ससून डॉक मासेमारी बंदर जागतिक दर्जाचे होणार...

फिनलँडमधील कंपन्यांसोबत मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचा सामंजस्य करार

Total Views |

Sassoon Dock
 
मुंबई : (Sassoon Dock) मुंबईस्थित ससून मासेमारी बंदर हे मोठ्या मासेमारी बंदरांपैकी एक आहे. ससून मासेमारी बंदराचा विकास हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनविण्यासाठी इंग्लंड देशाच्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे, असे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
 
हॉटेल ताज पॅलेस येथे फिनलंड देशातील हेल्वर, मिरासिस आणि रिव्हर रीसायकल कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फिनलंडचे कॉन्सिलेट जनरल एरिक अफ हॅलोस्ट्रॉम, सहाय्यक सजू नायर, इंग्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाचे राज्य सचिव जुका सोलोवारा,मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन रामास्वामी, मत्स्य व्यवसाय आयुक्त विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपाले व आदी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीखालील जुना ससून डॉक आणि महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या अंतर्गत नवीन डॉक, आज आपल्या मासेमारी समुदायासाठी एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून उभे आहे. सुमारे १,५६० नोंदणीकृत मोटार चालवलेल्या मासेमारी नौका आणि सरासरी वार्षिक ५० ते ६० हजार मेट्रिक टन मासेमारी उत्पादनासह, ससून डॉक महाराष्ट्र तसेच भारताच्या मासेमारी अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
 
गेल्या काही वर्षांत येथे नेट मेंडिंग शेड, वर्कशॉप, भूमिगत पाण्याची टाकी, पाणीपुरवठा पाईपलाईन, पंप हाऊस, संरक्षण भिंत, सार्वजनिक शौचालये आणि सुरक्षा रक्षक घराचे नूतनीकरण, कचराकुंड्यांची व्यवस्था करणे, जुन्या संरचना पाडणे, इलेक्ट्रिकल सबस्टेशनसाठी बांधकाम यांचा समावेश आहे. सध्या, बर्फ संयंत्र, घाटाच्या भिंतीचे मजबुतीकरण, मच्छिमारांसाठी विश्रांती कक्षांचे बांधकाम आणि आधुनिक लिलाव हॉलची कामे प्रगतीपथावर आहेत.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जागतिक मानकांनुसार ससून डॉकला आदर्श मासेमारी बंदर बनवण्याच्या दिशेने उचललेले पाऊल आहे. ससून गोदीला आधुनिक, कार्यक्षम, स्वच्छ आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत मासेमारी बंदरात रूपांतरित करण्याचे शासनाचे ध्येय आहे. या आधुनिकीकरण उपक्रमाचे उद्दिष्ट तंत्रज्ञानाचा विस्तार करणे, डिजिटायझेशनला प्रोत्साहन देणे, सुधारणा करणे आहे. प्लास्टिक कचरा पुनर्वापर, टाकून दिलेल्या मासेमारी जाळ्यांचे पुनर्वापर आणि क्षमता बांधणीद्वारे नेट दुरुस्ती प्रणाली मजबूत करण्यास मदत होईल. ससून डॉक मच्छीमार समुदायासाठी प्रगती, नावीन्य आणि समृद्धीचे प्रतीक बनविण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहनही मंत्री राणे यांनी केले.
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.