बेगानी शादी में पाकडा दीवाना!

    31-Mar-2026
Total Views |
Pakistan
 
ज्या पाकिस्तानने बलुचिस्तानमधील आपल्याच नागरिकांवर शत्रूप्रमाणे तोफगोळे डागले, तो देश आता इराणचे युद्ध थांबविण्यासाठी मध्यस्थी करणार आहे म्हणे! मध्यस्थी करणार्‍या व्यक्तीची दोन्ही पक्षांमध्ये काही प्रमाणात तरी विश्वासार्हता असणे गरजेचे असते. पाकिस्तानबद्दल कोणालाच विश्वास वाटत नाही. ज्याला अफगाणिस्तानबरोबर सुरू असलेले युद्ध थांबविता आले नाही, तो देश आता इराण-अमेरिका युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न करीत आहे, हा जागतिक विनोदच.
 
आंतरराष्ट्रीय राजकारणात क्वचितच काही विनोदी घटना घडतात. इराण-अमेरिका युद्धासारख्या भीषण घडामोडींमध्ये अशीच एक विनोदी घटना घडली आहे. आता पाकिस्तान म्हणे इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबविण्यासाठी मध्यस्थी करणार आहे. गेल्या आठवड्यात तुर्कीये व इजिप्त या देशांच्या नेत्यांनी इराण व अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्ध थांबविण्यासाठी वाटाघाटी करण्याची तयारी दर्शविली होती. अमेरिकेनेही त्यास मंजुरी दिली. या देशांमध्ये पाकिस्तानने घुसखोरी केली असून, अमेरिकी व इराणी अधिकार्‍यांनी इस्लामाबादमध्ये या वाटाघाटी करण्याची सूचना केली आहे. तुर्कीये, इजिप्तसह सौदी अरबचे परराष्ट्रमंत्री नुकतेच इस्लामाबादमध्ये जमले होते पण, त्यातून काही ठोस निष्पन्न झालेले नाही. इराणने अमेरिकेशी कोणत्याही प्रकारे चर्चा करण्यास साफ नकार दिला आहे. युद्धबंदीच करायची असेल, तर ती आपल्या अटींवर केली जाईल, हे इराणने ठासून स्पष्ट केले आहे. अर्थात, इराणकडून यापेक्षा वेगळी प्रतिक्रिया अपेक्षितच नव्हती. तरीही, इराणचे काही वरिष्ठ नेते पडद्याआडून युद्धबंदीसाठी प्राथमिक स्तरावर चर्चा करीत आहेत, हे सत्य आहे. मात्र, या संभ्रमाच्या वातावरणात पाकिस्तानने एक मध्यस्थ म्हणून आपला चंचुप्रवेश करण्याची संधी साधली आहे.
 
मध्यस्थी करणार्‍या व्यक्तीची किंवा देशाची, दोन्ही पक्षांमध्ये काही प्रमाणात तरी विश्वासार्हता असणे आवश्यक असते. जगातील बाकीचे देश सोडाच, पाकिस्तानची मुस्लीम देशांमध्येही काही विश्वासार्हता नाही. पाकिस्तान हा अमेरिकेचा बाहुला आहे, हीच त्याची प्रतिमा जगभर ठळकपणे दिसून येते. त्याच्यावर इराणी नेते कसा विश्वास ठेवतील? शिवाय, या संघर्षाला शिया-सुन्नी असाही पैलू आहे. पाकिस्तान हा सुन्नीबहुल देश असून, इराण हा शियाबहुल देश आहे. पाकिस्तानचा बोगस फील्डमार्शल असीम मुनीर याने, काही कालापूर्वी पाकिस्तानातील शियांना इराणमध्ये चालते व्हा, असा इशारा दिला होता. पाकिस्तानात शिया-सुन्नी दंगली या नेहमीच सुरू असतात. गेल्या काही वर्षांत पाकिस्तान चीनच्याही कच्छपी लागला होता. थोडक्यात, जो त्याला खायला देईल, त्याची पिपाणी वाजविण्यास पाकिस्तान कायमच पुढे असतो. याचे कारण, पाकिस्तान हा आर्थिकदृष्ट्या तर दिवाळखोर झालाच आहे पण, तो राजकीयदृष्ट्याही दिवाळखोर आहे. त्यामुळे त्याची स्वत:ची अशी कसलीच ठाम भूमिका नसते.
 
कोणे एकेकाळी अमेरिकेला कम्युनिस्ट चीनबरोबर संबंध सुधारायचे होते. त्यामागे तिची आर्थिक कारणे होती. तत्कालीन जागतिक परिस्थिती खूपच वेगळी असल्याने, अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांना गुप्तपणे चीनमध्ये जाण्यासाठी एका सुरक्षित जागेची गरज होती. ते पाकिस्तानचा अधिकृत दौरा असल्याचे निमित्त करून, इस्लामाबादला आले आणि तेथून त्यांनी गुप्तपणे बीजिंगला प्रयाण केले. त्यानंतर अमेरिका व चीनने आपापल्या देशांचे हितसंबंध जपत एकमेकांशी आर्थिक संबंध निर्माण केले. पाकिस्तानमधून अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांना चीनला जाणे सोयीचे होते. पाकिस्तानची भूमिका त्यांना फक्त आपल्या देशात येऊ देणे इतकीच होती कारण, अमेरिका व चीनने आपसांत राजनैतिक संबंध जोडले, ते आपल्या देशाचे हितसंबंध जपण्यासाठी. त्यामुळे तेव्हाही या महत्त्वपूर्ण घडामोडीत पाकिस्तानची राजनैतिक अशी काहीच भूमिका नव्हती. पण, जणू हे संबंध आपल्यामुळेच जुळले गेल्याच्या भ्रमात पाकिस्तान वावरत असतो. त्यामुळे आपले जगात हसे होते, याचीही त्याला जाणीव नाही. आताही हे युद्ध थांबविणे ही जणू काही आपलीच जबाबदारी असल्याच्या थाटात पाकिस्तान वावरत आहे, ते पाहताना जगाला मनोरंजक वाटते. पाकिस्तान मध्यस्थी करणार म्हणजे नेमके काय करणार? पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद इशाक दर यांनी नुकतेच सांगितले की, "आम्ही अमेरिकी सरकारकडून आलेले निरोपाचे लिफाफे इराणी दूतावासाकडे सोपवीत आहोत”. म्हणजे, हे पाकिस्तानी केवळ पोस्टमनचे काम करणार असे दिसते. अर्थात, भारत केवळ दलाली देश बनू शकत नाही, हे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.
 
पाकिस्तानच्या या अतिउत्साही; पण पोकळ दिखाव्यामुळे भारतातील विरोधी पक्षातील काही नेत्यांना आनंदाचे भरते आले आहे. या नेत्यांकडून जागतिक स्तरावर पाकिस्तानने भारताला मात दिली, इराणी युद्धासारख्या महत्त्वपूर्ण घडामोडीत भारताला दुर्लक्षित केले, पाकिस्तानने जागतिक मुत्सद्देगिरीत भारताला मागे टाकले वगैरे काहीही टीका-टिप्पणी केली जात आहे. जागतिक घडामोडी आणि मुत्सद्देगिरी कशाशी खातात, याची अक्कल नसलेले हे नेते भारताला हीन ठरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, जगातील अनेक देशांची तेलवाहू जहाजे इराणने होर्मुझच्या आखातात अडकवून ठेवली असताना, फक्त भारताची जहाजे तेथून सुरक्षितपणे खनिज तेल व नैसर्गिक वायूची वाहतूक करीत आहेत, हे या अज्ञानी लोकांना दिसत नाही. पाकिस्तानात पेट्रोल-डिझेलचे दर किती आहेत आणि त्याची उपलब्धता किती आहे आणि भारतासारख्या खंडप्राय देशात या इंधनाचे दर व उपलब्धता काय आहे, यावर नजर टाकल्यास पाकिस्तानच्या या कथित मुत्सद्देगिरीची हवा निघून जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी आतापर्यंत दोनदा फोनवर चर्चा केली असून, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेही इराणी नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. तेथून भारतीयांना सुखरूपपणे मायदेशात आणण्यात आले आहे.
 
आपण जगातील समस्त मुस्लीम देशांचे एकमेव प्रतिनिधी असल्याचे पाकिस्तानला दाखवून द्यायचे आहे. पण, या अतिदरिद्री आणि संधिसाधू देशाला मुस्लीम जगतात कोणी विचारीत नाही. तुर्कीये आणि सौदी अरब या देशांमध्ये इस्लामी देशांचे खलिफा होण्यासाठी स्पर्धा सुरू असते. ते पाकिस्तानसारख्या कमजोर आणि बेभरवशाच्या देशाला कसे पुढे येऊ देतील? इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्या साठमारीत पाकिस्तानने आपले तोंड न घातलेलेच बरे. कारण, त्याचा या संघर्षाशी तसा काही संबंध नाही. अन्यथा, या दिग्गजांच्या मारामारीत त्याचे कंबरडे शेकून निघेल. पण, इतका पोच पाकिस्तानी नेतृत्वाकडे नसल्याने या जागतिक संघर्षात त्याची निरर्थक लुडबूड पाहताना जग आपली करमणूक करून घेईल.