राज्यसभेसाठी पवारांनी डाव साधला? काय घडलं?

    07-Mar-2026   
Total Views |


मुंबई, दि. ७ : असंख्य भेटीगाठी, चर्चा, रुसवेफुगवे आणि दावे-प्रतिदावे या सगळ्यानंतर अखेर शरद पवार यांना महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. खरंतर, महाविकास आघाडीच्या वाट्याला राज्यसभेच्या सातपैकी केवळ एक जागा येणं हीच मूळ समस्या होती. म्हणूनच, राज्यसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता या एका जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार द्यायचा यासाठी तिन्ही पक्षांची धडपड सुरु झाली. मात्र, शेवटी तिन्ही पक्षांनी मिळून शरद पवारांचं नाव राज्यसभेसाठी पुढं केलं. दुसरीकडे, भाजपनेही आपले चार उमेदवार जाहीर केले ज्यात, दोन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलीये. तर, अनेक इच्छुक रांगेत असताना ज्योती वाघमारेंना संधी देऊन शिवसेनेनेही मास्टरस्ट्रोक केला. या सगळ्यात उबाठा गटाच्या प्रियंका चतुर्वेदी मात्र, मागे पडल्या. पण, एकेकाळी राजकीय निवृत्तीचे संकेत देणारे शरद पवार पुन्हा राज्यसभेच्या मैदानात उतरण्यामागे काय कारण आहे? काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी पुन्हा पक्षातून बाहेर पडणार का? आणि एकूणच महाविकास आघाडीच्या राज्यसभेच्या गणितांविषयी समजून घेऊया.

येत्या १६ मार्च रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी मतदान होणार असून सर्व उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्जही दाखल केलेत. मात्र, महाविकास आघाडीच्या वाट्याला या सात पैकी केवळ एकच जागा आलीये. त्यामुळेच निवडणूकीची तारीख जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये या एका जागेसाठी ओढाताण सुरु होती. काँग्रेसला आपले विरोधी पक्षनेतेपद टिकवण्यासाठी ही एक जागा हवी होती. तर, शरद पवार गटाला लागलेली उतरती कळा पाहता त्यांनाही ही जागा टिकवणे गरजेचे वाटत होते. शिवाय तिन्ही पक्षांपैकी उबाठा गटाचं संख्याबळ जास्त असल्याने त्यांनीही या जागेवर आपला नैसर्गिक दावा सांगितला होता.

एवढंच नाही तर, संजय राऊतांजवळ म्हणे, शरद पवार यांनी राज्यसभेवर जाण्याची ईच्छा व्यक्त केली होती. तर दुसरीकडे, 'मोठे नाव पुढे असल्यास आम्ही जागा घ्यायची नाही का?' असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला होता. खरंतर, उबाठा गटातर्फे प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा संधी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता संधी न मिळाल्याने त्यांचे दुसरीकडे कुठे राजकीय पुनर्वसन होते की, त्या वेगळा मार्ग निवडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. राज्यसभेवरून एकट्या उबाठा गटातच राज्यसभेसाठी दोन विरोधी भूमिका दिसल्या. त्यामुळे जागा एक आणि दावेदार अनेक अशी परिस्थिती मविआत निर्माण झाली होती. शिवाय यानिमित्तानं महाविकास आघाडीच्या एकजुटीचीही चांगलीच कसोटी लागली होती.

मात्र, शेवटी शरद पवार यांच्यासमोर काही अटी ठेवत उबाठा गट आणि काँग्रेसने त्यांना पाठींबा जाहीर केला. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात विलीन होणार नाही, अशी ही अट होती. अर्थातच, त्यांनी ती मान्य केली आणि राज्यसभा पदरात पाडून घेतली. मुळात, कधीकाळी तरूणांना राजकारणात सक्रिय होण्याचे आणि नेतृत्वाची धुरा सांभाळण्याचे आवाहन करणारे शरद पवार आता स्वत:च उतार वयात राज्यसभेच्या खुर्चीवर बसणार आहेत. थोडक्यात, शरद पवारांच्या वागण्या-बोलण्यातील हा विरोधाभास कधीच लपून राहिलेला नाही. आता राज्यसभा निवडणूकीच्या निमित्ताने त्याचं पुन्हा एकदा दर्शन घडलंय.

महायुतीमध्ये भाजपनेही चार नावांची घोषणा केली. यात विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह रामराव वडकुते आणि माया इवनाते या दोन नवीन चेहऱ्यांना संधी देऊन धक्कातंत्र अवलंबलं. तर, शिवसेनेचे अनेक मोठे चेहरे रांगेत असताना ज्योती वाघमारे या सर्वसामान्य महिलेला तिकीट देत महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर गिफ्टच दिलं. शिवाय एकनाथ शिंदे राज्यसभेच्या सात जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या रिंगणात एक अतिरिक्त उमेदवार उतरवणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, शरद पवारांना उमेदवारी निवडल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय महायुतीने घेतला.

दुसरी गोष्ट अशी की, महाविकास आघाडीपुढे सध्यातरी दुसरा कुठलाही पर्याय नाही. कारण, महाविकास आघाडीचे निर्मातेही शरद पवार होते आणि आता ती दीर्घकाळ टिकवण्यासाठीचे साधनही तेच आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवणे उबाठा गट आणि काँग्रेसला अपरिहार्यच होतं. राहिली गोष्ट महाविकास आघाडी टिकण्याची तर, नजीकच्या काळात आघाडीचं भवितव्य काय असेल, हे येणारा काळच सांगेल. मात्र, सध्यातरी उबाठा गट आणि काँग्रेसने जीवावर उदार होऊन शरद पवारांवर राज्यसभेची आणि पर्यायाने मविआची मदार सोपवली आहे, असे म्हणावे लागेल.



अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....