भूमंडळी या एकच गाजले राजे अधिपती...प्रभो शिवछत्रपती

    06-Mar-2026
Total Views |

‘नेतृत्व’ ही एक सशक्त संकल्पना. समाजाचे आणि राष्ट्राचे भवितव्य घडविणार्‍या नेतृत्व पद्धतीवर अलीकडे विशेष अभ्यास होताना दिसतो. ‘नेतृत्व’ या संकल्पनेमध्ये वेगवेगळे पैलू सामावलेले आहेत, जे छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वात ठायी ठायी दिसून येतात. आज तिथीनुसार (फाल्गुन वद्य तृतीया) असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने, तरुण पिढीतील युवक-युवतींना मार्गदर्शनपर आणि प्रेरणादायी ठरतील, अशा शिवरायांच्या नेतृत्वगुणांचे ‘राजाभिषेका’च्या दृष्टिकोनातून केलेले हे विवेचन...

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हा भारतीय इतिहासातील मानबिंदू समजला जातो. त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याच्या कार्यात अनेक अभ्यासकांनी संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. अजूनही नवनवीन अभ्यासक ‘शिवचरित्रा’तील नवनवीन दुवे शोधून त्यावर संशोधन करीत आहेत. महाराजांच्या संपूर्ण आयुष्याचा पट विचारात घेणे, ही एक प्रदीर्घ साधना आहे. त्यामुळे ज्या घटनेमुळे शिवाजी महाराज ‘छत्रपती’ झाले, यासाठी ‘राजाभिषेक पोथी’चा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे. गागाभट्ट यांनी रचलेल्या ‘श्री शिवराजाभिषेक’ या संस्कृत पोथीचा अभ्यास करताना हे लक्षात येते की, हा राजाला केला जाणारा अभिषेक आहे, राज्याला नाही. त्यामुळे ‘राजाभिषेक’ आणि ‘राज्याभिषेक’ असे दोन्ही शब्द प्रचलित असले, तरी मूळ शब्द ‘राजाभिषेक’ असा असल्यामुळे, प्रस्तुत लेखात ‘राजाभिषेक’ असाच शब्दप्रयोग केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वश्रुत आहे, तो समाजासमोर ठेवण्यासाठी अनेक अभ्यासकांनी उपलब्ध ऐतिहासिक साधनांचा पुरेपूर वापर केला आणि शिवरायांचा जीवनपट नोंदवण्याचा प्रयत्न केला. या ऐतिहासिक पुराव्यांमध्ये काही त्रुटी-दोष असू शकतात, अशी शयताही अभ्यासकांनी गृहीत धरली आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या, पुस्तक रूपाने प्रकाशित साहित्याचाच वापर सदर अभ्यासासाठी केला आहे. राजाभिषेकाच्या घटनेचे परिशीलन करण्यापूर्वी शिवपूर्व काळातील परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. प्राचीन भारतातील शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक व आर्थिक संपन्नता, यामुळे विविध वंशाचे विदेशी लोक भारतात प्रवेश करते झाले. तत्कालीन सामाजिक व्यवस्थेनुसार चातुर्वर्ण्यात ते कुठे ना कुठे सामावले गेले असतील; पण इस्लामी-परंपरेचा भारतात प्रवेश झाला आणि भारतवर्षात उलथापालथ झाली.

इसवी सन १५२६च्या आसपास मुघल सम्राट बाबर याने साम्राज्य स्थापन केले. अकबराकडून साम्राज्याचा विस्तारही झाला. या साम्राज्याच्या विस्तारात भारतीय हिंदू प्रजेवर अत्याचार झाले. हिंदू धर्म संकटात आला. मुघलांनी आपल्या नावाची नाणी प्रचारात आणली. आपल्या नावाचा ‘खुलता’ मशिदीत वाचण्याचे बंधन घातले. प्रादेशिक राज्य नष्ट करून स्वतःचा सर्वत्र अंमल प्रस्थापित केला. औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याला आव्हान देणारे एकही स्वतंत्र राज्य हिंदुस्थानात नव्हते. शिवजन्माच्या वेळी विजापूर, गोवळकोंडा व अहमदनगर या तीनच शाही अस्तित्वात होत्या. ‘निजामशाही’साठी शहाजीराजांची धडपड चालू होती. या सर्वात मुघलांचे वर्चस्व निर्विवाद होते. मुघल सत्ता मदांध आणि असहिष्णू होती. तिच्यासमोर हिंदुस्थानातील प्रजा केविलवाण्या परिस्थितीत जगत होती. त्यामुळे या विपरीत संघर्षमय परिस्थितीचा अत्यंत धीरोदात्तपणे व आत्मविश्वासाने सामना करून धर्मसंस्थापनेसाठी स्वराज्य स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य शिवरायांनी केले आणि त्यामुळेच कृष्णाजी अनंत सभासद यांनी म्हटले आहे, "या पृथ्वीवर सर्वत्र बादशहा असताना एक मराठी राजा छत्रपती झाला, ही सामान्य गोष्ट झाली नाही.”

आनंद नाम संवत्सर, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके १५९६ म्हणजेच दि. ६ जून १६७४ रोजी झालेली राजाभिषेकाची घटना ही एक केवळ धार्मिक विधीशी संबंधित घटना नाही. सार्वभौम स्वराज्याला अधिकृत नेतृत्व उपलब्ध करून देणारी ती एक क्रांतिकारक घटना म्हणावी लागेल. अशा नेतृत्वाचे काही पैलू मानले जातात ते असे- मानव समूहाच्या दुःखाने अस्वस्थ झालेल्या मनाने त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी नव्या जीवन पद्धतीचा विचार रुजवावा, ती पद्धत स्वीकारणार्‍यांचे जीवन सुखी व आनंदी व्हावे, यासाठी स्वतःच्या चिंतनातून-प्रवचनांमधून, स्वतः निर्माण केलेल्या सुसूत्र संघटनेमधून जो कामाला लागतो, तो नेता.
दडपशाही व जुलमाने त्रस्त झालेल्या मराठी माणसाला स्वतःविषयी अभिमान वाटावा, त्यांना स्वतंत्रपणे मानाने जगता यावे, याची तीव्र तळमळ शिवरायांना लागली होती. त्यातूनच बालवयापासून त्यांनी उत्तमोत्तम माणसे हेरून समाजातल्या सर्व स्तरांतील सदस्यांना सोबत घेऊन संघटना निर्माण केली व बाह्य परिस्थितीशी प्रयत्नपूर्वक झुंज देत, समाजावर नियंत्रण मिळविले. पण, ते नियंत्रण जाचाचे नसून, त्यामध्ये प्रत्येकाला आपापल्या आचारानुसार वागण्याचे स्वातंत्र्यही होते.

नेत्यांच्या आवश्यक गुणांमध्ये संवेदनशीलता, आकलनशक्ती, स्मरणशक्ती, प्रतिभाशक्ती, द्रष्टेपणा, विवेक, निर्णयशक्ती, निर्भयता, आस्था, निष्ठा, धैर्य, साहस, न्यायप्रियता, नम्रता, कृतज्ञता इत्यादी विविध पैलू असणे, अपेक्षित असते. शिवरायांच्या संपूर्ण आयुष्यात हे पैलू विविध प्रसंगातून दिसतात व या सर्व पैलूंचा समुच्चय म्हणजे अंतिमतः स्वराज्य स्थापना आणि त्यानिमित्ताने शिवराय ‘छत्रपती’ होणे.

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्|
धर्मसंस्थापनार्थाय संभावामि युगे युगे॥

यामध्ये श्रीकृष्णांनी सांगितलेले धर्मसंस्थापनेचे सूत्र वास्तवात येण्यासाठी ‘शिवचरित्रा’तील राजाभिषेकाची घटना महत्त्वाची ठरते.
शेतकरी ज्याप्रमाणे गवत काढून टाकून धान्य देणार्‍या रोपांचे रक्षण करतो, त्याप्रमाणे राजाने विरोधकांचा उच्छेद करून राष्ट्राचे रक्षण करावे, हे ‘स्मृतिवचन’ शिवरायांनी तंतोतंत आचरणात आणले. बाह्य परिस्थितीचे अचूक आकलन करून त्यादृष्टीने प्रजाहितासाठी स्वराज्य स्थापनेचा शिवरायांचा विचार राजाभिषेकामागे दिसतो. भागवत धर्माच्या प्रसारामुळे मराठी प्रदेशात धर्म आचरण्यासाठी एकत्र येण्याची जी प्रथा सुरू झाली, त्यामुळेच तो धर्म परकीयांपासून राखण्यासाठी एकजुटीने तोंड देण्याची कल्पनाही त्यातून निघाली. एकत्र आलेल्या लोकांना चिरकाल एकजुटीने राहायचे असेल, तर त्यांच्यात परस्पर विश्वास निर्माण व्हावा, ज्यात सर्वांचे कल्याण असेल. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेतून हे केले. महाराष्ट्रातील जनतेला शिवरायांबद्दल नितांत आदर होता. असे असले तरी लहान-मोठे वतनदार, जहागीरदार हे शिवरायांना ‘राजा’ म्हणायला तयार होतेच, असे नाही.

प्रजेच्या मनातील शंका दूर करून प्रजेला एकछत्री साम्राज्य देणे आवश्यक आहे, हे शिवरायांनी अचूक ओळखले होते. महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय एकात्मतेसाठी ‘छत्र सिंहासना’ची अधिकृत स्थापना ही आवश्यक बाब आहे, हे शिवरायांनी हेरले व त्यातूनच राजाभिषेकाची कल्पना पुढे आली असावी. परंतु, शिवरायांचा राजाभिषेक ही केवळ एक लहानशी धार्मिक घटना नाही, त्याला राजकीय व सामाजिक संदर्भही आहेत, हेही विचारात घेणे आवश्यक आहे. कोणतेही साम्राज्य सार्वभौम होण्यासाठी गरज असते छत्र, चलन व शकाच्या प्रारंभीची. या तिन्ही गोष्टींवर राजांनी बराच काळ आधीपासून नक्कीच विचार केला असणार व नंतर योग्य संधी पाहून तो प्रत्यक्षात उतरविला असणार, राजाभिषेकाच्या अधिकृत माध्यमातून.
राजाभिषेक विधीसाठी काशीचे विद्वान पंडित विश्वेश्वर ऊर्फ गागाभट्ट यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. यामध्येही काही प्रवाह आढळतात. शिवरायांची कीर्ती ऐकून स्वतः गागाभट्ट त्यांना भेटायला आले व त्यांनी महाराजांना राजाभिषेकाबद्दल सुचवले.

राजाभिषेक करण्याचे निश्चित झाल्यावर महाराजांनी ‘धर्मशास्त्र’ पारंगत गागाभट्टांना अत्यादराने काशी येथून पाचारण केले. राजाभिषेक विधीचे विविध पर्याय धर्मशास्त्रीय ग्रंथातून सांगितलेले आहेत. परंतु, गागाभट्टांनी शिवरायांच्या कौटुंबिक, धार्मिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करून मगच राजाभिषेक विशेष विधी तयार केला, याबाबत अभ्यासकांत एकमत आहे. वस्तुतः स्वतः विद्वान पंडित असल्याने गागाभट्टांनी विविध धर्मशास्त्रीय ग्रंथांचा साकल्याने अभ्यास करून शिवरायांचे मौजीबंधन, विवाह, प्रायश्चितरूप ‘तुलापुरुषदान’ व नंतर प्रत्यक्ष राजाभिषेक अशी योजना केलेली दिसते. यासाठी त्यांना याविषयीचा अभ्यास करण्यास पुरेसा अवधी लागला असेल, हे गृहीत धरावे लागेल. त्यामुळे राजाभिषेकाची कल्पना मांडली जाणे व ती प्रत्यक्षात येणे, यामध्ये निश्चितच एक मोठा कालखंड गेला असल्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे अभ्यासक म्हणून नोंदवावेसे वाटते.
गागाभट्ट यांनी तयार केलेल्या योजनेनुसार, भोसल्यांचे कुलपुरोहित प्रभाकरभट्ट बाळंभट्ट आर्वीकर यांनी राजाभिषेकाचे पौरोहित्य केल्याची नोंद आढळते.

शिवरायांनी राजधानीसाठी ‘रायरी’ म्हणजे रायगडाची निवड केली, हे वैशिष्ट्यपूर्णच आहे. भौगोलिक प्रदेशाची बारकाईने माहिती, संरक्षण विचार, गडाची अभेद्यता या सर्व बाबींचा शिवरायांनी पूर्णतः अभ्यास करून मगच रायगडाची निवड राजधानीसाठी केली. सातारा व पुण्याच्या सीमेवरच्या सह्याद्रीच्या दुर्गम प्रदेशातील हा भाग, या प्रदेशातील सर्वात उंच टापू. या जोडीने राजाभिषेकादरम्यान कोणतेही संकट स्वराज्यावर येऊ नये, याची काळजीही शिवरायांनी घेतलेली दिसते. "कोकणात दिलेरखान उतरणार होता; परंतु शिवाजीने ठिकठिकाणी डोंगरातील वाटा मोडून अवघड ठिकाणी कडक पहारे ठेवल्यामुळे तो परत फिरला,” असा उल्लेख नारायण शेणवी यांच्या पत्रात मिळतो. सावधपणाने व सजगतेने भविष्यकालीन संकटे ओळखून त्यावर मात करण्याची शिवरायांची योजना यातून दिसते.

मराठ्यांचे राज्य हे शास्त्र-नियम, नीती-संस्कृती संपन्न व घटनाबद्ध शासनसंस्था असेल, याची सर्वतोपरी योजना शिवरायांनी राजाभिषेकाच्या निमित्ताने केली. आपल्या सार्वभौमत्वाची चिन्हे म्हणून छत्रधारण, नाणी चालू करणे या महत्त्वाच्या गोष्टी शिवरायांनी केल्या.

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता|
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥

अशी स्वतःची मुद्रा ‘संस्कृत’ भाषेत तयार केली. मुघलांच्या वर्चस्वामुळे ‘उर्दू’ व ‘फारसी’चा सर्वत्र प्रसार असताना परंपरागत ‘संस्कृत’ भाषेत आपली मुद्रा तयार करणे, असे अभिमानास्पद कार्य करून शिवरायांनी आपली पारंपरिक अस्मिता जपली आहे. राज्यविषयक नंतरच्या सर्व कागदपत्रांमध्ये ‘स्वस्तिश्री’ने पत्रांची सुरुवात महाराजांनी केली आहे व स्वतःचे नाव ‘श्री राजा शिवछत्रपती’ असे वापरले आहे. राजाभिषेकाच्या निमित्ताने शिवरायांनी स्वतःची नाणी वापरात आणली, त्यांना ‘शिवराई’ म्हटले जाते. तांब्याच्या या नाण्याच्या एका बाजूला ‘श्री राजा शिव’ असा मजकूर असून, दुसर्‍या बाजूला ‘छत्रपती’ असा मजकूर आहे. ‘देवनागरी’ लिपीतील या नाण्यांच्या मजकुरातून महाराजांचे महाराष्ट्र भाषेचे प्रेम, स्वराज्याचे सार्वभौमत्व दिसून येते. महाराजांनी आपल्या राजाभिषेकाबरोबर सुरू केलेला व हिंदवी स्वराज्याची धर्मप्रतिष्ठा कायम करणारा ‘राजाभिषेक शक’. या ‘शका’चे वैशिष्ट्य आहे की, त्याला महाराजांनी स्वतःचे नाव दिले नसून, राजाभिषेकाच्या प्रसंगाचे उचित असे नाव दिले आहे. स्वराज्यासाठी अपरंपार तळमळीने कार्यरत राजांनी यामध्ये स्वतःकडे मोठेपणा घेतलेला नाही.

नेत्याच्या अंगभूत असे विनयशीलता व नम्रता असे महाराजांचे पैलू यातून दिसतात. राजाभिषेकापूर्वी प्रतापराव गुजर यांचे निधन झाले. राजांच्या पत्नी काशीबाई देवाघरी गेल्या. परंतु, या दोन्ही दुःखी घटनांचा धीराने सामना करून वैयक्तिक दुःखाला बाजूला ठेवून, शिवरायांनी राजाभिषेकाची सिद्धता केली. प्रजाहितार्थ घडणार्‍या महत्त्वपूर्ण प्रसंगात राजांनी वैयक्तिक दुःखाला महत्त्व न देता, स्वराज्याच्या कार्याला अधिक महत्त्व दिले. यातून त्यांची धर्मसंस्थापनेची तळमळ व प्रजेवरील प्रेम दिसून येते. यानिमित्ताने हिंदू धर्मामध्ये महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या ‘भगव्या झेंड्या’ला त्यांनी ‘राजचिन्ह’ म्हणून स्थान दिले. मुस्लीम अमदानीत ‘फारसी’ व ‘उर्दू’चा वापर व्यवहारात सर्वत्र होत असे. महाराजांच्या विशेष सूचनेनुसार रघुनाथ पंत हणमंते यांनी कर्नाटकातील धोंडीराज लक्ष्मण व्यास यांच्याकडून ‘राज्य-व्यवहारकोश’ तयार करून घेतला. त्याद्वारे ‘संस्कृत’ परिभाषा प्रचारात आणली. मराठी-मनाची आद्यभाषा म्हणून ‘संस्कृत’चा आग्रहाने वापर केला गेला. शिवरायांची भारतीय परंपरागत अस्मिताच यातून दिसते. स्वराज्यातील प्रजेच्या जवळ जाण्याचा हा एक मार्ग होता. याद्वारे प्रजेला स्वराज्य हे आपले वाटावे, असा शुद्ध हेतू प्रकट होतो. शिवरायांना स्वतःसाठी राज्य नको होते, तर ते सर्वसामान्य जनतेच्या सुखासाठीच हवे होते.

शिवरायांनी स्वराज्याच्या व्यवस्थापनासाठी ‘अष्टप्रधान’ मंडळ नेमले. चांगली परंपरा असलेले, शास्त्र जाणणारे ध्येयवादी, कुलवंत, चांगले पारखून घेतलेले असे आठ सदस्य नेमून त्यांच्या पदांची नावे ही महाराजांनी संस्कृत अशी ठेवली. मुसलमानी साम्राज्य प्रभावाच्या शिखरावर असताना छत्रपती शिवरायांनी राजाभिषेक करून स्वतःला ‘छत्रपती’ करून घेतले, ते भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठीच! वैयक्तिक सत्तेची लालसा त्यांच्या मनात नव्हती. बालवयापासून स्वतःच्या आई-वडिलांच्या सहवासात त्यांनी मुघल सत्ताधीशांकडून झालेला रयतेचा जो छळ पाहिला होता, त्याची सकारात्मक भरपाई त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेतून केली व त्यामुळे शतके लोटली, तर या प्रजापालक नेतृत्वाला ‘महाराष्ट्र-मन’ विसरू शकणार नाही, हा शिवाजीराजांचा माणूस म्हणून विशेष पैलू मानावा लागेल.

आधुनिक व भावी काळात समाजात उत्कृष्ट नेतृत्व घडणे, ही काळाची गरज आहे. भौतिक सुविधांची रेलचेल घेऊन अनेक परकीय साम्राज्य भारतात रुजू पाहत आहेत. ‘शिवचरित्रा’तून प्रेरणा घेऊन हे आक्रमण थांबवण्याची गरज आज देशात निर्माण झाली आहे. समर्थांच्या स्वप्नातील ‘आनंदवन’ भारतात पुन्हा साकारण्यासाठी शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास करून तो आदर्श जगण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे नमूद करावेसे वाटते.

- प्रा. डॉ. आर्या जोशी