दापोलीतील हर्णे बंदराला सागरी रो-रो सेवेचा थांबा मिळावा राज्यमंत्री योगेश कदम यांची मागणी

    04-Mar-2026
Total Views |
Yogesh Kadam
 
मुंबई : (Yogesh Kadam) मुंबई ते विजयदुर्ग या सागरी रो-रो सेवेला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुंबई ते कोकण प्रवास अधिक जलद आणि सुलभ व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत मुंबई ते विजयदुर्ग ही रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे मुंबई–कोकण दरम्यान सागरी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होऊन प्रवाशांना मोठी सोय होणार आहे.
 
राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे सध्या जेट्टीचे बांधकाम सुरू आहे. दापोली तालुक्यात रेल्वे मार्गाची सुविधा नसल्याने येथील नागरिकांना मुंबईसह इतर भागात जाण्यासाठी प्रामुख्याने रस्ते किंवा सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेला हर्णे बंदर येथे थांबा दिल्यास दापोली तालुक्यासह परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल.
 
हेही वाचा : Pratap Sarnaik : राज्यातील २७१ डेपो सार्वजनिक-खासगी सहभागातून विकसित होणार -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
 
तसेच कोकणातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी सागरी मार्ग अधिक सोयीस्कर होईल आणि स्थानिक स्तरावर सागरी वाहतुकीला चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. त्या अनुषंगाने मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवेला हर्णे बंदर (ता. दापोली) येथे थांबा देण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.