क्षणिक न्यायाचा आनंद

    04-Mar-2026   
Total Views |
Arvind Kejriwal and rekha gupta
 
मद्य घोटाळ्यात दिल्लीच्या ‌‘राऊस ॲवेन्यू‌’ न्यायालयाने निर्दोष ठरविल्यानंतर आम आदमी पाटचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा आणि त्यांच्या पक्षीय नेते-कार्यकर्त्यांचा आनंद अक्षरश: ओसंडून वाहताना दिसला. न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांसमोर मगरीचे अश्रू वाहणे, हनुमान मंदिरात पूजा करणे, सभा-बैठकांचा धडाका लावणे, असे सगळे काही एकाएकी केजरीवालांनी सुरू केले. इतके दिवस जणू विजनवासात गेलेल्या केजरीवालांना न्यायालयाच्या निकालाने राजकीय पुनरुज्जीवन मिळाले. पण, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केजरीवालांना ‌‘खटला इथेच संपलेला नाही‌’ म्हणत इशाराही दिला आहे. केजरीवालांच्या जल्लोषाविषयी रेखा गुप्ता चांदनी चौक येथील सभेत बोलताना म्हणाल्या की, “केजरीवालांच्या समर्थनार्थ ओरडणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, दिल्लीत पुन्हा कपटाचे भांडे चुलीवर पेटणार नाही. दिल्लीकरांच्या नजरेत केजरीवाल दोषी आहेत आणि त्यांना कधीही जनता माफ करणार नाही.” याचाच अर्थ, हा खटला इथवर संपलेला नाही, तर पुढे हेच प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात गेलेलेही दिसू शकते.
 
केजरीवालांचा ‌‘मद्य घोटाळा‌’ हा सर्वाधिक गाजला असला, तरी ते केवळ हिमनगाचे टोक म्हणावे, अशी परिस्थिती. कारण, याव्यतिरिक्त सरकारी घरावरील कोट्यवधींचा खर्च-शीश महाल घोटाळा, सरकारी शाळांमधील निधी लंपास करणे, कामगारांची खोटी बिले, मोहल्ला क्लिनिकमधील गैरव्यवस्थापन, दिल्ली जल बोर्डातील घोटाळा अशा अनेक प्रकरणांमध्ये केजरीवालांचे हात बरबटलेले आहेत. कारण, या सर्व घोटाळ्यांतील पैसा हा गुजरात, गोवा, पंजाब यांसारख्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी केजरीवालांनी वापरल्याचा आरोपही आहे. त्यामुळे केजरीवालांसाठी आताचा निकाल हा क्षणिक दिलासा देणाराच! एकूणच काय, तर न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागला की, तो सत्याचा, न्यायाचा विजय. परंतु, हाच निकाल केजरीवालांच्या विरोधात लागला असता, तर त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने न्यायव्यवस्थेलाही सवयीप्रमाणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत दूषणे दिली असती. असो. केजरीवालांसाठी हा दिलासा तात्पुरता ठरतो की, उच्च न्यायालयही त्यावर शिक्कामोर्तब करते; हे पाहणे औत्सुक्याचे.
 
भाकितामुळे करुण अंत?
 
 
 
27 वर्षीय विद्याज्योती... बंगळुरूतील ही उच्चशिक्षित तरुणी ‌‘आयटी‌’ क्षेत्रात चांगल्या पगारावर कार्यरत होती. जातीबाहेरच्या मुलाशी तिचे सूत जुळले. पुढे विषय लग्नापर्यंत गेला. दोन्ही कुटुंबांनी या लग्नाला होकारही दिला. सगळे काही अगदी सुरळीत होते. विद्याज्योती ज्योतिषाकडे गेली. आपले लग्नानंतरचे वैवाहिक आयुष्य नेमके कसे असेल, असा प्रश्न तिने ज्योतिषाला विचारला. त्यावर ज्योतिषाने लग्नानंतर दोन वर्षांनी दाम्पत्यामध्ये काही वादविवाद उद्भवण्याची शक्यता वर्तवित, घटस्फोट होऊ शकतो, असे भाकीत वर्तविले. फक्त भाकीत न करता, त्यावर उपाय म्हणून ज्योतिषाने नऊ दिवसांची एक पूजाही विद्याज्योतीला सुचविली. विद्याज्योती आणि तिच्या कुटुंबाने ती पूजाही घातली. मात्र, पूजेच्या शेवटच्या, नवव्या दिवशी अघटित घडले. विद्याज्योतीने तिचे आईवडील घरी नसताना गळफास लावून आत्महत्या केली. विद्याज्योतीने ‌‘सुसाईड नोट‌’ किंवा तत्सम कोणताही उल्लेख न केल्याने आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट कळू शकलेले नाही. पोलिसांकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
 
ज्योतिषाकडे कोणत्याही शुभकार्यापूव मुहूर्त काढणे, भविष्याचा वेध घेणे, होणाऱ्या वधुवरांची कुंडली जुळविणे ही भारतीय संस्कृतीत फार पूर्वापार चालत आलेली परंपरा. आजच्या वैज्ञानिक युगात ज्योतिष परंपरा न मानणारेही आहेतच. हा ज्याचा-त्याचा श्रद्धेचा आणि आस्थेचा प्रश्न. विद्याज्योतीचा विश्वास होता, म्हणूनच ती आणि तिचे कुटुंबीय ज्योतिषाकडे गेले. ज्योतिषाच्या भविष्यवाणीनंतर भविष्यात असा काही अनर्थ टाळण्यासाठी विद्याज्योतीने आपल्याच घरी नऊ दिवसांची पूजाही इमानेइतबारे केली. याचाच अर्थ, तिला आपले लग्न व्हावे, ते टिकावे याची तीव्र इच्छा होती. मग नेमके पूजेच्या शेवटच्या दिवशी असे काय घडले की, विद्याज्योतीने टोकाचे पाऊल उचलले? कुणाशी भांडण, वाद की, आणखीन काही? तिची मनस्थिती एकाएकी कशी बदलली? की, खरोखरच ज्योतिषाच्या भाकितावरून विद्योज्योतीने आपली जीवनज्योत विझवण्याचा निर्णय घेतला असेल का? सत्य कालांतराने उजेडात येईलच. पण, यांसारख्या घटनांवरून मानवी आयुष्यात सदसद्विवेकबुद्धी, मनाची कणखरता, आत्मविश्वास आणि संवाद हा किती महत्त्वाचा आहे, याची प्रचिती यावी. शेवटी, आपले भविष्य; आपल्याच हाती!
 
 

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची