सुवर्णाची ‘गगनभरारी’

    07-Mar-2026
Total Views |
Wing Commander Suvarna Joshi
 
दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर हवाईदलात रुजू होत, सैन्यदलात महिलांना ‘पर्मनंट कमिशन’ मिळवून देण्यापर्यंतचा विंग कमांडर सुवर्णा जोशी यांच्या प्रवासाचा उद्याच्या ‘महिला दिना’निमित्त घेतलेला मागोवा...
 
मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एका धाडसी मुलीला लहानपणापासून काहीतरी साहसी करण्याची इच्छा होती. पण, यासाठी आवश्यक असे मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हते. तिला फक्त एका संधीची प्रतीक्षा होती. ती मिळताच, तिने त्या संधीचे सोने करत, भारतीय हवाईदलातील प्रथम काही महिलांपैकी एक होण्याचा बहुमान देखील मिळवला.
 
ही कथा आहे, मुंबईच्या सुवर्णा जोशी यांची. त्यांचे वडील मुंबईच्या एका नामांकित कंपनीत इलेक्ट्रिशियन होते. जोशी कुटुंब तेथेच कॉर्टर्समध्ये राहात असे. सुवर्णा यांचे शिक्षण घराजवळील ‘नूतन विद्या मंदिर’ या एका बैठ्या शाळेत झाले. मराठी माध्यमातून शिक्षण घेत, सुवर्णा यांनी दहावीला बोर्डात क्रमांकदेखील मिळवला होता. लहानपणापासूनच सुवर्णा यांना ‘स्काऊट गाईड’ आणि त्यातील परेडमध्ये रुची होतीच. पण, त्या क्षेत्रातील संधींची त्यांना काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे आपल्यातील गणित आणि भौतिकशास्त्राची आवड जपत, त्यांनी बारावी आणि पुढे अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले. पण, अभियांत्रिकीसाठी प्रवेश न मिळाल्यामुळे, त्यांनी रुईया महाविद्यालयातून ‘बीएस्सी-स्टॅटिस्टिक्स’ विषयामध्ये पदवी संपादन केली. तेथे ‘एनसीसी’ उपलब्ध नव्हते आणि ‘ओपन युनिट’ खूपच दूर होते; त्यामुळे सुवर्णा ‘एनसीसी’ करू शकल्या नाहीत. एखाद्या सामान्य मुलीसारखे त्यांनीही ‘एमएस्सी’पर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत, ‘एलआयसी’मध्ये नोकरी मिळवली.
 
सैन्यदलात जाऊन, देशसेवा करण्याचा कोणताही मार्ग त्यांच्या दृष्टिक्षेपात तोवर नव्हताच. एक दिवस रुईया कट्ट्यावर गप्पा मारताना, एका मैत्रिणीने वर्तमानपत्रातील कात्रण त्यांना दाखवले. त्यावेळी भारतीय हवाईदलात महिलांना प्रथमच प्रायोगिक स्तरावर पाच वर्षांसाठी रुजू केले जाणार होते. हा क्षण सुवर्णा यांच्यासाठी ’गगन ठेंगणे होणे’ वाक्प्रचाराचा अर्थ अनुभवणारा ठरला. परीक्षेची अजिबातच माहिती नसतानाही त्यांनी लगेचच अर्ज केला; पण अगदी कृश असलेल्या सुवर्णा यांचे वजन कमी असल्यामुळे त्यांची निवड झाली नाही. पण, त्यांच्या जिद्द आणि मेहनतीमुळे त्यांना मुलींच्या तिसर्‍या बॅचमध्ये संधी मिळाली.
चापूनचोपून रिबिन लावून बांधलेल्या दोन वेण्या, कमी उंची आणि ‘बम्बय्या हिंदी’मुळे, तेथील मुली त्यांना हसत असत. पण, अखेरीस ९० हजार मुलींमधून निवडल्या गेलेल्या केवळ १२ मुलींपैकी सुवर्णा एक होत्या.
 
मात्र, त्याचवेळी सुवर्णा यांनी लग्न करून ‘मार्गी लागावे’, असा विचार त्यांच्या आई-वडिलांनी मांडला. त्याचवेळी त्यांच्याकडे, ‘एलआयसी’मधून इंग्लंडला जाण्याचीदेखील संधी चालून आली होती. परंतु, सुवर्णा यांनी इंग्लंडमधील ‘सेटल’ जीवनशैलीऐवजी ‘इंडियन एअरफोर्स अ‍ॅकेडमी’मधील खडतर प्रशिक्षणच स्वीकारले. त्या काळात सैन्यदलात महिला नवीनच असल्यामुळे, त्यांच्या शारीरिक क्षमतेचा अंदाज न येऊन त्यांना पुरुषांसारखेच प्रशिक्षण दिले जाई. त्यात थकून जाऊन ‘आपला निर्णय चुकला तर नाही ना?’ असे सुवर्णा यांच्याही मनात एकदा आलेच. पण, त्या मागे हटल्या नाहीत. प्रशिक्षणानंतर त्या ‘पायलट ऑफिसर’ पदावर ‘एज्युकेशन ब्रॅन्च’मध्ये रुजू झाल्या. हवाईदलात नवीन रुजू झालेल्या ‘एअरमॅन’ना, त्या प्रशिक्षण देत असत. पुरुषाने एखाद्या महिलेचे वर्चस्व स्वीकारणे, आजही तसे अपमानास्पदच; पण त्यांच्या नाराजीचा सामना करत, त्यांनी आपली प्रशिक्षकाची जबाबदारी चोख निभावली.
 
सुवर्णा यांना लहानपणापासूनच काहीतरी साहसी करण्याची हौस होती. त्यामुळे ‘एज्युकेशन ब्रॅन्च’मधील काम सांभाळत अधेमधेे सुटी घेत त्यांनी पॅराग्लायडिंग, पॅराजंपिंग, कॉम्बॅट जंपिंग, स्कायडायव्हिंगचे विशेष प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण फक्त मुलांनाच दिले जात असताना, त्या हट्टाने ते शिकल्या. यामुळेच पुढे ‘स्कायडायव्हिंग’ करत हवेत ‘तिरंगा’ तयार करणार्‍या मुलींच्या पहिल्या बॅचमध्ये, त्यांना मानाचे स्थानही मिळाले. त्यांचे कौशल्य पारखून एका वरिष्ठांनी त्यांना ‘माऊंटेनिअरिंग’चे प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला. त्यातून त्यांची स्वातंत्र्याच्या ‘सुवर्ण महोत्सवा’मधील मोहिमेतील, महिलांच्या तुकडीची प्रमुख म्हणून निवड झाली. त्यात त्यांनी २१ हजार फुटांवर हवाईदलाचा झेंडा फडकावत, आनंदाचा परमोच्च बिंदू गाठला. या आणि अशा असंख्य मोहिमांबद्दल त्यांना, वेळोवेळी विविध पदकांनी गौरवण्यातसुद्धा आले आहे. सुवर्णा यांचे पतीदेखील हवाईदलातच ‘हेलिकॉप्टर पायलट’ म्हणून सेवारत आहेत.
 
केवळ प्रायोगिक स्तरावर रुजू झालेल्या या महिला अधिकार्‍यांना त्यांची कामगिरी पाहून, आधी सहा आणि नंतर चार वर्षे ‘एक्सटेन्शन’ मिळत गेले. त्यानंतर मात्र त्यांना निवृत्त व्हावे लागले. परंतु, सुवर्णा आणि त्यांच्या काही सहकार्‍यांना हवाईदलात आणखी देशसेवा करण्याची इच्छा होती. त्यांनी हार न मानता महिलांनाही ‘पर्मनंट कमिशन’ मिळावे, यासाठी न्यायालयात धाव घेतली. त्या काळात एक वर्ष त्या एका खासगी कंपनीत काम करत होत्या. न्यायालयाने महिलांच्या बाजूने निर्णय देताच, सुवर्णा पुन्हा हवाईदलात रुजू झाल्या. तेव्हापासून मुलींना सैन्यदलात ‘पर्मनंट कमिशन’ही मिळू लागले. एकूण २२ वर्षे सेवा देत सुवर्णा जोशी ‘विंग कमांडर’ पदावरून निवृत्त झाल्या. पण, आजही त्या आपला साहसी खेळांचा छंद नियमितपणे जोपासत आहेत. सुवर्णा हवाईदलात फक्त सेवा देत नव्हत्या, तर त्यांच्यासारख्या असंख्य सुवर्णांचे स्वप्न त्या जगत होत्या. सुवर्णा यांनी मिळवून दिलेल्या ‘पर्मनंट कमिशन’चा लाभ घेणार्‍या अनेक तरुणी, आजही त्यांना आदर्शस्थानी मानतात.
 
 
- ओवी लेले