US-Iran-Israel Conflict : इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद! भारतासह जगासाठी हा जलमार्ग किती म्हत्त्वाचा?

    04-Mar-2026   
Total Views |

US-Iran-Israel Conflict

US-Iran-Israel Conflict:
इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता केवळ युद्धापुरता मर्यादित राहिला नसून, तो थेट तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत आणि खिशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे होर्मुझ स्ट्रेट अर्थात होर्मुझची सामुद्रधुनी. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या संघर्षादरम्यान इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला आग लावली जाईल असा इशाराही दिला आहे. इराणच्या प्रसारमाध्यमांनी यासंबंधी माहिती दिली आहे. इराणने हा मार्ग बंद केल्याच्या बातम्यांमुळे सध्या जागतिक बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे. इराण-इस्त्रायल युद्धामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीची चर्चा का होतेय? होर्मुझची सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का आहे? ती भारतासाठी किती महत्त्वाची? ती बंद झाल्याने जगाच्या व्यापारावर काय परिणाम होऊ शकतो? या सामुद्रधुनीला पर्यायी मार्ग आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात...

होर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे काय?

कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या व्यापारासाठी आखाती भागातला अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणजेच होर्मुझची सामुद्रधुनी ही आता इस्रायल - इराणमधल्या तणावात सापडलीय. ही सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय इराणने घेतल्यानं या समुद्री मार्गाची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी किंवा स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणजे काय तर ही एक सागरी मार्गिका आहे जी इराणच्या जवळून जाते. पर्शियन गल्फ म्हणजे इराणच्या आखाताला ओमानच्या आखाताशी जोडणारा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या सामुद्रधुनीच्या उत्तरेला आहे इराण, तर दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) ही दोन राष्ट्रे आहे. त्यामुळे ओमानमध्ये शिरण्यासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो. इथे असलेल्या होर्मुझ बेटावरून तिला हे नाव पडले आहे.

ही सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का आहे?

होर्मुझची सामुद्रधुनी हा १५० किलोमीटरचा एक जलमार्ग आहे. याची किमान रुंदी ३३ किलोमीटर आहे. पण जहाजांसाठीची मार्गिका अवघी तीन किलोमीटर रुंद आहे. हा मार्ग लहानसा, चिंचोळा असला तरी यातून जगातले सर्वात मोठे कच्च्या तेलाचे टँकर्स जाऊ शकतील, इतपत हा खोल आहे आणि मध्य-पूर्व अर्थात पश्चिम आशियामधले बहुतेक तेल आणि गॅस उत्पादक आणि त्यांचे ग्राहक याच सामुद्रधुनीचा वापर करतात. नियमित कित्येक डझन कच्च्या तेलाचे टँकर्स या मार्गाने ये-जा करत असतात. गेल्यावर्षी जगभरातल्या एकूण कच्च्या तेलापैकी २०% म्हणजे दररोज सुमारे २.१ कोटी बॅरल तेल या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गेले होते. होर्मुझची सामुद्रधुनी हा तेल वाहतुकीसाठीचा 'World's Busiest Sea Route' म्हणून ओळखला जातो.

हा मार्ग बंद झाल्यामुळे जगाच्या व्यापारावर काय परिणाम होऊ शकतो?

होर्मुझची सामुद्रधुनी ही आखाती भागातल्या तेल निर्यातदार देशांसाठी महत्त्वाची आहे. कारण या देशांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच तेल आणि गॅस उत्पादनावर आधारित आहे. इराणही याच सामुद्रधुनीवर तेल निर्यातीसाठी अवलंबून आहे. जगातील दैनंदिन तेलाच्या वापराच्या सुमारे २० टक्के तेल हे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाते. अनेक आयातदार देशही या मार्गातून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून असतात. द्रवीकृत नैसर्गिक वायू (Liquefied Natural Gas - LNG) चा जगातील सर्वात मोठा उत्पादक असलेला कतारही याचमार्गे वायूची निर्यात करतो. भारत, चीन, जपान, दक्षिण कोरियात आयात होणारे कच्चे तेलही याच जलमार्गाने येते. अगदी अमेरिकाही याच मार्गाने तेल आयात करते. त्यामुळे जर तेल पुरवठा वाहिनी विस्कळीत झाली तर पुरवठा साखळीतील वितरणावर त्याचा परिणाम होईल. यामुळे जगभरात पोहोचणाऱ्या तेल आणि गॅसच्या किमती उच्चांक गाठतील.आणि परिणामी महागाईचं संकट ओढवेल.

होर्मुझची सामुद्रधुनी भारतासाठी किती महत्त्वाची?

कच्च्या तेलाचे भाव वाढले तर अगदी भारतासारख्या देशातही इंधनाचे दर गगनाला भिडतील. यामुळे मालवाहतूक महाग होईल आणि पर्यायाने भाजीपाल्यापासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्वच महाग होईल. भारत आपल्या वापराच्या एकूण गॅसपैकी दोन-तृतीयांश गॅस आयात करतो. त्यातील ८५ ते ९० टक्के गॅस हा आखाती देशांतून म्हणजे Hormuz मार्गे येतो. जर हा पुरवठा थांबला, तर गॅसची टंचाई निर्माण होऊ शकते. The Economic Times च्या एका अहवालात म्हटले होते की, होर्मुझची सामुद्रधुनी भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे ४७% तेल याच मार्गाने येते, त्यामुळे, या सामुद्रधुनीतील कोणताही व्यत्यय भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम करू शकतो.

होर्मुझची सामुद्रधुनीला पर्याय म्हणून तेल व्यापारासाठी इतर मार्ग आहेत का?

आखाती भागातून तेल मोठ्या प्रमाणात बाहेर नेण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी हाच सर्वोत्तम मार्ग आहे. आणि हा एकमेव जलमार्ग आहे. जमिनीवरून तेल वाहून नेणाऱ्या काही पाईपलाईन्स आहेत. मात्र जहाजांद्वारे जेवढ्या प्रमाणात तेल वाहून नेले जाऊ शकते, तितक्या प्रमाणात या पाईपलाईन्स वाहून नेऊ शकत नाहीत. तरीही इराणमधील तेल हे भूमध्य किनाऱ्यापर्यंत नेणारी एक पाईपलाईन आहे. परंतु या सगळ्याच पाईपलाईन पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याने होर्मुझ सामुद्रधुनीला पर्यायी मार्ग नाहीत, असेच म्हणता येईल.

ही सामुद्रधुनी आणि जलमार्ग पूर्णपणे इराण आणि ओमानच्या सागरी हद्दीत येतात. पण आंतरराष्ट्रीय परिषदेतल्या ठरावानुसार लष्करी जहाजांसकट इतर जहाजांना एखाद्या देशाच्या ताब्यात असलेल्या जलभागातून मार्गक्रमण करण्याचा हक्क आहे. दोन्ही देशांना त्यांच्या किनारपट्टीपासून १२ नॉटिकल मैल (सुमारे २२.२० किमी) पर्यंतच्या समुद्री भागावर ताबा ठेवता येतो, इराण त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या भागात कारवाई करू शकतो, परंतु परदेशी जहाजांचा प्रवासाचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. आता मात्र इस्लामिक रिपब्लिकवर कोणताही हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग बंद केला जाईल, ही अनेक वर्षांपासून दिली जाणारी धमकी अखेर इराणने सत्यात उतरवली आहे. दरम्यान इराण आणि त्याचे जुने शत्रू असलेले अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील या संघर्षाकडे तेल बाजाराचे लक्ष लागले आहे. हा संघर्ष आणखी तीव्र झाल्यास तेल पुरवठा विस्कळीत होऊन परिणामी जागतिक व्यापारविश्वात अस्थिरता निर्माण होऊ शकते.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\