मुंबई : (Purvesh Duragkar) भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानाचा गुरुवारी ५ मार्चला आसाममध्ये अपघात झाला. या अपघातात स्क्वाड्रन लेफ्टनंट अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. पूर्वेश दुरगकर हे मूळचे महाराष्ट्रातील नागपूरचे होते. गेल्यावर्षी भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. दहा दिवसांपूर्वीच पूर्वेश कुटुंबीयांना भेटण्यासाठी नागपूरला आले होते, त्यांनंतर ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते. त्यांच्या मृत्यू पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे. (Purvesh Duragkar)
ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभाग
फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांनी पाकिस्तानविरुद्ध राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभाग घेतला होता. महत्वाचे म्हणजे पूर्वेश या ऑपरेशनचा हिस्सा होता याची कल्पना कुटुंबीयांना देखील नव्हती. १५ दिवसांनी ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर कुटुंबीयांना तो याचा हिस्सा असल्याची माहिती देण्यात आली. "ऑपरेशन सिंदूरदरम्यान त्याच्याकडे फोन नव्हता, त्यामुळे संपर्क करता आला नाही. १५ दिवसांनी आम्हाला हे सांगण्यात आले", असे पूर्वेशच्या कुटुंबीयांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.(Purvesh Duragkar)
सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानाचा अपघात
स्क्वाड्रन लेफ्टनंट अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानाचा सराव करत असताना विमान बेपत्ता झाले. जोरहाट विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर विमानाचा रडारशी संपर्क तुटला. विमानतळापासून ६० किलोमीटरच्या अंतरावर विमानाचा अपघात झाला व त्यात दोघांचाही मृत्यू झाला. उड्डाणानंतर ७ वाजून ४२ मिनिटांनी त्याचा संपर्क तुटला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.(Purvesh Duragkar)
वडिलांची भावनिक साद
पूर्वेश यांच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "पूर्वेश भारतीय हवाई दलाचा भाग होता, याचा त्याला खूप अभिमान होता. लढाऊ विमान उडवणे त्याला खूप अभिमानाचे वाटायचे. आसाममधील तेजपूरमध्ये त्याचे मूळ पोस्टींग होते पण तिथं धावपट्टीचे काम सुरु असल्याने तो जोरहाट येथून काम करत होता. देशासाठी त्याने सर्वोच्च बलिदान दिले आहे, युवकांनी त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी."(Purvesh Duragkar)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\