जेव्हा काळम्मादेवीच्या भेटीला बाजी वाघ येतो ! सह्याद्रीत श्रद्धा-विज्ञानाचा अनोखा मेळ

    05-Mar-2026
Total Views |
sahyadri tiger baji

 
मुंबई (अक्षय मांडवकर) - कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील उदगिरीच्या काळम्मादेवीच्या धुलीवंदनाच्या यात्रेला वाघ हजेरी लावत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे (sahyadri tiger baji). याच श्रद्धेला दुजोरा म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कर्मचारी धुलीवंदनाच्या यात्रेच्या दरम्यान काळम्मादेवीच्या मंदिराच्या जंगलामधून वाघाची नोंद करत आहेत (sahyadri tiger baji). यंदा एसटीआर टी०३ म्हणजे बाजी या वाघाचा वावर यात्रेच्या दरम्यान मंदिर परिसरातील जंगलामध्ये असल्याचे नोंदविण्यात आले. ही नोंद श्रद्धा आणि सह्याद्रीच्या जैवविविधतेचे जिवंत उदाहरण आहे (sahyadri tiger baji). वन कर्मचारी आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे येथे मानव आणि वन्यजीव यांच्यातील समतोल अबाधित राखला जात असून श्रद्धा, विज्ञान, परंपरा आणि संरक्षण या सर्वांचा सुंदर मेळ उदगिरीच्या भूमीत गेल्या तीन वर्षांपासून पुराव्यानिशी अनुभवण्यास मिळतो आहे. (sahyadri tiger baji)
 
 
चांदोली राष्ट्रीय उद्यानअंतर्गत आंबा वनपरिक्षेत्रातील मौजे उदगिरी हे बफर क्षेत्रातील एक महत्त्वाचे गाव आहे. उदगिरी गावाची ओळख केवळ त्याच्या निसर्गसंपदेपुरती मर्यादित नाही. तर येथे असलेल्या काळम्मादेवीच्या प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरामुळेही हे गाव विशेष प्रसिद्ध आहे. दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी काळम्मादेवीची भव्य यात्रा भरते. हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. यात्रेदरम्यान भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असल्याने वनक्षेत्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कर्मचारी विशेष दक्षता घेतात. वन वनवा होऊ नये, अवैध वृक्षतोड अथवा अवैध शिकार यांसारखे प्रकार घडू नयेत यासाठी विविध ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले जातात. गस्त पथके, ट्रॅप कॅमेरे आणि सतत निरीक्षण यांद्वारे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जाते. श्रद्धा आणि सुरक्षा यांचा समतोल राखत वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली जाते.
 
 
देवीच्या यात्रेच्या काळात वाघ मंदिर परिसरात येतो, अशी मंदिरातील पुजारी आणि भाविकांची ठाम श्रद्धा आहे. या श्रद्देला वन विभागाच्या नोंदींमुळे वस्तुनिष्ठ आधारही मिळाला आहे. कारण, २०२४ आणि २०२५ मध्ये यात्रेदरम्यान मंदिर परिसरात ‘सेनापती’ या नर वाघाच्या पावलांचे ठसे आणि छायाचित्र मिळाले होते. तर यंदा नुकत्याच पार पडलेल्या यात्रेच्या वेळी कोयना अभयारण्य परिसरातील ‘बाजी’ या वाघाचे काळम्मादेवीच्या जंगलात लावलेल्या कॅमेरा ट्रॅप कॅमेरामध्ये स्पष्ट छायाचित्र मिळाले. हा वाघ उदगिरी परिसरात येऊन गेल्याचे पुरावे मिळाल्याने भाविकांच्या श्रद्धेला पुन्हा एकदा बळकटी मिळाली आहे.
 
 
काळम्मादेवीच्या ठायी बाजी
कोयना वन्यजीव अभयारण्यातील बाजी या वाघाने सात दिवसात १५० किलोमीटरचे अंतर कापून होळीच्या दिवशी उदगिरीचे जंगल गाठले. त्याच दिवशी काळम्मादेवीच यात्रा होती. दरवर्षी वाघाची यात्रेला हजेरी लागते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या पार्श्वभूमीवर श्रद्धा, परंपरा आणि वन्यजीव संरक्षण याचे उत्तम उदाहरण म्हणजे काळम्मादेवीची यात्रा असल्याचे म्हणता येईल. - तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प