Pakistan Petrol Diesel Price Hike : पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेल ५५ रुपयांनी महाग; पेट्रोल ३३६ तर डिझेल ३२१ रुपये प्रति लिटर

    07-Mar-2026   
Total Views |
Pakistan Petrol Diesel Price Hike
 
इस्लामाबाद : (Pakistan Petrol Diesel Price Hike) पाकिस्तानमध्ये इंधन दरांमध्ये मोठी वाढ करण्यात आली असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या निर्णयानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रति लिटर तब्बल ५५ पाकिस्तानी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढीनंतर पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत ३३५.८६ रुपये प्रति लिटर झाली आहे, तर डिझेलचा दर ३२१.१७ रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ आणि मध्यपूर्वेतील वाढलेला तणाव यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे पाकिस्तान सरकारने स्पष्ट केले आहे.
 
पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी
दरवाढीची घोषणा होताच पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. लाहोर, कराची आणि इतर शहरांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या. दरवाढीची बातमी समजताच अनेकांनी आपली वाहने घेऊन पंपांकडे धाव घेतली. भविष्यात इंधनाची टंचाई निर्माण होऊ शकते या भीतीमुळे अनेकजण तासन्‌तास प्रतीक्षा करत असल्याचे चित्र दिसून आले.
 
साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
इंधन टंचाईच्या अफवा आणि साठेबाजीच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने कडक इशारा दिला आहे. पेट्रोलचा साठा लपवून ठेवणाऱ्या किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.पेट्रोलियम मंत्रालयाने देशात सध्या इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून इंधन साठवण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे.
 
मध्यपूर्वेतील तणावामुळे दरवाढ
सरकारच्या मते, मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर होत आहे. या परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढत असून इंधन आयातीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले जात आहे.
 
भारतातही एलपीजी सिलेंडर महाग
दरम्यान, भारतातही घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ७ मार्चपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये १४.२ किलोचा एलपीजी सिलेंडर आता ९१३ रुपयांना मिळत आहे. तसेच १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीतही ११५ रुपयांची वाढ करण्यात आली असून तो आता १८८३ रुपयांना मिळणार आहे.
 
गॅस उत्पादन वाढवण्याचे आदेश
मध्यपूर्वेतील तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारत सरकारने एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. देशातील सर्व तेल रिफायनरी कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या अंतर्गत प्रोपेन आणि ब्यूटेन या वायूंचा वापर प्रामुख्याने स्वयंपाकाच्या गॅस निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. तसेच सर्व कंपन्यांना हा वायू सरकारी तेल कंपन्यांना पुरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. अलीकडील घडामोडींमुळे कच्च्या तेलाचा दर ९० डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे अनेक देशांवर इंधन दर वाढवण्याचा दबाव वाढत आहे.
 
भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा
दरम्यान, भारतासाठी काहीसा दिलासा देणारी बातमीही समोर आली आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने भारतीय रिफायनरी कंपन्यांना रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची विशेष परवानगी दिली आहे. हा परवाना ३ एप्रिलपर्यंत वैध राहणार आहे.
 
या निर्णयामुळे भारताला तुलनेने स्वस्त दरात कच्चे तेल उपलब्ध होण्याची शक्यता असून देशातील इंधन दर स्थिर ठेवण्यास मदत होऊ शकते.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.