North East Conference 2026 : दिल्लीमध्ये ‘नॉर्थ ईस्ट कॉन्फरन्स २०२६’; ईशान्य भारताच्या विकासावर मंथन

    07-Mar-2026   
Total Views |
North East Conference 2026
 
मुंबई : (North East Conference 2026) दिल्लीतील नॉर्थ ईस्ट संस्थेच्या वतीने कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे नॉर्थ ईस्ट कॉन्फरन्स नुकतीच यशस्वीरित्या संपन्न झाली. या परिषदेत प्रख्यात विचारवंत, धोरणतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले आणि ईशान्य भारताच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा केली. दिवसभर चाललेल्या या परिषदेत ईशान्य भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, पारंपरिक व्यवस्था, विकासाची वाटचाल, धोरणात्मक दृष्टीकोन, सामाजिक समरसता आणि भविष्यातील संधी या विषयांवर विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. सहभागी मान्यवरांनी ईशान्य भारताच्या ऐतिहासिक महत्त्वासोबतच अलीकडच्या काळात झालेल्या परिवर्तनशील विकासावरही अर्थपूर्ण चर्चा केली.(North East Conference 2026)
 
उद्घाटन सत्रात आसामशी संबंधित ख्यातनाम प्रशासक आणि भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे माजी सचिव मदन प्रसाद बेजबरुआ (निवृत्त आयएएस) यांनी ईशान्य भारताची वैशिष्ट्यपूर्ण संवेदनशीलता आणि देशाच्या इतर भागांशी त्याचा टप्प्याटप्प्याने वाढत गेलेला समन्वय व संपर्क यावर प्रकाश टाकला. भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अॅड. बिक्रम बनर्जी यांनी ईशान्य प्रदेशातील पारंपरिक आणि प्रथागत कायद्यांचे वैशिष्ट्य तसेच स्थानिक ओळख आणि सामाजिक संतुलन टिकवून ठेवण्यात त्यांचे महत्त्व अधोरेखित केले.(North East Conference 2026)
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-प्रचार प्रमुख नरेंद्र ठाकुर यांनी ईशान्य भारताच्या गौरवशाली सांस्कृतिक इतिहासावर प्रकाश टाकत त्याची सांस्कृतिक परंपरा महाभारत काळापासून आजपर्यंत कशी टिकून आहे हे स्पष्ट केले. तर नागालँड विश्वविद्यापिठाचे कुलाधिपती आणि आसाममधील प्रख्यात पत्रकार-विद्वान समुद्रगुप्त कश्यप यांनी ईशान्य भारतातील स्वातंत्र्यसैनिकांच्या महान योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या बलिदानांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला बळ दिल्याचे सांगितले.(North East Conference 2026)
 
इतर सत्रांमध्ये मेघालयच्या राष्ट्रीय महिला आयोग सदस्या डेलिना खोंगडुप यांनी मेघालयातील अशा व्यक्तिमत्त्वांबद्दल माहिती दिली ज्यांनी त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक समृद्धीला नवे आयाम दिले. मणिपूरमधील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते प्रेमानंद शर्मा यांनी भारताच्या क्रीडा क्षेत्रातील यशामध्ये ईशान्य भारताचे योगदान आणि तेथील खेळाडूंना मिळालेली जागतिक ओळख याविषयी सांगितले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. डॉ. ओइनाम भगत यांनी ईशान्य भारताच्या इतिहासाचे औपनिवेशिक काळात झालेले विकृतीकरण यावर चर्चा करत ते दुरुस्त करण्याची गरज व्यक्त केली. नॉर्थ ईस्ट सेंटर फॉर टेक्नोलॉजी एप्लिकेशन एंड रीच चे महासंचालक अरूण शर्मा यांनी प्रदेशातील अलीकडील विकास आणि प्रगतीबाबत सविस्तर माहिती देत पायाभूत सुविधांचा विस्तार, सुधारलेली संपर्क व्यवस्था आणि विविध धोरणात्मक उपक्रमांमुळे निर्माण झालेल्या नव्या संधींवर प्रकाश टाकला.(North East Conference 2026)
 
हेही वाचा : Vandaniya Shantakka : स्त्री ही समाजाला धारण करणारी सुदृढ शक्ती आहे, त्यामुळे ती नारायणी बनू शकते : वंदनीय शांताक्का 
 
समारोप सत्रात ज्येष्ठ पत्रकार आणि पद्मभूषण सन्मानित इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रचे अध्यक्ष राम बहादुर राय प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी ईशान्य भारताच्या आजच्या स्वरूपाला आकार देणाऱ्या ऐतिहासिक प्रक्रियांवर महत्त्वपूर्ण दृष्टिकोन मांडला आणि या प्रदेशाच्या विकासाकडे वाढत असलेल्या राष्ट्रीय लक्षाचा उल्लेख केला. मणिपुर यूनिवर्सिटी ऑफ कल्चरच्या कुलगुरू डॉ. पूनम गुनिंद्रा यांनी रस्ते, रेल्वे आणि हवाई संपर्काच्या विस्तारामुळे ईशान्य भारत देश आणि जगाशी अधिक सक्षमपणे जोडला जात असल्याचे सांगितले.(North East Conference 2026)
 
परिषदेचा समारोप राष्ट्रीय एकात्मता बळकट करणे, सांस्कृतिक अभिमान वाढवणे, धोरणात्मक संवाद पुढे नेणे आणि शाश्वत विकास उपक्रमांना अधिक बळ देण्याच्या सामूहिक संकल्पाने झाला. या चर्चेतून हे स्पष्ट झाले की ईशान्य भारत आज भारताच्या सांस्कृतिक वैभव, रणनीतिक महत्त्व आणि विकास प्रवासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून उदयास येत आहे.(North East Conference 2026)
 
परिषदेदरम्यान आयोजित विशेष सन्मान समारंभात ईशान्य भारतातील विविध राज्यांतील कला, शेती, शिक्षण, सांस्कृतिक जतन आणि सामाजिक सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले. “नॉर्थ ईस्ट इंडिया अचीवर्स २०२६” सन्मानांतर्गत अरुणाचल प्रदेशच्या ताना यामी यांना शाश्वत शेती आणि उपजीविकेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी, आसामच्या अनन्या तालुकदार यांना गुवाहाटीमध्ये वंचित घटकांमध्ये सत्रिया नृत्याचा प्रसार आणि प्रशिक्षणासाठी, मणिपूरच्या लैमपोकपाम लक्षपति सिंह यांना सादरीकरण कलांतील योगदानासाठी, मिजोरमच्या लालत्लांजाउवा यांना स्वदेशी मिजो सांस्कृतिक परंपरांच्या जतनासाठी, नागालँडच्या योसे चाया अंगामी यांना अंगामी नागा सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी तसेच त्रिपुराच्या धम्मपिया यांना शिक्षण आणि सामुदायिक विकासातील कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.(North East Conference 2026)
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक