तामिळनाडूच्या भूमीमध्ये देशाच्या आध्यात्मिक संस्कृतीचा विकास झाला. अनेक पंथ-संप्रदायांनी या भूमीमध्ये त्यांचे भरीव योगदान दिले. जैन धर्मही याला अपवाद नाही. महावीरांच्या संदेशाचा प्रभाव या भूमीवरही पडला. त्यातूनच तामिळनाडूच्या भूमीमध्ये जैन धर्माचा प्रसार झाल्याचे दिसते. भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी तामिळनाडूतील जैन धर्माच्या परंपरेविषयी लिहिलेला हा विशेष लेख...
महावीर जयंतीच्या या पवित्र प्रसंगी, मी भगवान महावीर यांना विनम्र अभिवादन करतो. या लेखाच्या माध्यमातून ज्या मूल्यांनी मानवतेला नीतिमत्ता, करुणा आणि सत्य या मार्गावर वाटचाल करताना मार्गदर्शन केले, अशा भगवान महावीर यांच्या त्या शाश्वत शिकवणीला मी अभिवादन करत आहे. प्रदीर्घ काळापासून तामिळनाडू ही सखोल आध्यात्मिक भक्तिभावाची भूमी राहिली आहे. हजारो वर्षांपासून, आध्यात्मिक विचार आणि तत्त्वज्ञानाची एक समृद्ध परंपरा या पवित्र मातीत बहरली. प्राचीन सांस्कृतिक वारसा, सर्वसमावेशकतेची सखोल भावना आणि विलक्षण विद्वत्ता लाभलेल्या आपल्या तामिळ भूमीने, देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या धर्मांचा स्वीकार केला आणि कोणत्याही भेदभावाशिवाय त्यांची जोपासनाही केली.
याच कारणामुळे तामिळनाडूतील लोकांनी जैन धर्माचा सहज स्वीकार केला, ज्याचा उगम आजच्या बिहारमध्ये झाला होता. तामिळ लोकांनी नेहमीच ‘आरम’(नीतिमत्ता)ला जीवनाचा आधार मानले आहे आणि ज्या धर्मांनी यावर भर दिला, त्यांना सामावून घेतले आणि स्वीकारले. जीवनाची कल्पना ‘आरम’ (नीतिमत्ता), ‘पोरूल’ (संपत्ती) आणि ‘इन्बम’ (सुख) यांच्या सुसंवादी पाठपुराव्यातून केली जात असली, तरी संपत्ती आणि सुख हे केवळ नीतिमत्तेच्या मार्गातूनच मिळवले पाहिजे. ‘अरथोदू निरल’ म्हणजेच, नीतिमत्तेशी निष्ठा बाळगणे, हेच जीवनाचे व्याकरण आहे.
तामिळनाडूतील लोकांचा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की, नीतिमत्तेशिवाय संपत्तीचा पाठपुरावा आणि धर्मपरायणतेशिवाय सुखाचा उपभोग घेणे अयोग्य आहे आणि ते सामाजिक अनादर आणि नैतिक निर्बंधांनाही पात्र आहे. अशा काही प्रथा आजही समाजात अस्तित्वात असल्या, तरी त्यांना कधीही परंपरेचा भाग म्हणून स्वीकारले गेले नाही. आपली संस्कृती अशी आहे की जिने असे नियम आखून दिले आहेत की, साहित्यानेही अशा वर्तनाचे समर्थन करू नये. हा सिद्धांत प्राचीन ‘तोलकाप्पियम’ ग्रंथात दिसून येतो.
सम्यक श्रद्धा, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य ही त्रिरत्ने जैन धर्माचा पाया आहेत, अशी शिकवण भगवान महावीरांनी दिली. त्यामुळे अशा नैतिक आदर्शांची जोपासना करणार्या तामिळ लोकांनी या उदात्त परंपरेचे, जेव्हा ती देशाच्या उत्तरेकडील प्रदेशातून पसरली; तेव्हा तिचे मनापासून स्वागत केले यात नवल नाही. भारतातील सर्वात प्राचीन आध्यात्मिक परंपरांपैकी एक म्हणून जैन धर्म अहिंसा, सत्य, तप आणि त्याग या नैतिक तत्त्वांवर आधारित आहे. भगवान महावीरांनी १२ वर्षांच्या प्रखर तपश्चर्येतून मिळवलेले प्रगाढ ज्ञान मानवतेच्या कल्याणासाठी वाटले. त्यांचा शाश्वत संदेश स्पष्ट होता तो म्हणजे, मुक्ती केवळ नीतिमत्तेच्या, निष्ठेच्या आचरणातूनच प्राप्त होऊ शकते, अन्य कोणत्याही मार्गाने नाही. त्यामुळेच जैन धर्माने दानावर (दानधर्म) दिलेला भर आणि तामिळ लोकांची उपजत दयाळू वृत्ती, याचा चांगला मेळ जुळून आला यात काहीच नवल नाही. तामिळनाडूमध्ये जैन धर्माची मोठ्या प्रमाणात भरभराट झाली कारण, त्याची शिकवण ‘तामिळ’ भाषेत सांगितली गेली. जैन विद्वानांनी ज्या प्रदेशात आपली सेवा दिली, तेथील मातृभाषांमध्येच आपल्या धर्मग्रंथांची रचना करणे पसंत केले. त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचले. तामिळ साहित्यामधील त्यांचे योगदान खरोखरच अतुलनीय असेच आहे.
अभिजात तामिळ साहित्यात जैन विचारांचा प्रभाव दिसून येतो. संगम कालखंडात ‘पुराणनूरू’ कवी पक्कुदुक्कै नानकनियार म्हणतात, "जग हे दु:ख आणि सुख यांचा एक अनपेक्षित संगम आहे. तरीही, जे लोक याचे स्वरूप यथार्थपणे समजून घेतात, त्यांना याचा गोडवा जाणवतो.” आनंद आणि दुःख हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि खरे शहाणपण हे वास्तव ओळखण्यातच आहे, जैन धर्माचा हाच दृष्टिकोन यामधून प्रतिबिंबित होतो. त्याचप्रमाणे, कनियान पुंगुंद्रनार यांची सुप्रसिद्ध ओळ, ‘याधुम ऊरे, यावरुम केलिर’, एक वैश्विक दृष्टिकोन व्यक्त करते. तो म्हणजे, सर्व स्थळे आपलीच आहेत आणि सर्व माणसे आपलीच नातलग आहेत. तसेच सुख-दुःख किंवा चांगले-वाईट हे इतरांकडून उद्भवत नाही, ती ते आपल्याच कर्मांतून आकाराला येते. कर्म-सिद्धांतात रुजलेली ही गहन कल्पना जैन तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहे, त्यामुळेच कनियन पुंगुंद्रनार यांना अनेकदा जैन मानले जाते.
‘सिलप्पथिकारम’, ‘जीवका चिंतामणी’, ‘वलयापती’ आणि ‘नालाडियार’ यांसारख्या कालातीत साहित्यकृती जैन विचार आणि नैतिक शहाणपणाचा अमिट ठसा उमटत असून, तामिळ साहित्यिक वारशाचे चिरस्थायी आधारस्तंभ बनल्या आहेत.
तामिळनाडूमध्ये जैन धर्माच्या प्रसाराविषयी एक सर्वमान्य ऐतिहासिक परंपरा आहे. पूज्य ऋषी भद्रबाहू यांनी आपल्या आध्यात्मिक अंतर्दृष्टीने, मगधमध्ये पडणार्या १२ वर्षांच्या भीषण दुष्काळाचा अंदाज लावला होता आणि दुष्काळाच्या झळीपासून आपल्या १२ हजार भिक्षूंना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी, दक्षिणेकडे प्रयाण केले. त्यांच्याबरोबर चंद्रगुप्त मौर्यदेखील होते, ज्यांनी तपस्वी जीवनाच्या शोधात आपल्या सिंहासनाचा त्याग केला. अखेरीस, ते सध्याच्या कर्नाटक राज्यातील श्रवणबेळगोळ येथे स्थायिक झाले. तेथून ऋषी भद्रबाहू यांनी आपले शिष्य विशाख मुनिवर यांना चोल आणि पांड्य प्रदेशात जैन तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी पाठवले, असे म्हटले जाते. हरिसेनाचा उल्लेख असलेला ‘बृहत्कथा कोश’ आणि देवचंद्राच्या ‘राजावली काथे’ यांसारख्या ग्रंथांमध्ये या घटनांचे संदर्भ आढळतात. मदुराई प्रदेशात सापडलेल्या ‘ब्राह्मी’ शिलालेखांद्वारे, तसेच सुमारे दोन हजार वर्षांपासून जतन केलेल्या चिरस्थायी मौखिक परंपरांमधून याची प्रचिती मिळते.
आजही तामिळनाडूमध्ये ४० हजारांहून अधिक तमिळ भाषिक जैन आहेत, अशाप्रकारे या प्राचीन वारशाचा एक दुवा जपला गेला आहे. सित्तन्नवासल, तिरुमलाई आणि अरावकुरीची यांसारख्या ठिकाणी जैन वास्तव्याच्या पुरातत्त्वीय खुणा सापडतात. इथले खडकांच्या पृष्ठभागावर कोरलेले दगडी चौथरे (डीेंपश लशवी) आपल्याला जैन मुनींच्या व्रतस्थ जीवनाचेही स्मरण करून देतात.
कांचीपुरमला ‘दक्षिणेची काशी’ म्हणून पूजले जाते. परंपरेनुसार हा प्रदेश शिव कांची, विष्णू कांची आणि जैन कांची या तीन वेगवेगळ्या भागांत विभागला जातो. तो म्हणजे याच्याशीच संबंधित अगदी अलीकडचा संदर्भ तिरुपारुत्तिकुनरमच्या भागासोबत जोडलेला आहे. इथे भगवान महावीर आणि भगवान चंद्रप्रभ यांना समर्पित असलेली मंदिरे पाहायला मिळतात. याच ठिकाणी जैन मुनींनी धर्म, शिक्षण आणि समाज अशा विविध क्षेत्रांत अमूल्य सेवा बजावली होती. कांचीपुरमची एक महान शिक्षण केंद्र म्हणून असलेली ख्याती विस्तारण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.
माझा जन्म आणि जडणघडण ही तिरुपूर जिल्ह्यातीलच. त्यामुळेच माझ्या या क्षेत्रातील जैन वारशाशी माझे जवळचे आणि वैयक्तिक नाते आहे. कोंगू वेलिर या राजाने साहित्य आणि धर्म या दोन्ही क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान दिले आहे. विजयामंगलम् ही त्याच्या राज्याची राजधानी. उदयन यांची कथा ज्या ‘बृहत्कथा’ या तामिळ ग्रंथातून आपल्यासमोर मांडली गेली, त्याचे रूपांतर असलेले‘ पेरुंकथई’ हे महाकाव्य ही याच राजाचीच रचना होती. त्यानेच विजयामंगलम् इथे एका जैन मंदिराची स्थापनादेखील केली होती. हे मंदिर कोंगू प्रदेशातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक मानले जाते. या पवित्र वास्तूमध्ये, या राजाने ‘तामिळ संगम’ची स्थापना केली आणि या माध्यमातून साहित्यिक, तसेच सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देत, तामिळ भाषा शिक्षणाला चालना दिली. तमिळ भाषा आणि विद्वत्तेच्या प्रगती आणि विस्तारातले त्याचे हे मोलाचे योगदान असल्याचे मानले जाते.
तिरुपारुत्तिकुनरम सारखी तामिळनाडूमधील जैन मंदिरे म्हणजे वास्तुकला, शिल्पकला आणि चित्रकलेतील उत्कृष्टतेची उल्लेखनीय उदाहरणेच आहेत.
जैन धर्माचा उगम हा जरी भारताच्या उत्तरेकडील भागात झालेला असला, तरी या मंदिरांतून तमिळ वास्तुकला शैलीचे सार अप्रतिमरीत्या उमटले असल्याचे म्हणता येईल. जिंजी इथल्या जैन मठ, तसेच अरंथाई आणि तिरुप्पनमलाई इथल्या मंदिरांसारख्या ठिकाणी साजरे होणार्या सणांच्या उत्साही सोहळ्यांमधून, अगदी ठळकपणे या सोहार्दपूर्ण मिलाफाची प्रचिती येते. इथे जुन्या परंपरा भक्तिभावाने जतन केल्याचा अनुभव आपल्याला मिळतो. चीनापुरममध्येदेखील भगवान आदिनाथांना (प्रथम तीर्थंकर) समर्पित असलेले प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर आजही सक्रिय उपासनेचे केंद्र असून, इथे आपल्याला अखंड आध्यात्मिक परंपरेची प्रचिती आल्यावाचून राहात नाही.
सारांश
भगवान महावीरांनी सांगितलेला अहिंसेचा कालातीत संदेश आजच्या जगासाठीही तितकाच समर्पक आहे. या उदात्त तत्त्वाच्या अंगीकार केला तरच हिंसा, संघर्ष आणि कलहापासून मुक्त असलेल्या भविष्याचे स्वप्न साकार करता येऊ शकते. भगवान महावीरांच्या जयंतीच्या या पवित्र प्रसंगी आपण नैतिकता, करुणाभाव आणि शांतीच्या तत्त्वाची प्रेरणा असलेले जीवन जगण्याची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त करूया. या पावन प्रसंगी आपल्या सर्वांना त्यांची उदात्त मूल्ये आपल्या जगण्यात आत्मसात करण्यासाठी, तसेच अधिक शांततापूर्ण, सौहार्दपूर्ण आणि करुणामयी समाजाच्या निर्मितीच्या दिशेने कार्य करण्यासाठी प्रेरित करो, हीच प्रार्थना. तुम्हा सर्वांना महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या फलदायी जावो, हीच कामना!
- सी. पी. राधाकृष्णन, मा. उपराष्ट्रपती