Devendra Fadnavis : कोणत्या बँकेतील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट

    07-Mar-2026   
Total Views |
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.
 
पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन
योजनेत अशीही तरतूद करण्यात आली आहे की, जे शेतकरी आपले कर्ज नियमितपणे वेळेवर फेडत आहेत, अशा प्रामाणिक कर्जदारांना ५०,००० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यामुळे शेतकऱ्यांमध्ये कर्ज वेळेवर फेडण्याची सवय निर्माण होईल आणि त्यांना आर्थिक आधारही मिळेल.
 
विदर्भसाठी मोठा विकास प्रकल्प
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात विदर्भासाठीही मोठ्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. विदर्भातील सर्वात मोठा गेमचेंजर प्रकल्प म्हणजे वैनगंगा-नळगंगा इरिगेशन प्रकल्प, जो आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प आहे. याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून अर्थसंकल्पात त्याची घोषणा झाली आहे. यामुळे विदर्भातील पाणीपुरवठा आणि शेतीसंबंधी परिस्थिती सुधारण्यास मोठा हातभार लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी
अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत होते, अशा पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल. तसेच, जे शेतकरी आपले कर्ज नियमितपणे आणि वेळेवर फेडत आहेत, त्यांना प्रोत्साहन म्हणून ५०,००० रुपयांचे अनुदान दिले जाईल.
 
विरोधकांच्या टीकेला उत्तर
सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक टीका करत आहेत. या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. काही लोकांचा वेगवेगळ्या गोष्टी पसरवायचा प्रयत्न शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. त्यामुळे त्याबाबत कोणाच्याही मनात संभ्रम नाही. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी म्हणतेय की, राष्ट्रीयकृत बँकांची होणार नाही, कुणी म्हणतेय की, जिल्हा बँकेची होणार नाही, कोणी म्हणतेय अमूक एका सोसायटीची होणार नाही, कोणी म्हणतेय त्याची होणार नाही. परंतु, आम्ही २ लाखांपर्यंत कोणतीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, अशा कोणीही दिलेले पीककर्ज हे आम्ही माफ करणार आहोत. माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही आमचा प्रयत्न हा आहे की, माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही. शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे, याकरिता, आमचे काम सुरू आहे.
 
पुढील कार्यवाही
कर्जमाफीसाठी तयार केलेली समिती यावर काम करत आहे. ३० जूनच्या आधी कर्जमाफी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, अर्थसंकल्पात घोषणा झाल्यामुळे पुढील प्रक्रिया लवकर सुरु होईल. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जुन्या कोणत्याही कर्जमाफीपेक्षा ही कर्जमाफी अधिक फायदेशीर ठरेल आणि शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल.
 
माध्यमांना विनंती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना विनंती केली की, नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण करू नये. केंद्र सरकार परिस्थिती हाताळत आहे आणि योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे. चुकीच्या बातम्यांमुळे भीती आणि संभ्रम निर्माण होणे देशाच्या आणि समाजाच्या हिताच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
ही योजना शेतकऱ्यांचे आर्थिक ओझे कमी करेल, प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देईल आणि विदर्भासह राज्याच्या ग्रामीण भागातील आर्थिक व सामाजिक विकासाला चालना देईल. शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी एक ऐतिहासिक पाऊल असून, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल आणि महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला मोठं बळ देईल.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.