत्वाने जग जिंका!!!