मुंबई : (Bihar New CM) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेत बिहारच्या राजकारणातील राजकीय कारकिर्दीचा शेवट केला आहे. त्यांनी बिहारमधील नवीन सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासनही दिले. म्हणजेच, आता बिहारला नवीन मुख्यमंत्री मिळणार यात काही शंका नाही. नवीन नेतृत्वाखाली आता बिहारमध्ये सरकार येईल, पण मुख्यमंत्रिपदाचा नवा चेहरा कोण असेल याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.(Bihar New CM)
बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री?
बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार का? नितीश यांच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला मुख्यमंत्री केले जाईल का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नितीश कुमार यांच्या राज्यसभा प्रवेशानंतर बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सम्राट चौधरी, नित्यानंद राय, दिलीप जयसवाल आणि संजीय चौरसिया यांची नावे चर्चेत आहेत.त्यामुळे पुढील काही दिवसांत पक्ष कोणत्या नेत्यावर विश्वास ठेवतो आणि उपमुख्यमंत्री पद कोणाला दिले जाते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.(Bihar New CM)
सम्राट चौधरी सर्वात मोठे दावेदार?
राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री पदासाठी सर्वात मजबूत दावेदार मानले जात आहे. ते ओबीसीमधील कुशवाहा समाजातून येतात आणि गेल्या काही वर्षांत त्यांनी पक्ष संघटना आणि सरकार दोन्ही पातळ्यांवर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये काम करत प्रशासकीय अनुभवही मिळवला आहे. सरकारसोबतच त्यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली आहे. पक्षात त्यांनी सचिव, उपाध्यक्ष ते प्रदेशाध्यक्षपदाची भूमिकाही पार पाडली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्व प्रकारचा अनुभव आहे.(Bihar New CM)
नित्यानंद राय यांचेही नाव चर्चेत
केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचेही नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे. ते यादव समाजातून येतात आणि गेली अनेक वर्षे केंद्रात काम करत आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, जर भाजपाने यादव मतदारांना आपल्याकडे ओढण्याची रणनीती आखली, तर नित्यानंद राय यांना मुख्यमंत्री बनवणे हा एक मोठा राजकीय संदेश ठरू शकतो.(Bihar New CM)
दिलीप जायसवाल, संजीव चौरसिया देखील शर्यतीत
भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे मंत्री दिलीप जयसवाल यांचे नावही चर्चेत आहे. ते ईबीसी वैश्य (कलवार) समाजातून येतात आणि सीमांचल भागात त्यांचा मजबूत राजकीय प्रभाव मानला जातो. पक्ष नेतृत्वाशी त्यांचे चांगले संबंध असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जाते. पाटणा येथील दीघा मतदारसंघाचे पाच वेळा आमदार असलेले संजीव चौरसिया यांचे नावही संभाव्य मुख्यमंत्री म्हणून चर्चेत आहे. ते तमोली समाजातून येतात आणि पाटणा परिसरात मजबूत संघटनात्मक पकड असलेले नेते म्हणून ओळखले जातात.(Bihar New CM)
जदयुचे दावेदार कोण?
नितीश कुमार यांच्यानंतर जदयुमध्ये नेतृत्व कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू आहे. या शर्यतीत विजय कुमार चौधरी यांचे नाव आघाडीवर असल्याच्या चर्चा आहेत. जदयूतील विजय चौधरी हे नितीश कुमार यांचे विश्वासू सहकारी असून पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. मृदुभाषी स्वभाव आणि प्रशासकीय अनुभवामुळे ते मजबूत दावेदार मानले जातात. दुसरीकडे, नितीश कुमार सक्रिय राजकारणातून बाजूला होत आपल्या मुलाला पुढे आणू शकतात, अशीही चर्चा असून त्यांचे पुत्र निशांत कुमार अलीकडे राजकीयदृष्ट्या सक्रिय झाले आहेत. तसेच दलित समाजातील नेते अशोक चौधरी यांच्याही नावाची चर्चा सुरू असून जातीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही संधी मिळू शकते.(Bihar New CM)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\