'नेत्रदीप प्रतिष्ठान'तर्फे २०० दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण

    06-Mar-2026
Total Views |
Netradeep Pratishthan
 
मुंबई : (Netradeep Pratishthan) दृष्टीबाधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्यासाठी 'नेत्रदीप प्रतिष्ठान' या संस्थेमार्फत दादर येथील मराठी ग्रंथसंग्रहालय इमारतीतील शारदा सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची सुरुवात आरोही आणि ज्योती माने यांनी सादर केलेल्या सुमधुर स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या २०० दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५,००० रुपये याप्रमाणे एकूण १० लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यामध्ये अकरावीपासून ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
 
पारदर्शक निवड प्रक्रिया आणि अमूल्य योगदान
 
या शिष्यवृत्तीसाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यात आले होते. हे सर्व ४५० अर्ज किरण चौरे सर आणि चंदाताई यांच्या निवासाच्या पत्त्यावर स्वीकारण्यात आले. या अर्जांतून अत्यंत पारदर्शक पद्धतीने २०० गरजू विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत किरण चौरे आणि चंदाताई यांचे अमूल्य योगदान लाभले, त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच ही प्रक्रिया यशस्वी पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकली.
 
मान्यवरांचे मार्गदर्शन: "मिळालेल्या संधीचे सोने करा"
 
या सोहळ्याला उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे अवधूत वाघ यांनी स्वतःच्या संघर्षाचे आणि शिष्यवृत्तीच्या मदतीने पूर्ण केलेल्या शिक्षणाचे अनुभव सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. मान्यवरांनी आपल्या भाषणात नमूद केले की, "दृष्टी नसली तरी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही कोणतेही शिखर सर करू शकता. मिळालेल्या या संधीचे सोने करा आणि भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहून, आपल्यासारख्याच इतर गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा वसा घ्या."
 
लेखनिकांचा विशेष सत्कार
 
नेत्रदीप प्रतिष्ठानच्या वतीने विविध किंवा महाविद्यालयीन परीक्षांसाठी रायटर पुरवले जातात त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे काल सत्कार करण्यात आले ज्यांनी स्वतःची महत्त्वाची कामे सोडून लोकांना लेखनिक म्हणून मदत केली त्या व्यक्तींची नावे खालील प्रमाणे अशा तीन लेखकांचे काल सत्कार करण्यात आले ज्यामध्ये प्रणव चौधरी, कुणाल चौधरी व पूजा गोयल यांची नावे प्रामुख्याने घेता येतील त्यातील कुणाल चौधरी यांनी स्वतःच्या दहावीच्या क्लासेस सोडून एका विद्यार्थ्याचे पेपर लिहून त्या व्यक्तीला आपल्या जीवनात यश संपादन करण्यासाठी सहकार्य केले.
 
एक भावूक क्षण: माता-पित्यांच्या हस्ते सत्कार
 
कार्यक्रमात अत्यंत हृदयस्पर्शी क्षण तेव्हा आला जेव्हा प्रमुख पाहुणे अवधूत वाघ यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन माने यांचा सत्कार त्यांचे माता-पिता (जे या सोहळ्याला विशेष उपस्थित होते) यांच्या हस्ते करविला. आपल्या मुलाचे हे समाजकार्य पाहून उपस्थित सर्वच भावूक झाले होते.
 
मैत्रीचा भक्कम आधार
 
सचिन भाऊंच्या संघर्षाच्या काळात, विशेषतः त्यांची दृष्टी गेल्यानंतरही जे मित्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, असे त्यांचे बालपणीचे मित्र अभिजीत झोल, योगेश आणि इतर सर्व मित्रही या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. संकटात साथ देणाऱ्या या मित्रांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
 
उपस्थित मान्यवर
 
अवधूत वाघ: प्रवक्ते, भारतीय जनता पक्ष.
 
अमृत कलश: शाखा प्रबंधक, भारतीय स्टेट बँक (दादर मिलेनियम शाखा)
 
डॉ. जया गाडे: डेप्युटी डायरेक्टर, एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई
 
कविता शहाणबाग: चाईल्ड रेज ट्रस्ट
 
स्मिता चंदावर: माजी अधिकारी (SBI) व कार्यकर्त्या, चाईल्ड रेज ट्रस्ट
 
यतीन पी. शेठ: सीईओ, ॲक्युम केमिकल्स प्रा. लि
 
केतन देसनी: असोसिएट डायरेक्टर, कॉग्निझंट
 
महावीर गवारे: एच.ओ.डी., बिझनेस लाइफ स्किल
 
सी.ए. फाटक: माजी मानद अध्यक्ष व कोषाध्यक्ष, एन.एफ.बी.एम
 
संस्थेची भूमिका आणि नियोजन
 
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे सचिव रामदास निकम यांनी संस्थेच्या परिचयाने केली. अध्यक्ष सचिन माने यांनी आगामी ध्येयधोरणांची माहिती दिली. विशेष सहकार्य: सतप्पा पाटील, विलास काटकर, तेजल आणि रविकिरण यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली. सत्कार समारंभ: पाहुण्यांचा सत्कार विजय, प्रज्ञाकर, रोशन, विनोद काळे आणि संदीप माने यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन: उपाध्यक्ष निखिल देशमुख आणि कार्यकारिणी सदस्य निशांत शहा यांनी केले. नियोजन: सहसचिव सागर कुंभार यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
 
 
 
- सचिन माने (अध्यक्ष,नेत्रदीप प्रतिष्ठान, मुंबई)