तुका झालासे कळस...

    05-Mar-2026
Total Views |

अभंगाच्या माध्यमातून कधीही भंग न पावणारा ज्ञानभक्तीचा संदेश देणारे संत तुकाराम हे महाराष्ट्रातील संतपरंपरेचे कळस म्हटले जातात. त्यांचे अभंग काळाच्या कसोटीवरही टिकून राहिले, त्यामुळेच सांप्रतकाळातही जनमानसाला ते मार्गदर्शक ठरतात. आज तुकाराम बीज निमित्ताने तुकोबांच्या जीवनचरित्राचा त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून घेतलेला आढावा...

ज्ञानदेवे रचिला पाया| उभारिले देवालया|
नामा तयाचा किंकर| त्याने केला हा विस्तार|
जनार्दन एकनाथ| खांब दिला भागवत|
तुका झालासे कळस| भजन करा सावकाश

या भागवतधर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य लाभलेले महाराष्ट्रातील महान संत म्हणजे, संत तुकाराम महाराज. ज्ञानदेव आणि तुकाराम महाराज वारकरी संप्रदायातील आदि-अंतीचे श्रेष्ठ संत. ‌’ग्यानबा तुकाराम‌’ हा भक्तिभावाने केला जाणारा नामघोष प्रसिद्ध आहेच. ‌‘ग्यानबा तुकाराम‌’ हा आचार्य विनोबांनी म्हटल्याप्रमाणे ‌‘मध्यमपदलोपी समास‌’ही आहे. त्यात महाराष्ट्रातील सर्व संतांचा समावेश होता. संत तुकारामांच्या जन्मशक 1520 (इ. स. 1598) हे बहुमान्य असून, तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील इतर महत्त्वाच्या घटनांशी योग्य मेळ राखणारे आहे. संतांनी विचारल्यावर तुकोबांनी मोठ्या संकोचानेच व संक्षेपाने आपले चरित्र सांगितले.

भगवद्भक्तीची निर्मळ परंपरा असलेल्या एका शुचिष्मंत अंबिले घराण्यात तुकोबांचा जन्म झाला. त्यांच्या पूव आठ पिढ्या विठ्ठल उपासना त्यांच्या घराण्यात परंपरेने चालत आली होती. तुकोबांचे पूर्वज विश्वंभरबुवा मोठेच विठ्ठलभक्त. त्यांनी देहूला विठ्ठल मंदिरही बांधले होते. तुकोबांचे वडील बोल्होबा आणि माता कनकाई हे दोघेही सात्त्विक व धार्मिक वृत्तींचे. बोल्होबांकडे गावाची महाजनकी होतीच, ते सावकारीही करत. घरात आर्थिक सुबत्तेबरोबरच, विविध धार्मिक आचारही होते. तुकाराम स्वतःच सांगतात,

पंढरीची वारी, आहे माझे घरी
आणिक न करी, तीर्थव्रता
अजून एका अभंगात ते म्हणतात,
माझ्या वडिलाची मिरासी गा देवा
तुझी चरणसेवा पांडुरंगा


अशा या संस्कारसंपन्न घरात ‌‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी‌’ या न्यायाने तुकारामांचा जन्म झाला. घराण्यातील संस्कारशील वातावरणातच त्यांची जडणघडण झाली. तुकोबांचे ज्येष्ठ बंधू सावजी विरक्त वृत्तीचे असल्याने, लहानपणापासूनच घरादाराची बरीचशी जबाबदारी तुकारामांवर आली. वडिलांच्या मृत्यूनंतर तर सर्व कारभारच त्यांना सांभाळावा लागला. एकंदरीत पाहिले, तर त्या काळात तुकाराम महाराज चार-चौघांसारखेच प्रापंचिक होते. पण, एका दुष्काळामुळे सर्वच चित्र बदलले. दुःखाचे तीव्र तडाखे त्यांच्या कुटुंबावर एकापाठोपाठ एक कोसळले.

शके 1550च्या सुमारास महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाने मानवी जीवन उद्ध्वस्त केले. या दुष्काळाने त्यांच्या संसारावरच घाला घातला. त्यांच्या पहिल्या पत्नीचे आणि थोरला पुत्र संतोबा यांचे दुष्काळामुळे निधन झाले. त्यामुळे तुकाराम महाराज अंतर्बाह्य हादरले. घरी झालेले मृत्यू आणि थोरल्या बंधूचा गृहत्याग, यामुळे त्यांचे प्रपंचावरील मनच उडाले. त्यांनाही विरक्ती आली आणि प्रपंच व व्यवसाय या दोन्हींकडे त्यांनी पाठ फिरवली.

शरीर संपत्ती मृगजळ भान|
जाईल नासोन खरे नव्हें|


हा अनुभव त्यांनी आपल्या कुटुंबातच घेतला. दुष्क़ाळामध्ये व्यापार बसल्याने द्रव्य संपले, समाजात असलेला मानही नाहीसा झाला. त्यांना विषण्णास्थेत लोकांना तोंड दाखवण्याची लाज वाटू लागली. घराण्यातील सावकारी, महाजनकीबाबत त्यांच्या मनामध्ये इतकी उदासीन वृत्ती निर्माण झाली की ते म्हणतात,

बरे झाले देवा निघाले दिवाळे|
बरी या दुष्काळे पीडा केली|


पुढे भोगांचा त्याग करून, तुकाराम महाराजांनी उपासनेला प्रारंभ केला. त्यांनी दृढ निश्चयाने अभ्यासाला सुरुवात केली आणि अभ्यास श्रद्धेने केला.

विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म|
भेदाभेद भ्रम अमंगळ॥
पुण्य परउपकार पाप ते परपिडा|
आणिक नाही दुजा यासी|


अशी अनेक वचनें त्यांच्या अभ्यासाची स्पष्ट कल्पना देणारी आहेत. मात्र, परमार्थाच्या वाटचालीत गुरूशिवाय प्रगती नाही. आपल्या अभंगांतच त्यांनी गुरूभेटीचा व गुरूपदेशाचा निर्वाळा दिला आहे. ते सांगतात,

मनियेला स्वप्नी गुरूचा उपदेश|
धरिला विश्वास दृढ नामी॥
मंत्र दिला रामकृष्णहरी॥


माघ वद्य दशमी दिनी, गुरुवारी शके 1561ला त्यांना गुरूकृपा झाली. बाबाजी चैतन्य यांकडून त्यांना ‌‘रामकृष्णहरी‌’ हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र लाभला. तुकारामांची अभंगवाणी हा त्यांनी लोकशिक्षकाच्या भूमिकेतून केलेला उपदेश आहे. अधम लोकांनाही त्यांनी ‌‘हीन जंतू‌’ संबोधले असून, संपत्तीची लालसा धरणारे लक्ष्मीची सकाम भक्तीच करतात, म्हणून त्यांच्यासाठी ‌‘जळो ऐसियांचे तोंड, अज्ञानाचे बंड वाढविती|‌’ असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या काळात समाजाची सर्वार्थाने दैन्यावस्था झाली होती. तेव्हा समाजाचे उत्थापन करण्यासाठी तुकोबांनी अभंगांद्वारेच जागृतीचा मार्ग स्वीकारला. नरदेह, प्रपंच नाशवंत असून, केवळ भक्तीच शाश्वत आहे. शाश्वत असतो तोच परमेश्वर ही जाणीव उपासकांच्या अंतःकरणात कायम राहावी, म्हणून तुकारामांनी म्हटले की,

आता तरी पुढे हाची उपदेश|
नका करू नाश आयुष्याचा॥

नरदेह हा माणसाला प्रपंचाच्या मायेत गुंतवतो आणि मग परमात्म्याची वाटचाल अशक्य होते, हा उपदेशही त्यांनी अभंगातून केला. मोक्षप्राप्तीसाठी माणसाला मनावर विजय मिळवणे आवश्यक असल्याचेही महाराज सांगतात. ते म्हणतात,

मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण|
मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते॥

आयुष्याची प्रगती किंवा अधोगती ही मनाच्या स्थितीवर अवलंबून असते; म्हणून सर्वप्रथम मनाला ईश्वरसन्मुख करण्याचा उपदेश ते करतात. यासाठी सत्संगतीची आवश्यकता असून, संतवचनांच्या वाचनाने आपोआपच सर्व विकार गळून पडत असल्याचेही ते सांगतात. आपल्या हितासाठी लोकमतापेक्षा, मनाला साक्षी ठेवून परमार्थाची कुस धरणे भाग्याचे असते.

तुकारामांची वाणी विठ्ठलाशी एकरूप झाली होती. आपण अंतर्बाह्य निर्मळता प्राप्त झालेले संन्यासी असल्याचे, त्यांनी अगदी सहजपणे आपल्या वर्तनातून जगाला दाखवून दिले. ते म्हणतात,

आतां माझा सर्वभावें हा निर्धार
न करी विचार आणिकांसी

त्यांना चराचरांत विठ्ठलाचीच प्रचिती येत होती; अभ्यासाने, एकविध भक्तीने, वैराग्याने, श्रद्धेने परमार्थाची वाटचाल करून तुकाराम महाराज हे आभाळाएवढे मोठे झाले. त्यांची अवघी भक्ती ही ज्ञानोत्तर आहे. पौर्णिमेचा चंद्र ज्याप्रमाणे चकोराला आपले जीवन वाटते, त्याच आतुरतेने तुकोबा विठ्ठलाची वाट पाहतात. भक्तीच्या खुणांमध्ये पांडुरंग ही आई आणि भक्त म्हणजे बालक हा भाव सर्वाधिक महत्त्वाचा आहे. त्यांनी आपले आणि विठ्ठलाचे हे अनुपमेय नाते, त्यांच्या अभंगांत फारच सुंदर रितीने मांडले आहे. तुकोबा म्हणतात,

चुकलीया माये, बाळ हुरुहूरु पाहे

हा आर्त भक्तीचा अतिशय सुंदर एक दाखला आपल्याला सांगता येईल. पांडुरंगाच्या चरणी त्यांचे मन इतके एकरूप झाले होते की, त्याच्याशिवाय दुसरं काहीही ते जाणत नव्हते.

पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी
जागृती स्वप्नी पांडुरंग


त्यांच्या ध्यानी, मनी, स्वप्नी, जागृतीत अवघा पांडुरंगच भरला होता. तुकाराम महाराजांनी ज्ञानोत्तर भक्तीने परब्रह्माचीही अनुभूती घेतली. हा त्यांचा अनुभव ते ‌‘अणुरणीयां थोकडा| तुका आकाशा एवढा|‌’ असा मांडतात. तुकोबांचा एक अभंग वारकऱ्यांसाठी, ब्रह्मवाक्याइतका पवित्र आहे. तो म्हणजे,

सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी|
कर कटावरी ठेवोनिया॥


सुखाचा मूर्तिमंत पुतळा असणाऱ्या या विठ्ठलाचे हे अनुपमेय रूप म्हणजेच त्यांचे सर्वसुख आहे आणि याच मुखाकडे आपण मोठ्या प्रेमाने बघत राहो, अशीच त्यांनी प्रतिज्ञा केली आहे. विठ्ठलाचे वर्णन करताना तुकोबांनी अनंत नावांनी त्यांना साद घातली आहे. ‌‘सगुण निर्गुण तूज म्हणे वेद|‌’ अशा अनेक नामाभिधानांनी त्यांनी विठ्ठलाचे वर्णन केले आहे. तुकोबांच्या रचनांमध्ये असणारं वैविध्य म्हणजे कृष्णाच्या बाल क्रीडापर अभंग, विराण्या, गवळणीतील अंतरीचा भाव अत्यंत विशुद्ध भक्तीचा असल्याचे दिसते. त्यांनी लिहिलेली रूपके ही अत्यंत आशयगर्भ अशीच. त्यांनी टिपरी, विटीदांडू, हुंबरी, हमामा, फुगड्या, लखोटा, पाळणा, आशीर्वाद, लळित अनेक रूपके रचली आहेत. त्यांची ही रूपके अध्यात्माशी जोडलेली आहेत. विठ्ठलभक्त तुकाराम, रामभक्तीचे सामर्थ्यही प्रत्ययाला आणून देतात. ‌‘रामकृष्णहरी‌’ या वारकरी संप्रदायाच्या मंत्रातच राम आहेच, साहजिकच विठ्ठलाइतकीच रामभक्तीची महतीही तुकारामांच्या अभंगात दिसून येते.

एकूणच तुकोबांची अभंगवाणी म्हणजे रत्नभांडार आहे. यांनी भागवतधर्माचा गौरव कळसापर्यंत नेला आणि तुकाराम महाराज विश्वात्मक झाले. तुकोबांनी परमेश्वराकडे ‌‘तुझा मला विसर होऊ देऊ नको,‌’ हे मागणे मागून जो शरणभाव व्यक्त केला आहे, तो अत्यंत मोलाचा आहे.

हेचि दान देगा देवा|
तुझा विसर न व्हावा|
गुण गाईन आवडी| हेचि सर्व जोडी|


- डॉ. धनश्री साने
9833573927