समाज उत्थानासाठी 'विघा भारती'

    04-Mar-2026
Total Views |
Vidya Bharati
 
१९७७ मध्ये ‘विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान’ची राष्ट्रीय संघटना म्हणून औपचारिकपणे स्थापना करण्यात आली. शिक्षणाबरोबरच भारतीय मूल्ये, संस्कृती, राष्ट्रप्रेम आणि भारतीय ज्ञानपरंपरांची रुजवणूक करणे, या ध्येयाने संघटनेचे कार्य सुरू झाले. आज देशभरात १२ हजार शाळा कार्यरत आहेत. शिक्षणातून समाज आणि राष्ट्रोत्थान साधणार्‍या या संस्थेच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
 
भारतीय संस्कृती ही सर्वात प्राचीन व महान संस्कृती आहे. यात जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्याचे आचरण कसे असावे आणि आपल्या जन्माचे सार्थक कसे करावे, हे ऋषी-मुनींनी वेद-उपनिषदांमध्ये लिहून ठेवले आहे. त्याचे पालन करूनच भारतात आदर्श अशी गुरुकुल शिक्षण पद्धती आस्तित्वात होती. पण, देशावर इंग्रजांनी पारतंत्र्य लादले. १८१३ मध्ये भारतामधील शिक्षण कशाप्रकारचे असावे, याबद्दल ब्रिटिश संसदेने एक कायदा संमत केला होता. त्याला मूर्त स्वरूप देण्याचे दुष्कर्म थॉमस मेकॉले यांनी केले. "आपण असा वर्ग निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, जो रक्त आणि रंगाने भारतीय असेल; परंतु अभिरुची, मतांमध्ये, नैतिकतेत आणि बुद्धीने इंग्रजी असेल,” या विचाराने थॉमस मेकॉलेने काम सुरू केले. भारतामधील पारंपरिक शिक्षण मोडीत काढून इंग्रजी भाषेच्या माध्यमातून पाश्चात्त्य शिक्षण रुजवणारी व्यवस्था निर्माण केली आणि ही शिक्षण पद्धती भारतीय संस्कृतीच्या र्‍हासाला कारणीभूत ठरली.
 
मूळ भारतीय शिक्षण पद्धतीचे पुनरुज्जीवन करण्याच्या विचाराने प.पू. गोळवलकर गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार, सन १९४६ मध्ये कुरुक्षेत्र येथे पहिली ‘गीता शाळा’ स्थापन झाली. मात्र, १९४८ मधील ‘संघबंदी’मुळे गीता शाळेचे कार्य बंद पडले. परंतु, बंदी उठल्यावर सन १९५२ मध्ये ‘विद्याभारती’ची स्थापना करण्यात आली. पुढे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासाबरोबरच राष्ट्रप्रेम रुजविणे, या उद्देशाने उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पहिले सरस्वती शिशू मंदिर सुरू झाले. हे शिशू मंदिर दूरदर्शी आणि देशभक्त शिक्षणतज्ज्ञांच्या समूहाने उभारले होते. शिक्षण म्हणजे केवळ ज्ञानाचे हस्तांतरण नाही, तर चारित्र्य, संस्कृती आणि राष्ट्रीय चेतनेचा समग्र विकास आहे, असे मानणारे हे शिक्षण होते. शिक्षण, मूल्ये आणि संस्कारांचा समर्थ पाया असलेल्या सरस्वती शिशू मंदिरांना समाजात लवकरच स्वीकृती व मान्यता मिळाली. या कामाची वाढ सुनिश्चित करण्यासाठी सन १९५८ मध्ये ‘राज्यस्तरीय शिशू शिक्षा प्रबंधन समिती’ची स्थापना करण्यात आली. हे कार्य आणि शैक्षणिक चळवळ अनेक राज्यांमध्ये विस्तारत असताना योग्य समन्वयासाठी आणि निश्चित व्यवस्थापन रचनेसाठी प्रादेशिक समित्या स्थापन करण्यात आल्या. १९७७ मध्ये ‘विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान’ची राष्ट्रीय संघटना म्हणून औपचारिकपणे स्थापना करण्यात आली.
 
‘विद्या भारती’च्या शिक्षणप्रणालीचा स्वीकार करून आज अनेक राज्यांत शैक्षणिक कार्य सुरू आहे. आजमितीस देशभरात १२ हजार शाळा कार्यरत असून एक लाख, ४० हजार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ३४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ५९ महाविद्यालये, तर दोन विश्वविद्यालयेही चालवली जातात. ‘विद्या भारती’ची विद्यालये लडाखपासून केरळपर्यंत; तर गुजरातपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत कार्यरत आहेत. मणिपूरमध्ये ‘स्कूल ऑन व्हील’ ही संकल्पना राबविण्यात आली असून, अनेक बसेसमध्ये सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून शिक्षक ग्रामीण भागांत जाऊन शिक्षणाचे कार्य करीत आहेत. सुमारे दहा लाख, ६० हजार माजी विद्यार्थ्यांनी ‘विद्या भारती’च्या पोर्टलवर नोंदणी केली आहे. हे विद्यार्थी ९० देशांमध्ये विविध क्षेत्रांत कार्यरत असून, भारतीय संस्कृतीचा प्रसार-प्रचार करीत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय मूल्यांसोबतच लष्करी कौशल्ये रुजविण्यासाठी काही वर्षांपूर्वी सैनिक विद्यालये सुरू करण्यात आली. सध्या देशभरात ‘विद्याभारती’तर्फे १४ सैनिकी विद्यालये संचालित असून, ११ नवीन सैनिकी विद्यालये सुरू करण्याची घोषणा राष्ट्रीय महामंत्री देश राज शर्मा यांनी नुकतीच केली आहे.
 
महाराष्ट्र राज्यामध्ये इतर राज्यांच्या तुलनेने शिक्षण संस्थांची संख्या चांगल्या प्रमाणात होती आणि आहे. राज्य सरकार, जिल्हा परिषदा; नगरपालिकांमार्फत, तसेच अनेक खासगी संस्थाही शाळा चालवतात, ज्यांना शासकीय अनुदान मिळते. महाराष्ट्र राज्य भारतामधील उच्चसाक्षरता दर (८२.३४ टक्के) असलेल्या राज्यांपैकी एक राज्य आहे. मात्र, भारतीय शिक्षण पद्धतीची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्रातही ‘विद्या भारती’ची शाळा सुरू करावी, असा विचार सन २०१२-१३ दरम्यान सुरू झाला. कोणत्या भौगोलिक क्षेत्रात शाळेची अधिक गरज आहे, याचे सर्वेक्षण करण्यात आले आणि कोकणातील चिपळूण येथे सन २०१४ मध्ये ‘सरस्वती शिशुवाटिके’च्या माध्यमातून ‘विद्या भारती’च्या शैक्षणिक कार्याचा शुभारंभ झाला. त्यानंतर गरजेनुसार माध्यमिक शाळाही सुरू झाली. शिक्षणाबरोबरच भारतीय मूल्ये, संस्कृती, राष्ट्रप्रेम आणि भारतीय ज्ञानपरंपरांची रुजवणूक करणे, या ध्येयाने कार्य सुरू झाले. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ‘पंचकोषीय गुरुकुल’ शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या पाच कोषांचा विकास होण्याचे दृष्टीने शाळेच्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये अनुक्रमे १) योग, सूर्यनमस्कार, मल्लखांब, खेळ इ. शारीरिक विकासाचे कार्यक्रम; २) तबला, पेटी, नृत्य इ. छंद वर्ग; ३) मौन, स्थिरता, चिंतन इ.; क्षेत्रभेट, व्यक्ती परिचय, मातृभूमी परिचय इ. आणि ५) स्वयंअध्ययन असा अभ्यासक्रम राबविण्यात येतो. येथील शिक्षण मानवी मूल्ये,सामाजिक जागरूकता आणि कौशल्य विकास यांचा संगम घडवून आणते. सध्या शाळा तात्पुरत्या इमारतीमध्ये सुरू असून, १२० विद्यार्थी-विद्यार्थिनी येथे शिक्षण घेत आहेत.
 
संस्थेच्या कार्याला चिरस्थायी स्वरूप प्राप्त व्हावे आणि या शिक्षण पद्धतीचा लाभ ग्रामीण भागातील अधिकाधिक मुला-मुलींना घेता यावा, या उद्देशाने सन २०१९ मध्ये चिपळूणजवळील शिरळ या गावात १६.५ एकर जमीन खरेदी करून तेथील बृहद् आराखडा तयार करण्यात आला. या जमिनीच्या खरेदीसाठी ‘विद्याभारती’ पश्चिम महाराष्ट्र प्रांताने पूर्ण अर्थसाहाय्य केले. येथील दहा वर्षांच्या प्रगतीमध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे मोठे योगदान आहे आणि यासाठी ‘चिपळूण गुरुकुल प्रकल्प समिती’ कृतज्ञ आहे. या संकुलामध्ये ५०० विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्था, ३६ परिपूर्ण वर्गखोल्या, अत्याधुनिक प्रयोग शाळा, सुसज्ज ग्रंथालय, सर्व सोयींनी युक्त असे कार्यालय, भव्य क्रीडांगण, प्रशिक्षण सभागृह, कौशल्य विकास केंद्र, तसेच श्रीगणेश मंदिर, गोशाळा, औषधी वनस्पती उद्यान, वृक्षलागवड इ.चा समावेश आहे. मागील काही वर्षांपासून ग्रामीण भागातील मुलांसाठी एकात्मिक शाळा, एकल शाळा व संस्कार वर्ग चालविले जातात. शिक्षकांचा दर्जा सुधारण्यासाठी वेळोवेळी कार्यशाळा व प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. शैक्षणिक पुस्तके, मासिके आणि वैचारिक साहित्याचे प्रकाशन (शिक्षणात पंचकोष, शिशू संगोपन - तंत्र आणि मंत्र, भारतीय शिक्षण मनोविज्ञानाचे मूलभूत आधार इ.) केले जाते. तसेच मुलांच्या बौद्धिक विकासासाठी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा,संस्कृत ज्ञान परीक्षा यांसारखे उपक्रम राबविण्यात येतात. येथे दोन शिशुवाटिका कार्यरत असून, पहिली ते चौथीसाठी ‘समग्र विकास गुरुकुल’; तर पाचवी ते दहावीसाठी ‘पंचकोष गुरुकुल’ कार्यरत आहे. चिपळूण येथील दहा वर्षांच्या कार्याचा व प्रगतीचा आढावा घेतल्यावर संस्थेचे कार्य अधिकाधिक जनतेपर्यंत, क्षेत्रांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि अधिक समाजाभिमुख होण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक आणि भवननिर्माण अशा तीन आयामांवर काम करण्याचे ठरले आणि त्या अनुषंगाने अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत आणि कार्यवाह छायाताई मुसळे यांच्या नेतृत्वात, प्रकल्प समितीच्या अन्य सदस्यांच्या सहकार्याने अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
 
शैक्षणिक उपक्रमांतर्गत बाल विज्ञान मेळावा, मल्लखांब कार्यशाळा, होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत सहभाग, क्रीडा महोत्सव, समूहगायन स्पर्धा, रेखाकला स्पर्धेत सहभाग, शिशुनगरी अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. सामाजिक उपक्रमांतर्गत पंचक्रोशीतील सरपंच व प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी, मंदिराच्या माध्यमातून समाजाचे एकत्रीकरण, विविध विषयांवर व्याख्याने, चर्चासत्रे आणि सर्व स्तरांवरील समाजघटकांचा सहभाग वाढविण्यासाठी संपर्क योजना, सप्तशक्ती संमेलन अशा उपक्रमांची योजना करण्यात येत आहे. भवननिर्माणांतर्गत संकुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी अनेक व्यक्ती, संस्था, आस्थापने आणि विविध कंपन्यांसोबत ‘सीएसआर’अंतर्गत निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. श्रेष्ठ भारतीय ज्ञानपरंपरेचे पुनरुज्जीवन होण्यासाठी केंद्र शासनातर्फे २०२० मध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यात आले आणि सन २०२५ मध्ये त्या धोरणाचा अधिक सर्वांगीण व सर्वसमावेशक विस्तार करण्यात आला. हे धोरण जाहीर करताना, "थॉमस मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीने भारतीयांमध्ये ब्रिटिश वसाहतवादी गुलामीची मानसिकता खोलवर रुजविली. हीच मानसिकता स्वातंत्र्यानंतरही आजतागायत कायम राहिली आहे. मेकॉलेच्या या गुलामगिरी मानसिकतेला पुढील दहा वर्षांत समूळ नष्ट करा,” असा संदेश पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
 
‘विद्या भारती’चे कार्य याच धोरणानुसार सुरू आहे आणि याच उद्देशाने शिरळ, चिपळूण येथील भव्य शैक्षणिक संकुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. येथे मूल्याधिष्ठित शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि नेतृत्व व चिकित्सक विचार कौशल्ये निर्माण व्हावीत, अशी योजना आहे. शिक्षण म्हणजे केवळ साक्षरता नसून, चारित्र्यनिर्मितीतून सामाजिक बांधिलकी जपणारे आदर्श व्यक्तिमत्त्व तयार करणे, या उद्देशानेच या संकुलाची निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, आस्थापने, कंपन्या यांनी पुढाकार घेऊन भरघोस आर्थिक साहाय्य करावे, असे आवाहन ‘विद्याभारती’ कोकण-मुंबई प्रांत कार्यकारिणीतर्फे अध्यक्ष प्रदीप पराडकर आणि मंत्री संतोष भणगे यांनी केले आहे. ‘विद्याभारती’च्या या अलौकिक शिक्षण पद्धतीच्या मुशीतून तयार झालेले सक्षम विद्यार्थी भविष्यात भारताला निश्चितपणे परम वैभवाप्रत नेऊन विश्वगुरू बनवतील, असा विश्वास ‘विद्याभारती’चे सर्व कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
 
 
- प्रकाश बापट
(लेखक ‘विद्या भारती’च्या चिपळूण येथील ‘गुरुकुल प्रकल्प समिती’चे सदस्य आहेत).